Home > मॅक्स ब्लॉग्ज > आरक्षण, संघ आणि अपप्रचार...

आरक्षण, संघ आणि अपप्रचार...

आरक्षण, संघ आणि अपप्रचार...
X

भारतात अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास जातींना ज्या काही जागा शिक्षण व नोकरीत राखीव/आरक्षित आहेत, त्या मुळात जातिव्यवस्थेचे हजारो वर्षांपासून चालत आलेलं आरक्षण संपवन्यासाठी आहे. जातिव्यवस्थेनुसार केवळ ब्राम्हणाच्या पोटी जन्मलेल्या पुरुषाला शिक्षण घेणे, अध्यापन करणे, चिकित्सा करणे, पुजापाठ करणे, राज्यव्यवस्था बघणे इत्यादी बौद्धिक, धार्मिक व राजकीय कार्य करण्याचे अधिकार होते इतरांना नाही. हे क्षेत्र त्यांच्यासाठी पुर्णपणे आरक्षित होते. क्षत्रीयाच्या पोटी जन्मलेल्या व्यक्तीलाच शस्त्र चालवण्याचे, राज्यचालवण्याचे अधिकार होते. हे क्षेत्र त्यांच्यासाठी आरक्षित होते. वैश्य, बनियाच्या पोटी जन्मलेल्या पुरुषाला व्यापार, व्यवसाय, करण्याचे अधिकार होते. हे क्षेत्र त्यांच्यासाठी आरक्षित होते. शुद्रांच्या पोटी जन्मलेल्या व्यक्तींवर व वरील तीन वर्णीयांच्या घरातील स्त्रियांवर ही वरील तीन वर्णाच्यांची सेवा करणे व इतर कष्टाचे कामे करणे सक्तीने लादले गेले होते. अतिशूद्र, जे समाजात अस्पृश्य देखील होते त्यांना अप्रतिष्ठेची व अस्वच्छ समजली जाणारी कामे करण्याची सक्ती होती. तर आदिवासी हजारो वर्षांपासून जंगलांमध्ये अश्मयुगीन मानवासारखे जीवन जगत होते. यामुळे हजारो वर्ष आपल्या देशाचे फार नुकसान झाले. या व्यवस्थेमुळे भारतीय माणसांची मानवी सर्जनशीलता पूर्णपणे मारून टाकली गेली होती. म्हणून महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इत्यादी महापुरुषांनी ही जातीव्यवस्था संपवून समता प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष केले. त्यांच्या लढ्याला यश आले व आधुनिक भारताच्या संविधानात समतेचा अधिकार देण्यात आला. पण केवळ असा कायदा करून जातिव्यवस्थेमुळे वेगवेगळ्या स्तरांवर असलेला या भारतीय समाजात समता प्रस्थापित होईल अशी कल्पना करण हे तर स्वप्नरंजकच होते. म्हणून या व्यवस्थेमुळे शोषण झालेल्या शोषित घटकांना प्रतिनिधित्वाची शास्वती मिळावी म्हणून दर्जाची व संधीची समानता प्रस्थापित करण्यासाठी त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात शिक्षण व सरकारी नोकरीत जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जातीव्यवस्था ही राष्ट्रनिर्मितीतील सर्वात मोठा अडथळा आहे, तो अडथळा दूर करण्यासाठी ही आरक्षणाची व्यवस्था केलेली आहे.

रा. स्व. संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले "आरक्षणाचे समर्थक जेव्हा आरक्षण विरोधकांची भावना समजून घेतली व आरक्षण विरोधक जेव्हा समर्थकांची भावना समजून घेतील तेव्हाच ह्या समस्येचं समाधान मिळेल, ज्यावेळेस या दोघांमध्ये सद्भावना निर्माण होणे गरजेचे आहे आणि ते निर्माण करण्याचे काम संघ करत आहे." रा. स्व. संघाचा अभ्यास केलेल्या काही तज्ञांच अस मत आहे की संघाची भूमिका जाणून घ्यायची असल्यास संघाचे प्रमुख काय बोलतात हे लक्षात न घेता संघाचे सामान्य कर्यकर्ते खाजगीत काय बोलतात लक्षात घेतलं पाहिजे, कारण संघाचे प्रमुख कायम चतुराईने बोलत असतात म्हणून ते खरी भूमिका बोलत नाहीत, पण सामान्य कार्यकर्त्याचं काम ‘खरी’ भूमिका समाजात पसरवणे हे असते. संघ परिवारातील विविध संघटनांचे कार्यकर्ते मात्र कायम समाजात आरक्षणाच्या विरोधात वेगवेगळे अपप्रचार करत असतात आणि सामाजिक सद्भावाच्या अगदी विरुद्ध वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या परिस्थितीचा वापर करून सामाजिक विद्वेष पसरवण्याचं काम करत असतात.

रा. स्व. संघाचे तिसरे आणि सर्वाधिक काळ म्हणजे तब्बल ३३ वर्ष सरसंघचालक राहिलेले मा. स. गोळवलकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संदेशपर लिहिलेल्या "बंच ऑफ थॉट्स" मधे अस्पृश्यता या प्रकरणात निकष बदला या शीर्षका खालील परिच्छेदात म्हणतात की "अनुसूचित जातींना विशेष हक्क दहा वर्षां करता असावे असे डॉ. आंबेडकरांचे मत होते. परंतु पुढे प्रत्येक वेळी त्याची मुदत वाढविण्यात आली, आणि अद्यापही ते चालूच आहेत." हे बोलताना गोळवलकर गुरुजी स्वतः बाबासाहेबांचं नाव घेऊन अपप्रचार करत आहेत. दर दहा वर्षांनी राजकीय आरक्षणाची (लोकसभा, विधानसभा, इत्यादी मधील राखीव जागा) वाढवण्यात येते, शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमधली राखीव जागांची नाही, शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाची कुठलीही मुदत दिलेली नाही, जो पर्यंत समाजात जाती आधारित भेदभाव आहे तो पर्यंत हे आरक्षण चालूच ठेवावं लागेल, आणि जाती आधारित भेदभाव समाजात असण्याचे आजच्या काळातले अनेक उदाहरण आपण देऊ शकतो. गोळवलकरांच्या काळात तर जातीय अत्याचारांचं प्रमाण फार जास्त होत. परंतु हेच गोळवलकर याच पुस्तकातील याच प्रकरणात जातीय अत्याचारांच्या घटनांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि म्हणतात की यातील अनेक घटना खोट्या आहेत आणि बातम्या येण्यामागे कोणी तरी परकीयाचा हात आहे. यातून त्यांचा दलितांविषयीचा विद्वेष लक्षात येतो व त्यांची ही भूमिका जातीय अत्याचारांना अप्रत्यक्ष समर्थन देण्याचीच असल्याचे लक्षात येते. गोळवलकर म्हणतात "प्रत्येक जातीत गरीब लोक असतात म्हणून लोकांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन देणे योग्य ठरेल." परंतु याद्वारे ते जे सुचवू इच्छितात की आरक्षण हे गरिबांसाठी आहे, गरिबांच्या आर्थिक उन्नती साठी आहे तर हाच आरक्षणाविरोधात सर्वात मोठा अपप्रचार आहे. आरक्षण गरिबी हटाव योजना नाही, गरिबी हटवण्यासाठी इतर अनेक योजना आहेत. आरक्षण हे त्यांच्यासाठी ज्यांचे जातीव्यवस्थेमुळे मूलभूत मानवी अधिकार नाकारले गेले, शिक्षण घेणे व इतर बौद्धिक काम करण्यापासून त्यांना रोखण्यात आले व त्यांना सक्तीने अप्रतिष्ठेचे कामं करण्यास भाग पाडले गेले. जन्मावर आधारित जातीव्यवस्था व त्यातून तयार झालेली अन्यायकारक समाजव्यवस्था नष्ट होऊन प्रत्येकाला आपल्या इच्छेप्रमाणे शिक्षण घेण्याचं, व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य मिळावं व यात त्यांच्या प्रतिनिधित्वाच्या शाश्वतीसाठी आरक्षण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या "ॲनिहीलेशण ऑफ कास्ट" या भाषणात अनेक अशी उदाहरण दिली आहेत ज्यातून हे सिद्ध होत की आर्थिक कुवत असली तरीही जातीय आधारावर दलितांना समाजात प्रतिष्ठित मानल्या गेलेल्या गोष्टी करण्या पासून रोखलं गेल आहे. बाबासाहेब यात म्हणतात "भारतात एका कफल्लक साधूची सामाजिक प्रतिष्ठा न्यायदंडाधिकाऱ्यापेक्षा जास्त आहे." जाती व्यवस्थेचा संबंध आर्थिक स्थितिशी नसून समाजातील प्रतिष्ठा नाकारण्याशी आहे, म्हणून ही व्यवस्था संपवण्यासाठी असणारे आरक्षण सुद्धा आर्थिक निकषावर नसून ते सामाजिक निकषांवर आहे.

आरक्षण गरिबी हटवण्यासाठी आहे या गैरसमजाच्या आधारे किंवा मग समाजात हा गैरसमज जास्तीत जास्त पसरावा या कुटील उद्देशाने रा. स्व. संघ प्रणित केंद्रातल्या भाजप सरकारने संसदेत आर्थिक निकषावर उच्च जातीतील ८ लाखा पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना १०% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला.

मराठा, पटेल, जाट, गुर्जर इत्यादी समाजातील उच्च समजल्या जाणाऱ्या जाती आरक्षणाच्या मागणीसाठी विविध आंदोलने करत आहेत. मुळात या जातींची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून होती, शेती व्यवसाय कमी नफ्याचा झाल्याने यांना वाटते की आरक्षणामुळे आपली आर्थिक उन्नती होईल. आम्हाला द्या नाहीतर इतरांचे काढा असाच काहीसा या आंदोलनकर्त्यांचा सूर आहे. त्यांची ही भूमिका गोळवलकरांनी "बंच ऑफ थोट्स" मधे मांडलेल्या भूमिकेशी सुसंगत आहे. या आंदोलनांमध्ये त्या त्या जातीचे संघाचे कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी असल्याचे दिसतात.आपलं संघटन हे सर्वांत मोठे राष्ट्रवादी संघटन असल्याचा दावा रा. स्व. संघ करतो. आतापर्यंत संघाचे सात सरसंघचालक झाले आहेत. या सात पैकी पाच जण हे महाराष्ट्रातील ब्राम्हण समाजातील संख्येने अल्प असलेल्या एका पोटजातीचे आहेत.

आरक्षणाबाबत समाजात बरेच अपप्रचार केले जातात. असं बोलल जात की, आरक्षणाचा फायदा सगळ्या शोषित समाजाला झाला नाही किंवा मग केवळ काही लोकच त्याचा फायदा घेतात किंवा त्यामुळे केवळ एका परिवारातील एकाच व्यक्तीला यामुळे फायदा होतो. परंतु हे सगळं गैरसमजातून किंवा अर्धवट माहितीतून बोलल जात. आरक्षण हे प्रतिनिधित्व देण्यासाठी आहे आणि शोषित समूहाला आपल्याला प्रतिनिधित्व आहे याची शाश्वती असणं हाच याचा सर्वात मोठा फायदा व उद्देशही आहे. आरक्षणामुळे कमी गुण असलेल्यांना संधी मिळते व खुल्या प्रवर्गातील जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो असा एक अपप्रचार केला जातो. पण वास्तवात विविध संस्थांचे प्रवेशाचे कट ऑफ बघितल्यास हे लक्षात येईल की खुला प्रवर्ग आणि आरक्षित प्रवर्ग यांच्या कट ऑफ मधे आता फार काही फरक राहिलेला नाही, उलट काही ठिकाणी आरक्षित प्रवर्गाचे कट ऑफ खुल्या प्रवर्गापेक्षा ही जास्त आहेत. मुळात आरक्षित जागा ४९.५% च असतात आणि खुल्या जागा ५०.५% असतात, पण आरक्षित जात समूहाची लोकसंख्या मोजल्यास ७५% च्या पुढे जाईल व सध्या खुल्या प्रवर्गात असलेल्यांची संख्या २०% च्या पुढे जाणार नाही. म्हणून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अपप्रचाराला बळी पडून आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांविषयी राग, मत्सर न बाळगता अजून जास्त मेहनत करावी. तसेच आरक्षित व खुल्या प्रवर्गातील अश्या सर्वांनाच जास्तीत जास्त संधी उपलब्ध कशी करता येईल या साठी संघटीत रित्या प्रयत्न करावे.

त्यानंतर सर्वात मोठा अपप्रचार असा केला जातो की आरक्षणामुळे अयोग्य लोक पदांवरती बसत आहेत आणि या अपप्रचारामागे जातीय विद्वेषाची भावना देखील आहे असं मला वाटतं, पायल तडवी याच विद्वेषाची बळी ठरली. अश्विनी देशपांडे व थॉमस वॉस्कोफ यांनी आपल्या संशोधनाद्वारे हा प्रचार खोटा असल्याचे सिद्ध केले आहे. आरक्षणामुळे भारतीय रेल्वेची उत्पादकता व कार्यक्षमता वाढली आहे आणि त्यातल्या त्यात प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील आरक्षणामुळे लागलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अधिक चांगलं काम केलं आहे. भारता प्रमाणेच जगातील अन्य देशात त्या त्या देशातील शोषितांना विविध विशेष हक्क "अफरमेटिव ॲक्शन" (सकारात्मक कृती) म्हणून दिले गेले आहेत. ज्या देशात शोषितांना जास्तीत जास्त संधी दिली गेली आहे, तो देश जास्त प्रगत आहे. नुकत्याच झालेल्या क्रिकेटचा विश्वचषक इंग्लंड जिंकला, त्यांच्या विजयाचा हिरो जो जॉफ्रा आर्चर ठरला तो जगात शोषित असलेल्या आफ्रिकन काळ्या वर्णाचा आहे. तर गेल्या वर्षीचा फुटबॉल विश्वषक फ्रान्स ने जिंकला, त्या संघाचा हिरो ठरलेला केलियन एम्बाप्पे देखील याच वर्णाचा आहे.

राष्ट्रनिर्मितीत अडथळा असलेल्या जाती व्यवस्थेला संपवण्यासाठी असलेली आरक्षणाची योजना ही देशातील सर्वात मोठी राष्ट्र निर्माण योजना आहे म्हणून तिचा विरोध करणाऱ्यांनी आपला विरोध आणि विद्वेष सोडून दिला पाहिजे आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी, उन्नतीसाठी आरक्षणाचं स्वागत केलं पाहिजे.

Updated : 26 Aug 2019 5:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top