Home > मॅक्स रिपोर्ट > पालघर मधील कातकरी कुटूंब, गेल्या सात वर्षांपासून घरकुलाच्या प्रतीक्षेत...

पालघर मधील कातकरी कुटूंब, गेल्या सात वर्षांपासून घरकुलाच्या प्रतीक्षेत...

पालघर मधील कातकरी कुटूंब, गेल्या सात वर्षांपासून घरकुलाच्या प्रतीक्षेत...
X

पालघर मधील मोखाडा तालुक्यातील पळसुंडा ग्रामपंचायतीतील कातकरी कुटूंब गेल्या सात वर्षांपासून घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. सन 2011 - 12 मध्ये गोपाळ बाळू वळवी, जनाबाई अशोक मिसाळ, सोपान गंगा वळवी, या लाभार्थ्यांना जव्हार प्रकल्प कार्यालयाकडून घरकुल मंजूर झाली होती. ही घरकुलं शूर झलकारी एकता महासंघ ठाणे यांच्या माध्यमातून बांधून दिली जाणार होती. या घरकुलाबरोबरच 193 मंजूर घरकूल बांधण्याचा ठेका एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय जव्हार यांनी शूर झलकारीला दिला होता.

परंतू यामध्ये संस्था चालकांनी प्रचंड भ्रष्टाचार केला. जव्हार प्रकल्प नव्हेच तर त्यांनी डहाणू, शहापूर, हया प्रकल्पातील कातकऱ्याच्या अनेक योजना लाटल्यामुळे अध्यक्ष रमेश सवरा या व्यक्तीला तुरुंग वारी देखील झालीय. परंतु यामुळे या भ्रष्टाचाराचे अनेक कातकरी कुटूंब नाहक बळी ठरले ? अनेकांची घर अर्धवट राहिली. अनेकांना तर या योजनेची दमडीही मिळाली नाही. त्यामुळे निवाऱ्याच्या प्रतीक्षेत राहिलेले हे कातकरी कुटूंब मरणयातना भोगत आहेत. कुडा मेडिच्या लहानशा झोपडीत वास्तव्य करणाऱ्या कुटूंबाची पावसाळ्यात मात्र, परिस्थितीत अत्यंत बिकट होते.

झोपडीचं छत गळतंय कुड मोडली आहेत. जमीन ओली आहे.त्यामुळे राहायचं कुठं झोपायचं कुठं? अशा परिस्थिती ऊन, पाऊस, वारा थंडीमध्ये ही कुटूंब आपल्या लहानग्यांना सोबत जीवन जगतायत. शूर झलकारीने केलेल्या भ्रष्टाचारमुळे हया घरकुलांना प्रकल्प कार्यालय अनुदान दिले जाईल असे सांगण्यात आले होतं. यानंतर अनेक वेळा या लाभार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयाचे उंबरठे झिजवले. परंतू प्रशासनाकडून चालढकल होत असल्याने सात वर्षे उजाडत आली आहेत. परंतु कुणी दखल घेत नाहीत.

माझ्यावडिलांना झोपडी आली होती. त्यांना देखील झोपडी मिळाली नाही आणि माझ्या मुलाला आलेली झोपडी मिळाली नाही. आम्ही कुडामेडीच्या झोपडीत राहतोय मतदानाच्या वेळेत आमच्याकडे मत मागायला आल्यावर आम्ही मृत झालो आहोत असंच सांगणार. कारण आम्ही जिवंत असूनही कुणी लक्ष देत नाहीत असं गंगाराम वळवी यांनी मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना सांगितले.

आम्हाला घरकुल आली होती. त्या ठेकेदाराने पाया बांधून दिला परत आलाच नाही आणि प्रकल्प कार्यालयाला आमची कुणी दाद घेत नाही असं वंचित लाभार्थी जनाबाई मिसाळ यांनी सांगितले आजपर्यत या कातकरी बांधवाकडे ना कुणी पुढारी फिरकले? ना कोणी अधिकारी? यामुळे गेली अनेक दशके दारिद्र्यात खितपत पडलेला कातकरी समाज विकासपासून कोसो मैलदूर आहे.

कातकरी म्हटले की उन्हातान्हात मेहनत करणारे, अंगावर वितभर वस्त्र असलेले आणि रानावनात भटकणारे बांधव डोळ्यासमोर येतात. स्वातंत्र्यानंतर सहा दशके उलटूनही कातकऱ्यांबाबत हे चित्र तसंच आहे. देशातील मूलनिवासी आदिम जमात असणाऱ्या कातकरी समाज इतर समाजापेक्षा अगदी वेगळी जीवनशैली जगणारा हा समाज बांधव आहे. कायमच गावकुसा बाहेर राहिलाय. त्यांच्याकडे मालकीची जमीन नाही. शिक्षणाचा गंध नाही. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्थरावर अनेक तोकडे प्रयत्न झाले. विविध योजना सुरु झाल्या खऱ्या... मात्र, त्यांची अंमलबजावणी झाली नाही. शासनाच्या उदासीन धोरणामुळे हा समाज दुर्लक्षित राहिला आहे.

मुंबईपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांवरील कातकरी समाज मुलभूत सुविधांपासूनही वंचित आहे. वर्षातील काही दिवस हातात काम असेल तेव्हा या वस्तीवर राहायचे अन्यथा संसार पाठीवर घेऊन घरापासून काही किलोमीटर लांब वीटभट्टी किंवा शेतावर मजुरीचे काम करायचे. मिळेल ते खायचे अज्ञानाने गांजलेल्या या समाजात शिक्षणाची आबाळ असल्यामुळे आश्रम शाळा जवळ असलेल्या वस्त्यावरचीच मुलं कशीबशी पाचवीपर्यंत शिकू शकतात. आर्थिक विवंचनेने ग्रासलेल्या गावाबाहेर असलेल्या या पाड्यांना मुलभूत सुविधाही मिळत नाहीत.

मालकीची शेतजमीन नाही शिवाय उदरनिर्वाह चे इतर कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने रोजगारासाठी कोसोदूर भटकंती करावी लागत आहे. जव्हार प्रकल्प कार्यालयातील घरकुल विभागाचे एन एल चौधरी सांगतात... गोपाळ बाळू वळवी यांना संस्थेच्या माध्यमातून 75 हजार रुपये दिले आहेत. 25 हजार शिल्लक आहेत. सोपान गंगा वळवी या लाभार्थ्यांला 20 हजार दिले आहेत. त्याचे 80 हजार शिल्लक आहेत. जनाबाई अशोक मिसाळ हया लाभार्थ्यांला 20 हजार दिले आहेत. 80 हजार प्रकल्पाकडे आहेत. परंतु गेल्या सात वर्षांपासून हे लाभार्थी प्रकल्प कार्यालयात ससेहोलपट करून देखील त्यांची कुणी दखल घेत नाहीत. तसंच याबरोबरच अनेक लाभार्थ्यांची घरकुलं अर्धवट असून प्रकल्प कार्यालयाकडून मिळालेली रक्कम त्यांच्यापर्यत पोहचलीस नाही.

ठेकेदाराने परस्पर ही रक्कम हडप केल्याने हे कातकरी कुटूंब मरणयातना भोगत आहेत. परंतु असं असूनही याकडे जव्हार प्रकल्प कार्यालयाने गंभीरपणे लक्ष दिले नाही.अधिकारी सांगतात आज उद्या या आम्ही किती चकरा मारायच्या - सोपान वळवी वंचित लाभार्थी झोपडी आली होती. पाया खोदून ठेवला होता. आम्ही विचारपूस केल्यावर आज या उद्या या आम्ही किती चकरा मारायच्या आम्ही चार महिने इथे राहतो. मग भट्टीवर कामाला जातो. पावसाळ्यात आमची लहान लहान झोपड्या गळतात त्यामुळे खूप हाल होतात.

प्रकल्प अधिकारी सौरभ कटियार सांगतात...

तुम्ही पंचायत समिती मोखाडा यांच्याकडे माहिती घ्या ते तुम्हाला माहिती देतील असे बेजबाबदारपणे वक्तव्य केले. कातकरी युवा कार्यकर्ते राम भोये सांगतात.... कातकरी बांधावांना 2011-12 मध्ये ज्या घरकुले आले होती. त्याचा लाभ कातकरी बांधवाना भेटला नाही. पळसुंडा ग्रामपंचायतीतील कातकरी कुटूंब गेल्या अनेक वर्षांपासून लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. याकडे शासन लक्ष देत नाही. यामुळे शासनाच्या करोडोच्या योजना शेवटच्या घटकापर्यत पोहचत नाहीत आणि अधिकारी सांगतात कातकरी घर बांधत नाहीत. पळसुडा कातकरी पाण्यापावसात उघड्यावर राहातायत. यामुळे राहायचं कुठे? खायचं काय आणि झोपायचं कुठं हा प्रश्न असुन यामुळे त्यांची मुल बाळ शिकणार तरी कसे असे ते मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना सांगतायत.

Updated : 23 Sep 2019 9:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top