Home > मॅक्स रिपोर्ट > भयानक उपासमार ! ‘त्या’ एकमेकींना खायला लागल्या…

भयानक उपासमार ! ‘त्या’ एकमेकींना खायला लागल्या…

भयानक उपासमार ! ‘त्या’ एकमेकींना खायला लागल्या…
X

सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे कोरोना विषाणूचा फटका सर्वसामान्यासह तासगाव तालुक्यातील पोल्ट्री धारकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. संचारबंदी मुळे पक्ष्यांना खाद्य मिळत नाही,मालाची विक्री होत नाही. त्यामुळे व्यवसाय धोक्यात आला आहे. खाद्या अभावी पक्षी एकमेकांना मारून खात असल्याचे दिसत आहे.

तालुक्यातील मांजर्डे, आरवडे, बलगवडे,बस्तवडे,डोर्ली,गौरगाव,पेड,सावळज,मणेराजुरी,वायफळे या गावातील अनेक तरुण शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसाय स्वीकारला. खाजगी कंपनी बरोबर पक्षी, खाद्यासाठी करार करून, बँकेचे कर्ज काढून पोल्ट्री उभा केल्या. मात्र, मागील 1 ते दीड महिन्यांपासून कोंबडीच्या चिकन बाबत चुकीच्या अफवेमुळे चिकन विक्री थांबली आहे.

याचा सर्वाधिक मोठा फटका उत्पादकांना बसला आहे. विक्री अभावी पक्षी शेडवर पडून आहेत. त्यातच आता संचारबंदी काळात वाहतूक बंद असल्यामुळे खाद्य पुरवठा बंद आहे. 30 दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेला माल कंपनी स्वीकारत नाही. चिकन दुकाने बंद आहेत. त्यामुळे बाजारात मालाला उठाव नाही. यामुळे उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. दररोज 100 ते 200 पक्षी मरत आहेत. त्याचाही मोठा आर्थिक फटका बसत आहे.

त्यामुळे पोल्ट्री धारक देशोधडीला लागला आहे. मालाची विक्री होत नसल्यामुळे भांडवली गुंतवणूक कोणीही करायला तयार नाही. व्यवसायासाठी काढलेले कर्ज कसे फेडायचे? असे अनेक प्रश्न त्यामुळे निर्माण झाले आहेत. सरकारने याचा विचार करून मदत करावी अशी मागणी होत आहे.

चिकन बाबत पसरवलेल्या अफवेमुळे मार्केट मध्ये चिकनला मागणी नाही. दोन ते तीन किलोची कोंबडी 80 ते 100 रुपयांना किरकोळ विक्री सुरू आहे. तर कंपनी कडून किलोला 5 ते 10 रुपये दर दिला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

पक्षी लागले दुसऱ्या पक्षांना मारून खायला !

अनेक ठिकाणी 70 ते 80 दिवस झालेले पक्षी शेडवर शिल्लक आहेत.त्या पक्षांना कंपनी कडून खाद्य पुरवठा सुद्धा केला जात नाही. पक्षांची विक्री सुद्धा बंद आहे. या शिल्लक पक्षांचे करायचे काय? असा प्रश्न पडला आहे. खाद्याअभावी पक्षी एकमेकांना मारून खात असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे अनेक पक्षी दररोज मरत आहेत.

या संदर्भात आम्ही पोल्ट्री फार्मचा व्यवसाय करणारे शेतकरी सुरज मोहिते यांच्याशी आम्ही बातचित केली असता, त्यांनी आपली व्यथा मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केली.

मी शेतीला जोड उद्योग म्हणून पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. कंपनी कडून माल खरेदी केला जात नाही,पक्षांना खाद्य पुरवठा केला जात नाही.त्यामुळे पक्षी एकमेकांना मारत आहेत.आमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.संकटात सापडलेल्या पोल्ट्री व्यवसायाला शासन स्तरावर आर्थिक मदत मिळावी. अंशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Updated : 6 April 2020 11:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top