Home > मॅक्स रिपोर्ट > जिद्दीच्या जोरावर व्हरकटवाडी गावकऱ्यांनी गावात केलं नंदनवन

जिद्दीच्या जोरावर व्हरकटवाडी गावकऱ्यांनी गावात केलं नंदनवन

जिद्दीच्या जोरावर व्हरकटवाडी गावकऱ्यांनी गावात केलं नंदनवन
X

मराठवाडा आज दुष्काळाच्या गर्द छायेत होरपळतोय. शेतीतर उद्धवस्त झालीच आहे. पण त्याच बरोबर पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनलाय. दुष्काळाच्या आशा असंख्य अडचणींवर मात करत मराठवाड्यातील एक गाव मात्र दुष्काळापासून कोसो दूर राहून सुजलाम सुफलाम झालंय. नेमकं गावकऱ्यांनी असं काय केलंय की ज्यामुळं या गावात दुष्काळाची चाहूल नाही. पाहुयात अशाच एका गावाची ही कहाणी.

गावातील नदी, विहिरी तसचं बोअरला ऑक्टोबर महिन्यात असलेलं पाणी आणि या पाण्यावर हिरवा शालू ओढून घेतलेली ही शेती. हे दृष्य काही पश्चिम महाराष्ट्रातील नसून दुष्काळी बीड जिल्ह्यातील आहेत. केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर धारूर तालुक्यातील वरकटवाडी या गावाने दुष्काळात नंदनवन फुलवलंय.

ग्रामस्थांनी ठरवून घेतलेल्या वेळेत प्रत्येकाने तीन तास श्रमदान करून वरकटवाडी गावातून जाणाऱ्या सरस्वती नदीचे एक किलोमीटर रुंदीकरण आणि खोलीकरण केलंय. एकीकडे दुष्काळाने नद्या, तलाव, विहिरी त्याच बरोबर हातपंप कोरडे पडले असताना. या गावात मात्र नदी, विहीरी आणि बोअरला हाताने घेता येईल इतके पाणी आहे. बीड जिल्ह्यात जनावरांसाठी चारा आणि पाणी नसल्याने शेतकऱ्यांवर पशुधन विकण्याची वेळ आली असताना, या गावात मात्र जनावरांची तहान तर भागतेच पण त्याच बरोबर जनावरांना हिरवागार चारा देखील उपलब्ध झालाय.

साधारण बाराशे लोकसंख्या असलेल्या या गावात दुष्काळामुळे शेतीत काही पिकत नसल्याने ५०० कुटुंब उसतोडणीसाठी स्थलांतर करत होते. मात्र ग्रामसभेत घेण्यात आलेल्या ठरवामधे गावात एकही शेतकरी जास्त पाणी लागणारे पिकं घेणार नाही. हा ठराव घेतल्यानंतर आज घडीला गावात दहा एकर वर हळद - अद्रक, दहा एकर वर झेंडू आणि २५ एकरवर तुतीची लागवड केली गेलीये. या निर्णयाने पाण्याची बचत तर झालीच आहे. परंतु शेतकऱ्यांची अर्थिक घडी आणि गावातील स्थलांतर रोखण्यास मदत झालीये.

यंदा पावसाने ओढ दिल्याने ग्रामीण भागात लहान मुलांपासून ते अबाल वृध्दांपर्यंत सगळ्यांनाच पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय, अनेक गावात तर टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. अशात मात्र वरकटवाडी गावात पिण्याच्या पाण्याचं नियोजन करून फिल्टर टॅंक बसवून प्रत्येक कुटुंबांना पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलं जातंय. गावात पाऊल पडताच प्रत्येक घरावर पाणी बचतीचे संदेश झळकतायत.

गेल्या दोन वर्षात बीड जिल्ह्यात पावसाने सरासरी ओलांडली होती, यंदा मात्र सरासरीच्या केवळ पन्नास टक्केच पाऊस झाल्याने दुष्काळाचे चटके बसू लागलेत. वरकटवाडी गावात ३०० मिलीमीटर पावसाची नोंद झालीये, परंतु गावकऱ्यांनी केलेलं श्रमदान आणि पाण्याचं नियोजन यामुळे हे गाव दुष्काळापासून दूर आहे.

Updated : 3 Nov 2018 10:21 AM GMT
Next Story
Share it
Top