Home > मॅक्स रिपोर्ट > मोदींना थेट विरोध म्हणजे राजकीय आत्महत्या ?

मोदींना थेट विरोध म्हणजे राजकीय आत्महत्या ?

मोदींना थेट विरोध म्हणजे राजकीय आत्महत्या ?
X

नरेंद्र मोदी या पाच अक्षरांचा दरारा गेल्या पाच वर्षांपासून भाजपमधील अनेक धुरिणांनी अनुभवलाय. मात्र, विरोधी पक्षांमधूनही थेट मोदींना विरोध करणाऱ्या विरोधकांना उध्वस्त करण्यात मोदी यशस्वी ठरत आहेत. त्यामुळं मोदींना थेट विरोध करणं म्हणजे राजकीय आत्महत्या करण्यासारखचं असल्याचं चित्र आहे. मात्र, मोदींना थेट विरोध करून ऐनवेळी युती केल्यानं शिवसेनेसारखा प्रादेशिक पक्ष तग धरू शकलाय. अशा परिस्थितीत थेट मोदी विरोध करणाऱ्या राजकीय पक्ष, नेत्यांना आता विरोधापुर्वी विचार करावाच लागणार आहे, अशी परिस्थिती सध्या आहे.

राहुल गांधी – मोदी विरोधक नंबर एक म्हणून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना समजलं जातं. त्याच राहुल गांधींना अमेठीसारख्या सुरक्षित मतदारसंघातून पराभूत केल्यानंतर मोदींना थेट विरोध करणाऱ्यांना टीम मोदींकडून टार्गेट करून कशापद्धतीनं पराभूत केलं जातं हे अमेठी मतदारसंघाकडे बघितल्यावर लक्षात येतं. याशिवाय राहुल गांधींनी मोदींविरोधात राफेल प्रकरणावरून देशभरात रान उठवलं होतं. मात्र, निकालाची आकडेवारी पाहिल्यानंतर त्याचा उलट राहुल गांधी पर्यायानं काँग्रेससह त्यांच्या मित्रपक्षांना नुकसानच झाल्याचं दिसलं.

मायावती – मोदींच्या प्रमुख विरोधकांपैकी एक असलेल्या बसपाच्या प्रमुख मायावतींचाही देशाच्या आणि उत्तरप्रदेशातील राजकारणातला प्रभाव कमी होत असल्याचं निकालाच्या आकडेवारीवरून समोर येतंय.

अखिलेश सिंह – समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश सिंह यांनाही मोदी विरोधाचा फटका बसला. त्यांना उत्तरप्रदेश सारख्या राज्यातून सत्ता गमावावी लागलीय. शिवाय लोकसभा निवडणूकातही सपाला मोठा फटका बसलाय.

यशवंत सिन्हा – वाजपेयी सरकारमध्ये अर्थमंत्रीपद भूषविलेल्या यशवंत सिन्हा या माजी सनदी अधिकाऱ्यानं मोदी यांच्या कारभाराला थेट विरोध करण्याची भूमिकाच घेतली. परिणामी सिन्हा हे पक्षात एकाकी पडले. शेवटी सिन्हा यांना मोदींविरोधात थेट मैदानात उतरावं लागलं. सिन्हा यांनी देशभरात मोदींविरोधात प्रचार केला मात्र त्याचाही परिणाम शून्यच झाला. त्यातच सिन्हा यांचे चिरंजीव जयंत यांनाच थेट मोदींनी मंत्रिमंडळात घेतलं.

शत्रुघ्न सिन्हा – पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यानंतर मोदींच्या कार्यशैलीवर आक्षेप घेणारे भाजपचे दुसरे नेते म्हणजे शत्रुघ्न सिन्हा. बिहारमधील भाजपचा मोठा चेहरा असलेल्या सिन्हा यांनाही हळूहळू मोदीविरोधाच्या परिणामाला सामोरं जावं लागलं. शेवटी, 2019 च्या निवडणूकीत सिन्हा यांना काँग्रेससोबत तर त्यांची पत्नी पूनम यांना समाजवादी पक्षात जावून निवडणूक लढवावी लागली. या दोन्ही ठिकाणी सिन्हा दांपत्याला पराभव पत्करावा लागलाय.

नवज्योतसिंह सिद्धू – पंजाब भाजपमधील भाजपचा मोठा चेहरा असलेल्या नवज्योतसिंह सिद्धू यांनाही मोदी विरोधाचा फटका बसला. शेवटी, सिद्धू यांनाही काँग्रेसमध्ये जावं लागलं. त्यातच सिद्धू यांना आता पंजाब काँग्रेसमधून खुद्द मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडूनच विरोध सुरू झालाय. त्यामुळं सिद्धू यांची राजकीय कारकीर्दच धोक्यात आलीय. शिवाय वाहिन्यांवरील कार्यक्रमांमध्येही सिद्धू यांना जज म्हणून बोलावणं बंद झालंय. हे सर्व घडलं ते केवळ मोदी विरोधामुळेच, अशी चर्चा आहे.

ममता बॅनर्जी – देशपातळीवरील प्रमुख राजकीय विरोधकांपैकी एक असलेल्या पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांनाही थेट मोदी विरोधाचा परिणाम नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत बसलेला आहे. एकूण 42 लोकसभेच्या जागांपैकी फक्त 22 जागांवर ममतांच्या तृणमुल काँग्रेसला 2019 मध्ये विजय मिळवता आलाय. त्याच तृणमुल काँग्रेसला 2014 च्या लोकसभा निवडणूकीत 34 जागा मिळाल्या होत्या. म्हणजेच तृणमुलच्या 12 जागा कमी झाल्या आहेत. तर दुसरीकडे 2014 मध्ये भाजपला पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या फक्त 2 जागा मिळाल्या होत्या, त्या वाढ होऊन 2019 मध्ये तब्बल 18 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळं ममता बॅनर्जी यांच्या राजकीय अस्ताची ही सुरूवात मानली जातेय.

नाना पटोले – महाराष्ट्रातून थेट मोदींच्या धोरणांना विरोध करत राजीनामा देणारे भाजपचे तत्कालीन खासदार नाना पटोले यांचीही राजकीय कारकीर्द धोक्यात समजली जातेय. भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नाना पटोले यांनी भंडारा-गोंदिया इथल्या लोकसभेच्या पोटनिवडणूकीत राष्ट्रवादीच्या कुकडे यांना निवडून आणलं खरं पण त्यानंतर भंडारा-गोंदिया या मतदारसंघाबरोबरच स्वतः पटोले हे नागपूर लोकसभा मतदारसंघातूनही पराभूत झाले आहेत.

राजू शेट्टी – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनीही मोदींच्या शेतकऱ्यांसंदर्भातील धोरणांविरोधात आवाज उठवत एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सातत्यानं त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून मोदींविरोधातला आवाज बळकट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, 2019 च्या लोकसभा मतदारसंघातून सर्वात सुरक्षित असलेल्या हातकणंगले या मतदारसंघातून शिवसेनेच्या धैर्यशील माने या नवख्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला तर दुसरीकडे स्वाभिमानी संघटनेचे सांगलीतले उमेदवार पाटीलही पराभूत झाले. त्यामुळं महाराष्ट्रातील प्रमुख विरोधकांपैकी एक राजू शेट्टी यांचीही कारकीर्द धोक्यात आल्याची चिन्हं आहेत.

लालू यादव – राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव हे ही देशपातळीवरील प्रमुख मोदी विरोधकांपैकी एक नेते. मोदी पंतप्रधानपदी येताच लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी तुरूंगात डांबण्यात आलं. त्यामुळं लालू हे सक्रिय राजकारणातून बाजूला फेकले गेले. त्याचा फटका लालूंच्या पक्षाला चांगलाच बसला. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 पैकी 39 जागा जिंकत भाजप-जनता दल युनायटेडला 39 जागा तर राष्ट्रीय जनता दलाला फक्त 1 जागा मिळालीय. त्यामुळं इतकी वर्षे बिहारच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या लालू यादव यांच्याही राजकीय कारकीर्दीला आता मोठा धक्का बसलाय.

राज ठाकरे – लाव रे तो व्हिडिओ म्हणत महाराष्ट्राच्या प्रचारात रंगत आणणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची राजकीय कारकीर्द मोदी विरोधामुळं आणखी जलद गतीनं धोक्यात येईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जातोय.

दिग्विजय सिंह – मोदी पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यानंतर काँग्रेसकडून थेट मोदींवर आरोप करणाऱ्या नेत्यांपैकी सर्वात जहाल टीका करणाऱ्या नेत्यांमध्ये दिग्विजय सिंह यांचा समावेश होतो. मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री राहिलेल्या दिग्विजय सिंह यांनी मोदींवरील टीकेमध्ये सातत्य ठेवल्यानं त्यांना काँग्रेसनंही नंतरच्या काळात बाजूला सारलं. मात्र, भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या नवख्या प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याकडून दिग्विजय सिंह यांना पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळं आधीच काँग्रेसमधून बाजूला पडलेल्या दिग्विजय सिंह यांचं राजकीय पूनर्वसन होणं कठीण होऊन बसलंय.

चंद्राबाबू नायडू – तेलगू देसम पार्टीचे सर्वेसर्वा आणि आंध्रप्रदेशचे मावळते मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी तर देशभरातील मोदी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी चंगच बांधला होता. मात्र, त्यांनाही यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत मोठा फटका बसलाय.

प्रकाशराज – चित्रपट अभिनेते आणि स्वतंत्र विचारांचे पुरस्कर्ते प्रकाशराज यांनाही बंगळुरू मध्य या लोकसभा मतदारसंघातून मानहानीकारक पराभव पत्करावा लागलाय. या पराभवानंतर प्रकाशराज पुन्हा राजकीय क्षेत्रात नशीब आजमावण्याची शक्यता कमी असल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटतंय.

कीर्ती आझाद – पूर्वाश्रमीचे भाजपचे खंदे समर्थक आणि नंतर मोदी विरोधक झालेल्या कीर्ती आझाद यांनाही यंदाच्या लोकसभा निवडणूकीत दारूण पराभवाचा सामना करावा लागलाय.

अरविंद केजरीवाल – देशपातळीवरील प्रमुख राजकीय विरोधकांपैकी एक असलेल्या आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांच्याही आप ला यंदाच्या लोकसभा निवडणूकीत सपाटून मार खावा लागलाय. ज्या दिल्ली विधानसभेत आप च सरकार आहे, त्या दिल्लीतल्या सर्वच्या सर्व 7 जागी भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळं आप चंही भवितव्य धोक्यात आलंय.

Updated : 24 May 2019 11:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top