Home > News Update > मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी इकडे आड तिकडे विहिर

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी इकडे आड तिकडे विहिर

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी इकडे आड तिकडे विहिर
X

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटावा, त्यांना चांगल्या दर्जा सुविधा देऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे यासाठी सरकारतर्फे विविध योजना राबवल्या जातात. पण समाजकल्याण विभागाकडून वाळवा तालुक्यातील तुजारपूर दत्तटेकडी इथं मागासवर्गीय शंभर मुलांसाठी निवासी शाळा आणि वसतीगृह बांधण्याच्या नावाखाली कोट्यवधींचा चुराडा करण्यात आला आहे. तर या विद्यार्थ्यांना सध्या खाजगी इमारतीमध्ये छोट्या खोल्यांमध्ये रहावे लागत आहे.

निकृष्ट जागेच्या ठिकाणी बांधकाम केल्याने इमारत खचली आहे, त्यासाठी सार्वजनिक विभागाचे अधिकारी समाज कल्याण विभागाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे हे नुकसान झाल्याचं सांगत आहेत. कोणत्याही प्रकारे तपासणी न करता त्या जागेवर बांधकाम केल्यामुळे बांधण्यात आलेली इमारत खचून गेली आहे. तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसलेल्या जागेत इमारत बांधण्याचा घाट घातला गेल्याचाही आरोप होतोय. या व्यवहारात अधिकारी व ठेकेदार यांचे हितसंबध गुंतले असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात नागरिकांच्या मनात तीव्र संताप आहे. याबाबत संभाजी ब्रिगेडचे सुयोग औंधकर यांनी सामाजिक न्याय विभागाकडे तक्रार दिली असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर सार्वजनिक विभागाचे उपअभियंता तुषार शिरगुपे यांनी या इमारतीला थर्ड पार्टी ऑडिट लावून तपासणीचे काम सुरू असल्याची माहिती दिली आहे. तसंच या थर्ड पार्टीचा जो अहवाल येईल तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवून जे दोषी असतील त्यांच्यावर कारावईचा निर्णय होईल असंही शिरगुपेंनी स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे ज्या विद्यार्थ्यांच्या नावाने हे निकृष्ट वसतीगृह बांधण्यात आले आहे, त्या विद्यार्थ्यांचे खूपच हाल होत आहेत. या विद्यार्थ्यांना एका खासगी इमारतीमध्ये ठेवण्यात आले आहे. इथं एकाच खोलीत ४ ते ५ विद्यार्थ्यांना रहावे लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासतही अडचणी निर्माण झालेल्या आहेत. या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तकही गेल्या अनेक वर्षांपासून मिळालेली नाहीत.

एवढंच नाहीतर इथे दिले जाणारे अन्नही निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत. वसतीगृहाचे अधीक्षक मनीष पानगावकर यांना जेव्हा यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रच्या प्रतिनिधींनी विचारणा केली तेव्हा, “विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत पण मात्र आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडून मदत होत नाही, “ अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिली.

दुसरीकडे ज्या खासगी इमारतीमध्ये या विद्यार्थ्यांना खोल्या देण्यात आल्या आहेत, त्या इमारतीच्या मालकाला २ वर्षांचं भाडं मिळालं नसल्याची त्यांची तक्रार आहे. त्यामुळे इथून मुलांना बाहेर काढण्याची भाषा आता ते करु लागले आहेत. तर ज्या ठिकाणी मुलींना भाड्याच्या खासगी खोल्यांमध्ये जागा देण्यात आलीये तिथे मुलींच्या वसतीगृहाला पूर्णवेळ अधीक्षकच नाहीये. त्यामुळे तासगाव इथल्या अधीक्षीकांकडे इस्लामपूरच्या वसीगृहाचाही पदभार दिला गेला आहे.

इथं मुलींच्या वसतीगृहात सीसीटीव्ही आहेत, त्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित झाला आहे. इथल्या अधीक्षिकांनीही पुन्हा वरिष्ठ कार्यालयातून म्हणावे तसे पाठबळ मिळत नाही, अशी तक्रार करत वरिष्ठांकडे बोट दाखवले आहे. एकूणच कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे इथं या मुलांना त्रास सहन करावा लागतोय.

आता त्या धोकादायक इमारतीमध्ये जाऊ शकत नाही आणि सध्याच्या जागेत हाल सहन करत राहणेही कठीण अशी या मुलांची अवस्था झाली आहे. इकडे आड आणि तिकडे विहिर या अवस्थेला जबाबदार असणाऱ्यांवर कावाई होणार का आणि या मुलांना मुलभूत सुविधा तरी मिळणार का असा सवाल कायम आहे.

Updated : 25 Feb 2020 10:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top