Home > मॅक्स रिपोर्ट > दुसऱ्या जगातील स्थलांतरित: भाग-1

दुसऱ्या जगातील स्थलांतरित: भाग-1

दुसऱ्या जगातील स्थलांतरित: भाग-1
X

मारिया तेरेसा रॉन्डेरॉस, संचालक, CLIP

दरवर्षी आशिया आणि आफ्रिकेतील हजारो लोकांचे लोंढे चांगल्या भवितव्याच्या आशेने लॅटिन अमेरिका पार करुन उत्तरेकडे जात असतात. पण त्यांचा कष्टाचा असलेला हा प्रवास जवळपास सर्वच देशांमधील सरकारांच्या धोरणांमुळे धोक्याचा आणि खडतर होतो. सीमांपलीकडे जाऊन केलेल्या या इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टमधून हे लोक आपल्या देशांमधून कोणती दिव्य पार करत जातात त्याची जाणीव होते.

कोलंबियाच्या वायव्येला असलेल्या उराबाच्या आखातात 70 हजार लोकसंख्येच्या नेकोक्ली या गावात यावर्षी १६ जानेवारीच्या सकाळी मी कमलला भेटले. धार्मिक कट्टरवाद्यांनी त्याचा चहाचा मळा जाळून टाकल्याने तो बांग्लादेशातील ढाका इथून पळून आला होता. त्याच्या देशात सुन्नी मुस्लिमांची संख्या जास्त आहे. त्यातच आजूबाजूच्या परिसराप्रमाणे इथेही दहशतवाद आणि त्याच्या विरुध्दचा लढा तसेच दोन्ही बाजूंच्या नेत्यांच्या धार्मिक द्वेषाचे दुष्परिणाम दिसत आहेत. त्यामुळे हिंदू, बौद्ध, मुस्लिम आणि ख्रिश्चन अल्पसंख्याकांच्या घरांवर, प्रार्थनास्थळांवर आणि व्यवसायांवर हल्ले होत आहेत.

दरवर्षी किमान 5 लाख बांग्लादेशींना त्यांचा देश सोडण्यास भाग पाडले जाते. अशाच हिंसाचारामुळे वनवास भोगावा लागणारे कमल सारखे लोक वातावरण बदलामुळे निर्वासित झालेल्या आपल्या इतर देशबांधवांसोबत बाहेर पडतात. सतत येणारे महापूर आणि भूस्खलन यासारख्या नैसर्गिक संकटांचा परिणाम लोकसंख्या जास्त असेलल्या बांग्लादेशवर झालेला आहे.

बहुतांश निर्वासित हे शेजारच्या देशांमध्ये आश्रय घेऊन नव्याने जीवन सुरू करण्याचा प्रयत्न करतात. पण अनेकजण अमेरिकेला जाण्याचा मार्ग निवडतात. 2017 ते जानेवारी 2019 दरम्यान 1608 बांग्लादेशी नागरिकांनी ब्राझीलमध्ये आश्रयाची विनंती केली होती.

MIGRANTS FROM ANOTHER WORLD, AN INVESTIGATIVE REPORTकमलनेही साओपाओलो इथे जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तो थेट बोलेव्हियाला गेला आणि तिथून त्याने उत्तरेकडे रस्तेमार्गाने प्रवास सुरू केला. याच मार्गावर आम्ही त्याला नेकोक्ली शहरात भेटलो. अमेरिका किंवा कॅनडामध्ये जाण्यासाठी या मार्गाची निवड करणाऱ्या आफ्रिका आणि आशियातील टॉप 5 देशांपैकी सर्वाधिक संख्या ही बांग्लादेशी नागरिकांची होती. 703 प्रवाशांचे पासपोर्ट कोलंबियाच्या स्थलांतर केंद्रांवर नोंदवले गेले आणि मेक्सिकोच्या स्थलांतर केंद्रातील अधिकाऱ्यांपुढे अधिकृतपणे 1 हजार 561 लोकांची नोंदणी झाली.

बदलत्या अर्थव्यवस्था, अनेक देशांमध्ये पसरलेला दहशतवाद, दुरून नियंत्रित केलेले जाणारे बाँम्बिंग, वातावरणातील बदल आणि इंटरनेट या जागतिक शक्ती आता आपले जीवन नियंत्रित करु लागल्या आहेत. या शक्तींमुळे पृथ्वीरील स्थलांतर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. 10 वर्षांपूर्वी जेवढे स्थलांतरीत होते त्यापेक्षा आता ही संख्या 5 कोटींनी वाढली आहे. त्याचबरोबर आपला देश सोडून दुसऱ्या देशात राहणाऱ्यांची संख्या आता वाढू लागली आहे.

14 देशांमधील 18 माध्यम संस्थांनी मिळून सीमेपलीकडे जाऊन केलेल्या या शोधपत्रकारितेमधून आजच्या जगातील स्थलांतरीतांचे जग पहिल्यांदाच समोर आले आहे. आम्ही त्याला ”दुसऱ्या जगातील स्थलांतरीत ”असे नाव दिले आहे, कारण ही अशा लोकांची कथा आहे जे पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी 5 ते 10 हजार मैल अंतर पार करण्याचं दीव्य पारड पाडतात. हे स्थलांतरीत संपूर्ण खंड जलद बसेसमधून, स्पीडबोट किंवा तराफ्यांवरुन, गुप्त टॅक्सी किंवा खासगी कारमधून शॉर्टकट मार्गांनी पार करुन उत्तरेकडे म्हणजेच अमेरिका किंवा कॅनडाकडे जातात. अनेकवेळा तर हे स्थलांतरीत लोक संपूर्ण अंतर पायी आणि इच्छाशक्तीच्या पंखांच्या जोरावर पार करतात.

MIGRANTS FROM ANOTHER WORLD, AN INVESTIGATIVE REPORTते दुसऱ्या जगातले स्थलांतरीत ठरतात कारण एकदा आपला देश सोडून त्यांनी खूप दूरवरच्या खेड्यांमध्ये प्रवेश केला की तिथे बंगाली, लिंगाला किंवा हौसा, फुला, हिंदी किंवा नेपाळी, अरबी, उर्दू किंवा सिंहली भाषांना काही अर्थ उरत नाही. केवळ याच भाषा नाही तर फ्रेंच, पोर्तुगीज किंवा इंग्लिश या भाषाही या खेड्यांमध्ये कुणाला समजत नाहीत.

ते दुसऱ्या जगातले आहेत कारण त्यांचे धैर्य आणि त्यांची जिद्द असामान्य आहे. नव्याने आयुष्य सुरू करण्याची त्यांची दुर्दम्य इच्छा असते आणि त्यासाठी ते वेगळा मार्ग निवडतात. ते आपल्या मार्गात गुंडांचा सामना करतात, स्थलांतरीतांसाठीच्या केंद्रांवर द्वेष आणि भ्रष्टाचार सहन करतात. हल्ले, बलात्कार, भूक, भीती, धमक्या तुरुंगवास आणि मृत्यू या सगळ्यांचा सामना करतात.

“मृत्यू हे देखील एकप्रकारचे स्वातंत्र्य आहे”, एका स्थलांतरीचे हे वाक्य माझा सहकारी पत्रकार जॉन आरत्रो गोमेझ म्हणतो. तो पनामाच्या सीमेजवळ उराबा खोऱ्याच्या परिसरात राहतो.

एवढा लांब प्रवास कशासाठी?

स्थलांतरीतांनी एवढा लांब आणि भयंकर मार्ग निवडण्यामागे अनेक कारणं आहेत. लिबियामार्गे युरोपमध्ये जाताना प्रवाशांचा छळ होत असल्याने भीती वाटते, असे कारण काही आफ्रिकन लोकांनी सांगितले. दुसरे म्हणजे अमेरिकेत निर्वासितांचा कोटा खूपच कमी आहे. त्यामुळे संधी मिळेपर्यंत वाट पाहण्यासाठी एखाद्या देशात सुरक्षित आश्रय मिळवायचा आणि तिथून थेट अमेरिकेला सुरक्षितपणे जाण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

MIGRANTS FROM ANOTHER WORLD, AN INVESTIGATIVE REPORTप्रत्यक्षात ट्रम्प सरकारने निर्वासितांचा कोटा कमी केला आहे. ( ओबामा सरकारने 2017 मध्ये ठरवलेल्या 1 लाख 10 हजारांवरुन थेट 18 हजारांपर्यंत कमी केला आहे. आता तर कोरोनामुळे निर्वासितांना प्रवेशच बंद आहे.) यामुळे अनेक महिन्यांचा त्रासदायक प्रवास मार्ग निवडून बेकायदेशीरपणे आत शिरण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. एकदा आत शिरले की त्यांना निवाऱ्यासाठी भीक मागता येते. असाच निवारा 1 हजार 327 भारतीयांना 2018मध्ये देण्यात आला होता.

आता तर जागतिक संपर्क यंत्रणा एवढी वेगवान झाली आहे की आता कितीही मोठे अंतर असले तरी ते जाणवत नाही. त्याचबरबोर प्रवासात आपणे एकटे आहोत असेही वाटत नाही. फोन आणि इंटरनेट कॅफेवरुन माहिती मिळवत ते आपल्याच देशातील लोकांच्या पावलावर पाऊल ठेवत पुढे जातात. कधी कधी नातेवाईक, मित्र मदतीचा हात पुढे करतात, प्रवास खर्चाला मदत करतात. काहींना ते शक्य नसेल तर उधार घेतात किंवा आपल्याजवळचे काहीतरी विकून पैसे जमवतात. कमलनेही असेच केले. त्याने आपली जमीन विकून टाकली.

फेसबुक आणि व्हॉट्सअपमुळे ते प्रवासतही एकमेकांच्या संपर्कात राहू शकतात. काही लोक आपापल्या देशातील लोकांचे नेटवर्क तयार करतात. उदा. माली किंवा सेनेगलमधल्या लोकांनी 1990 पासून ब्राझिल आणि अर्जेटिनामध्ये आपले नेटवर्क तयार केले आहे. दुसऱ्या देशात पोहोचले लोक आपल्या देशातील इतर स्थलांतरीतांना काही लोकांशी (उदा. लुईस गुरेरो अराया ज्याला मी कोस्टारिकामध्ये ला क्रुझवर भेटले) जोडून देतात. हे लोक त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मदत करतात. एकदा का एखादा स्थलांतरीत स्थिरस्थावर झाला की तो त्याच्या इतर लोकांना बोलावतो, मग ते लोक इतरांना बोलावतात आणि यातूनतच मग समुहाचे स्थलांतर होते.

दूरचा प्रवास करताना जवळपास प्रत्येक ठिकाणी त्यांना विरोधाचा सामना करावा लागतो. पण त्यांच्या पैशाचं मात्र स्वागत केले जाते. कारण हा पैसा पाकमधील कराचीमधून कॅमेरुनमध्ये, तिथून ब्राझीलमधील साओपाओलो किंवा कोलंबियामधील एखाद्या ठिकाणी अगदी सहज पोहोचतो. अगदी कमी कागदपत्रांच्या आधारे पैसा सर्व सीमा पार करतो. आंतरराष्ट्रीय पैसे हस्तांतरण कऱणाऱ्या वेस्टर्न युनियन किंवा मनीग्राम यासारख्या यंत्रणांमार्फत हा पैसा पोहोचवला जातो. ही माहिती आम्हाला अमेरिकेत विविध ठिकाणी असलेल्या स्थलांतरीतांकडून, सरकारी सूत्रांकडून, शिक्षणतज्ज्ञांकडून आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून मिळाली. 40 पेक्षा जास्त पत्रकार, संपादक, भाषांतरकार, प्रोग्रामर, डेव्हलपर्स, फोटोग्राफर्स, प्रोड्युसर्स आणि क्रिएटर्स, कलाकार या सगळ्यांच्या मेहतीने हे दुसऱ्या जगातील स्थलांतरीतांचं चित्र तयार झाले. आम्ही ठरवले होते आपली संपूर्ण ताकद झोकून द्यायची आणि जगाला कधीही न दिसलेले हे स्थलांतरीत दाखवायचे. स्थलांतरीतांसाठीच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या अहवालांमध्येही ही माहिती कधीच आलेली नाही.

जेव्हा एखादी घटना घडते तेव्हाच या लोकांच्या कहाण्या समोर येतात. पण या 9 महिन्यांच्या काळात आम्ही त्यांचा प्रवास सुरूवातीपासून शेवटपर्यंत टीपला. उत्तरेत स्थायिक झालेल्यांना जी किंमत मोजावी लागली ती योग्य होती का? ज्यांना पकडून नेले किंवा तुरुंगात टाकले त्यांचे काय झाले? ज्यांचा मृत्यू झाला किंवा ज्यांचे पार्थिव अनोळखी ठिकाणी पडलेले आहेत, रस्त्याच्या कडेला अनेकांचे सामूहिक थडगे आहे, त्यांची ओळख कशी पटवणार? यासारख्या प्रश्नांची उत्तरे आम्हाला शोधायची होती.

MIGRANTS FROM ANOTHER WORLD, AN INVESTIGATIVE REPORTस्थलांतरीतांवरील आमचे हे 5 भाग वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की हे स्थलांतरीत केवळ त्यांच्या हिंमतीवर जगतात. पुढे जाण्यासाठी सुरक्षित आणि सन्मानजनक मार्ग हवा एवढीच त्यांची अपेक्षा असते.

असे किती स्थलांतरीत आहेत आणि ते कुठून येतात?

हे गुप्त स्थलांतर असल्याने दरवर्षी लॅटीन अमेरिकेमार्गे किती आशियाई आणि आफ्रिकन लोक अमेरिका किंवा कॅनडामध्ये जातात याचा निश्चित आकडा उपलब्ध होत नाही. तरीही काही देशांमधील आकडेवारी तपासल्यानंतर हा आकडा साधारण 13 हजार ते 24 हजारच्या दरम्यान असतो.

काहीवेळा ते आपल्या मुलांना सोबत घेतात. भारतातील नवी दिल्लीतून हवाईमार्गे अबूधाबी किंवा दुबई, इथिओपियामधील आदिस अबाबा किंवा मोरोक्कोमधील कॅसाब्लँका, नायजेरियामधील लागोस किंवा दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग किंवा रशियातील मॉस्को इथं पोहोचतात. साओ पाओलो इथे ते उतरतात आणि मग क्विटो किंवा पनामाला जातात. तिथून ते ब्युनॉस आयर्स, कॅरॅकस किंवा हवाना इथं पोहोचतात. काहीजण समुद्रामार्गे आपले नशीब आजमावतात. यात ते आफ्रिकन बंदरे, डर्बन किंवा पोर्ट एलिझाबेथ, फ्रीपोर्ट, लागोस, मलाबो किंवा पॉईंट नॉयर इथून जहाजातून प्रवास करतात. त्यांना कधी कधी क्वचितच अटलांटिक महासागर पार करणाऱ्या मालवाहू जहाजातून किंवा बार्जमधून प्रवास करावा लागतो. ते साओ पाओलोजवळच्या सँटोस बंदरावर उतरतात किंवा ब्युनॉस आयर्समधील बंदरे किंवा ब्राझीलमधील मोऱ्हान्हो इथे उतरतात. अमेरिकेत पोहोचल्यानंतर या प्रवासातील सगळ्यात कठीण टप्पा सुरू होतो. दुसऱ्या लेखात सांगितल्याप्रमाणे अमेरिकेतील काही मार्गांचा तो टप्पा असतो.

MIGRANTS FROM ANOTHER WORLD, AN INVESTIGATIVE REPORTज्या देशांमधून सर्वाधिक स्थलांतर होते तिथली अधिकृत आकडेवारी आम्ही गोळा केली. पण स्थलांतर विभागाचे अधिकारी पूर्ण आकडेवारी गोळा करत नसल्याने पनामामध्ये एकाच देशातील किती स्थलांतरीतांची नोंदणी झाली आहे, याची माहिती मिळत नाही. त्यामुळे शेजारच्या कोस्टा रिकामधील आकडेवारीशी त्याची तुलना करता येत नाही. हे स्थलांतर अत्यंत गुप्तपणे होत असल्याने कडक तपासणी असलेल्या सीमांवरदेखील त्याची माहिती मिळत नाही, तसंच सापडण्याच्या भीतीने हे स्थलांतरीत सतत मार्ग बदलत असतात.

एकूणच या आकडेवारीमधून एक गोष्ट स्पष्ट होते की, 2019 मध्ये या मार्गाने गेलेल्या आंतरखंडीय स्थलांतरीतांमध्ये कॅमेरुन, भारत, काँगो, बांगलादेश, अंगोला, श्रीलंका, इरिट्रिया, नेपाळ, पाकिस्तान, घाना, गिनी आणि मॉरिटानिया या देशांमधील पासपोर्टधारकांची संख्या जास्त होती. यापैकी बहुतांश लोक आधी ब्राझीलमध्ये आल्याचे आमच्या निदर्शनास आले. ब्राझीलने काही वर्ष आंतरराष्ट्रीय स्थलांतरीतांचे स्वागतही केले होते. जानेवारी 2018 ते जानेवारी 2019 या काळात ब्राझीलमध्ये 53 देशांमधील 27 हजार 760 परदेशी स्थलांतरीतांना आश्रय देण्यात आला होता. त्यापैकी 270 हे काँगोचे नागरिक होते.

काही कालावधीनंतर अनेक स्थलांतरीत रहिवासासाठीचा पाठपुरावा सोडून देतात किंवा निर्वासित असल्याचे दाखवतही नाहीत. आमच्या शोधात मदत करणाऱ्या ग्लोबो टीव्हीच्या रिपोर्टरने सांगितले की, हजारो स्थलांतरीत साओ पाओलोच्या सीमेवरील झोपडपट्ट्यांमध्ये राहतात किंवी रिकामे पडलेल्या इमारतींमध्ये दयनीय अवस्थेत राहतात. त्यांना चांगले कामसुद्धा मिळत नाही. ब्राझीलमध्ये स्थायिक होण्यासाठी 2-3 वर्ष प्रयत्न केल्यानंतर ते पुन्हा उत्तरेत जाण्यासाठी तयारी करतात. अंगोलिया आणि काँगोमधील लोकांची ही परिस्थिती आम्हाला सगळ्याचा पाठपुरावा करत असताना दिसली. अनेक बांगलादेशी, घानामधील लोक आणि पाकिस्तानी लोकांना निर्वासितांसाठीचा परवानादेखील मिळालेला नाही.

श्रीलंकेसारख्या देशातील स्थलांतरीत ब्राझीलमधून त्यांचा प्रवास सुरू करत नाहीत. 2017 ते मार्च 2019 या काळात फक्त 39 श्रीलंकन नागरिकांनी आश्रयासाठी विनंती केली. पण इक्वेडॉरमधून 2019मधील नोंदणीनुसार जवळपास 390 लोक स्थलांतर अधिकाऱ्यांकडे पासपोर्टची नोंदणी न करता निघून गेले. याचा अर्थ त्यांच्या प्रवसाचा मार्ग गुप्त होता, कारण कोस्टारिकामध्ये स्थलांतर केंद्रांवर 738 लोक आल्याची नोंदणी करण्यात आली.

काही देशांच्या नावातील साधर्म्यामुळे स्थलांतर केंद्रांवर नोंदणी करताना चुका होतात. त्यामुळे स्थलांतरीतांच्या आकडेवारीत सातत्य आढळत नाही. पण लांबचा मार्ग निवडून ते अटकेच्या कारवाईपासून स्वत:ला दूर ठेवू शकतात. खालील तक्त्यावरुन ही आकडेवारी समजू शकते, उदा. कोलंबियामध्ये इरिट्रियातील 103 लोकांना सुरक्षितपणे प्रवेश मिळाला पण मेक्सिकोमध्ये याच्या चौपट स्थलांतरीतांची नोंद झाली.

MIGRANTS FROM ANOTHER WORLD, AN INVESTIGATIVE REPORTहे स्थलांतरीत अनेकवेळा त्यांना हव्या असलेल्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत. अशीच कहाणी आहे भारतात जन्मलेल्या संजीव, राजा आणि हरप्रीत यांची.....या दुसऱ्या जगाच्या शोधात आमचे सहकारी असलेल्या भारतातील Confluence Mediaने त्यांची कहाणी शोधून काढली आहे. शेवटच्या टप्प्यात मेक्सिकोमध्ये इतर 308 भारतीयांसह ते पकडले गेले. त्यानंतर त्यांना विमानाने भारतात परत पाठवून देण्यात आले. साल्व्हेडॉरमधल्या अन्याय्य व्यवस्थेचा बळी ठरलेल्या व्हिएतनामच्या व्हॅन डंग नगे याची कहाणीही तुम्हाला आम्ही सांगणार आहोत.

आमच्या या कामात सहभागी असलेले काँगोचे पत्रकार जोसेफ पेले आपल्या कुटुंबासह अमेरिकेपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. पण तिथे कामाच्या परवान्याशिवाय आश्रय मिळेल का या अनिश्चिततेत त्यांनी एक वर्ष काढलं. अखेर ते कॅनडात गेले आणि सध्या तिथे राहत आहेत. त्यांच्या त्या खडतर प्रवासाची कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कॅमेरुनमधली कोलेट तिच्या मुलींसह मेरीलँडमधील ऑडेन्टन इथं राहत आहे, अमेरिकेचे तिचं स्वप्न तिला कल्पनपेक्षाही जास्त त्रासदायक ठरलंय.

पत्रकार पेले यांना आपल्या प्रवासात कोलंबियामधल्या चोको भागात स्थलांतरीतांसाठी तात्पुरत्या तयार केलेल्या घरातील भिंतींवर काही संदेश आणि सह्या आढळल्या. घर सोडताना त्या स्थलांतरीतांनी आपल्या वेदना आणि अनुभव त्या भिंतीवर लिहून ठेवले होते. आम्ही त्यांचा शोध सुरू केला. तिथेच आम्हाला नेपाळचा रमेश भेटला ज्याने 2015मध्ये आपला संदेश भिंतीवर लिहून ठेवला होता. त्यानंतर नेपाळमधील पत्रकाराच्या मदतीने आम्ही त्याची कहाणी सुरुवातीपासून शोधून काढली.

हा प्रवास नेमका असतो कसा?

अतिशय लांब अंतराच्या या प्रवासात अनेक मार्ग (भाग 3) निषिद्ध मानले जातात. कारण जवळपास सर्वच देशांच्या सरकारांनी या मार्गात अनेक अडथळे निर्माण करुन ठेवलेले आहेत. कोलंबिया आणि पनामा दरम्यान असलेल्या जंगलातील प्रवास कुणीही विसरु शकत नाही. आम्ही तर त्यावर एक डॉक्युमेंट्रीच केली आहे. प्रचंड उन, जीवघेणे चढ, चिखलात कुजलेल्या मृतदेहांची दुर्गंधी....इथे काहींना जीवही गमवावा लागतो. काहींना तर आपल्या मुलांनाही सोडून पुढे जावे लागते.

पण प्रवास इथेच संपत नाही. जेव्हा ते पनामामधील सुसंस्कृत वस्ती असलेल्या पॅन अमेरिकेन हायवे परिसरात पोहोचतात तेव्हा तिथे त्यांना जरा चांगली वागणूक मिळते. पनामा आणि कोस्टारिका या दोन्ही देशांमध्ये स्थलांतरीतांच्या जलद आणि सुरक्षित प्रवासाची सोय केली जाते. पण लवकरच मग ते निकारगुआ या देशात पोहोचतात. इथे त्या देशातील नागरिकांसाठीच कायदे नाहीयेत तर परदेशी व्यक्तींसाठी विचारायला नको. पण तिथून पुढे जाण्यासाठी त्यांना किंमत मोजावी लागते. अनेकवेळा तर स्थलांतरीतांना विना संघर्ष पुढे जाताच येत नाही. स्थलांतरीत ज्या गुप्तमार्गाने जातात तो किती कठीण आहे याची कल्पना यावरुन येते.

MIGRANTS FROM ANOTHER WORLD, AN INVESTIGATIVE REPORT

इथून पुढचा प्रवास खूपच धोक्याचा असतो. हॉन्ड्युरन भागात निकारगुआच्या सीमेजवळ दक्षिणेतील चॉलूटेका ते एगुआ कॅलिएंटमधील ग्वाटेमालाच्या एकमेव सीमेपासून पुढे हे स्थलांतरीत मेक्सिकोपर्यंतचा प्रवास दिवसा करत नाहीत. सीमा पार केल्यानंतर त्यांना टापाच्युलाच्या शिबिरांमध्ये थांबून वाट पाहावी लागते. गेल्या ऑक्टोबरमध्ये अचानक लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे हजारो स्थलांतरीतांना तिथेच अडकून पडावे लागले होते. स्थलांतर केंद्रांच्या समोर तंबूमध्ये लोक झोपत होते. परिस्थिती खूपच स्फोटक झाली होती. आमच्या या शोधमोहीमेतील सहकारी दोनवेळा तिथे थांबले होते, त्या परिस्थितीचे वर्णन त्यांनी केले आहे.

कधीही न पोहोचलेल्या माणसांची गोष्ट

स्थलांतरीतांना रस्त्यातच थांबावे देखील लागते. कारण अनेक देशांना असे वाटते की, आपण सीमा बंद केल्या किंवा सुरक्षित मार्गाने जाण्यापासून त्यांना रोखले तर ते निराश होऊन परततील. पण त्यांना या स्थलांतरीतांबद्दल माहिती नसते. कारण भूक, दारीद्र्य, मृत्यू आणि युद्ध यासारख्या परिस्थितीमुळे ते सुरक्षित जागेच्या शोधात निघालेले असतात. जेव्हा एखाद्या देशातील परिस्थिती अत्यंत निराशाजनक बनते तेव्हा लोक तिथून बाहेर पडतात, हे कदाचित या देशांना समजत नसावे.

स्थलांतरीतांना दिल्या गेलेल्या वाईट वागणुकीची राजकीय किंमत त्या त्या देशांना मोजावी लागल्याच्या घटना दुर्मिळ असतात. कोलंबियामध्ये गेल्यावर्षी जानेवारीमध्ये 21 स्थलांतरीतांना घेऊन जाणारी बोट बुडाल्यानंतर तिथल्या सरकारने स्थलांतरीतांसाठी नियमांमध्ये थोडी शिथिलता आणली. काही प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार आता त्या देशातील 1200 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी स्थलांतरीतांना 5 दिवसांचा अवधी दिला जातो. परदेशी लोकांचे लोंढे कमी करण्यासाठी मेक्सिकोने अमेरिकेसोबत केलेल्या कराराचे तिथल्या जनतेने जोरदार स्वागत केले आहे. स्थलांतरीतांचा एक देश इतर स्थलांतरीतांना त्यांचे ध्येय गाठण्यापासून रोखतो हा एक वेदनादायी विरोधाभास इथे निदर्शनास येतो.

दुसऱ्या जगातील स्थलांतरीतांपैकी विविध देशांमधील 110 लोक पनामा आणि कोलंबियामधील सीमेवर मृत्यूमुखी पडले आहेत किंवा बेपत्ता झाले आहेत. जंगलांमधील नद्यांच्या प्रवाहाचा अंदाज नसल्याने ते बुडतात, कधी समुद्रात बुडून मृत्यूमुखी पडतात. तर कधी प्रवास असह्य झाल्याने हार्टअटॅकने जातात किंवा कधी कधी त्यांची हत्या होते. तर काही लोकांचे काय झाले हे सुद्धा कळत नाही. अनेकांचा तर त्या देशांच्या अधिकृत आकडेवारीत पत्ताही नसतो. एवढंच काय International orgnisation for Migrants (IOM) च्या Missing Migrants Project मध्ये यांच्याबद्दल खूप तोकडी माहिती मिळते.

चौथ्या भागात सर्व देशांमधील किती स्थलांतरीतांचा मृत्यू झाला आणि किती बेपत्ता झाले याची 2016 ते फेब्रुवारी 2020 पर्यंतची माहिती आम्ही आणि IOMने गोळा केली आहे. यात कोलंबियामधील उराबाच्या खोऱ्यात असलेल्या अकांदी या गावाजवळ बुडून मृत्यूमुखी पडलेल्या 21 स्थलातरीतांचा समावेश आहे. इथे त्यांचे मृतदेह पुरण्यात आले आहेत. ते कोण होते आणि त्यांचा अंत तिथे कसा झाला हे आम्ही शोधून काढले आहे. सीमेवर सोडून देण्यात आलेल्या व्हिक्टरचा परिवार आम्हाला अमेरिकेत सापडला.

कॅमेरुनमधल्या मुसेबा प्रोजेक्टच्या सहकार्याने आम्ही तुम्हाला कॅमेरुनच्या चौघांची गोष्ट सांगणार आहोत. ते 2019मध्ये मेक्सिकोमधील चियापास भागात टोनालाच्या किनाऱ्याजवळ समुद्रात बुडून मरण पावले. चांगल्या भवितव्याच्या शोधात बाहेर पडलेल्या आपल्या माणसांना असे शवपेटीत पाहण्याची वेळ त्यांच्या कुटुंबियांवर आल्याचे आम्ही पाहिले.

वेदनादायी बाजू

एकीकडे आर्थिक बाबतीत राष्ट्रांच्या सीमा पुसट होण्याची प्रक्रिया सुरू असताना जगभरातील देशांनी त्याला समांतर अशी सीमा बंदीस्त करण्याची प्रक्रियासुद्धा सुरू ठेवली आहे, असे समाजशास्त्राच्या अभ्यासक सास्कीया सासेन म्हणतात. यातूनच मग भूभागावर दावा सांगत स्थलांतरींतांना ताब्यात घेण्याचे प्रकार घडतात. इतर देशांतील स्थलांतरीतांना आश्रय देण्याचे किंवा निवारा देण्याचे आंतरराष्ट्रीय करार झाले असले तरी अनेक देश त्याकडे दुर्लक्ष करतात.

विविध देशांच्या अनियमित आणि सहमती नसलेल्या दुटप्पी धोऱणांमुळे स्थलांतरीतांच्या मानवी तस्करीचा क्रूर चेहराही समोर येतो. सर्व स्थलांतरीतांना कुटुंबियांच्या मदतीने किंवा इतरांच्या मदतीने समुद्र पार करता येत नाही. अपरिहार्यतेमुळे अखेर त्यांना मानवी तस्करी करणाऱ्यांकडे जावेच लागते. सीमा कधी खुल्या होतात आणि कधी बंद होतात याची माहिती असल्याने हे तस्कर त्याचा गैरफायदा घेऊन ज्यादा पैसे उकळतात.

इतर बेकायदेशीर कामे करणाऱ्या माफियांशी असलेल्या शत्रुत्वामुळे हे लोक मानवी तस्करीसाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतात. ते परिस्थितीनुसार तातडीने निर्णय घेतात, आधुनिक संपर्क साधनांमुळे ते एकमेकांशी चांगला समन्वय ठेवतात आणि स्थलांतरीतांकडून टप्प्याटप्प्याने पैसे घेऊन त्यांना आवश्यक तेवढी माहिती देत राहतात. एकदा या मानवी तस्करी करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकले की स्थलांतरीतांना आपल्याकडचे असलेले सर्व पैसे देण्यावाचून पर्याय उरत नाही. पैशाला कोणत्याही सीमा नसतात हे तर जागतिक वास्तव आहे.

जागतिकीकरणामुळे जे देश स्थलांतरीतांसाठी आपल्या देशाच्या सीमा खुल्या ठेवतात तिथे मानवी तस्करी होत नाही. तर जे देश आपल्या सीमा बंदीस्त ठेवतात तिथे या तस्करीला जास्त प्रोत्साहन मिळते.

दुसऱ्या जगातील स्थलांतरीतांच्या पाचव्या भागात आम्ही तुम्हाला या व्यवसायाचे क्रूर स्वरुप दाखवणार आहोत. सीमांवरच्या निर्बंधांमुळे या तस्करांचा व्यवसाय कसा वाढत जातोय आणि स्थलांतरीतांच्या वाढत्या संख्येमुळे या व्यवसायात किती कमाई केली जाते, हे यात सांगितले गेले आहे. या भागातील कथांमधून तुम्हाला हे गुन्हेगारी जग आणि त्यातील सत्ताकेंद्र कसे चालतात. अनेकजण तर हजारो डॉलर आधी घेतात आणि मोठमोठ्या शहरांमध्ये पैशांच्या देवाणघेवाणीचे काम करतात. यामध्ये त्यांना स्थानिक पातळीवरील भ्रष्ट अधिकाऱ्यांची मदत होते.

यामध्ये आम्ही एका कहाणीत एक हॉटेलचालक आहे जो स्थलांतरीतांना सीमेजवळ मदत करतो. पण नंतर तोच या मानवी तस्करीच्या व्यवसायातील प्यादे असल्याचे आपल्याला दिसते. त्याचबरोबर इतरही लोकांच्या कथा यात आहेत. इक्वेडॉरमध्ये स्थलांतरीतांचे बेकायदा आगमन आणि कोणत्या गुप्त मार्गाने ते जातात याची माहिती त्या त्या भागातील अधिकाऱ्यांना असते..

एवढेच नाही तर, स्थलांतरीतांना मदत करणारे त्यांचे मित्र आणि परिचितांना स्थानिक पोलीस एवढा त्रास देतात की चोर सोडून संन्याशाला फाशी असा प्रकार तिथे दिसतो. अर्जेंटिनामधील सेनेगलच्या 3 नागरिकांच्या कहाणीमधून तुम्हाला हे वास्तव दिसेल.

स्थलांतरीतांसाठी दरवाजे बंद

आज कोरोनामुळे संपूर्ण जगात मृत्यूचा हाहाकार सुरू आहे. जगभरातील देशांनी त्यांच्या सीमा बंद करुन टाकल्या आहेत. त्यामुळे विनाकागदपत्र आणि पैसे नसलेल्या स्थलांतरीतांची परिस्थिती अतिशय चिंताजनक झाली आहे. यापैकी काहींना डिटेन्शन सेंटरमध्ये बंद करण्यात आलं आहे. सॅनदिआगो, कॅलिफोर्निया या ठिकाणी अनेक स्थलांतरीत आश्रय देण्याच्या विनंतीवर न्यायालय कधी निर्णय देईल याची वाट पाहत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचे स्थलांतरीतांविषयीचे तिरस्काराचे धोरण पाहता कोरोना संकटानंतरही स्थलांतरींना आश्रयासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

मेक्सिकोमधील टोनाला इथं झालेल्या बोट दुर्घटनेत बचावलेला कॅमेरुनचा नागरिक मॅक्ससेलो याची कहाणी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तो मे महिन्याच्या मध्यावर ओटी मेसामध्ये पकडला गेला होता. तोपर्यंत तिथे कोरोनाचे 41 रुग्ण सापडले होते.

कोरोनाच्या संकटकाळात जे स्थलांतरी लोक सीमेवर येत आहेत, त्यांची कोरोना चाचणी न करताच त्यांना तातडीने मेक्सिकोला रवाना केले जात आहे. आता या लोकांना त्यांच्या त्यांच्या देशात पाठवण्याचे काम मेक्सिको स्वत:हून करत आहे किंवा त्यांना त्यांचे मार्ग शोधण्यासाठी सोडून दिले जात आहे. त्यांचे पुढे काय होणार, त्यांनी कोणत्या कारणांसाठी आपला देश सोडला होता, याचा कोणताही विचार केला जात नाहीये.

यात भरीस भर म्हणजे अमेरिकेत नेहमीप्रमाणे डिटेन्शन सेंटरमधून स्थलांतरीतांची कोणतीही आरोग्य चाचणी न करता त्यांची हकाटपट्टी केली जात आहे. होस्टनमधून हकालपट्टीनंतर एक कोरोनाबाधीत मेक्सिकन नागरिक अशाच एका मदत छावणीत पोहोचला आणि त्याच्यामुळे इतरांनाही संसर्ग झाला. अनेक स्थलांतरीतांना प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर त्यांना ग्वाटेमाला इथं पाठवण्यात आले. त्यातील अऩेकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. आशिया आणि आफ्रिकेतून अमेरिकेत आलेल्या अनेक स्थलांतरीतांना त्यांच्या त्यांच्या देशात पाठवल्याचे वरवर दाखवले जात आहे. अनेक स्थलांतरीत जे प्रवासात होते, त्यांना कोरोनामुळे लागू कऱण्यात आलेल्या निर्बंधांमुळे मदत शिबिरांमध्ये थांबावे लागले आहे किंवा सीमेजवळच्या शहरांमध्ये अतिशय हलाखीच्या परिस्थितीत त्यांना रहावे लागत आहे. मी गेल्यावर्षी जानेवारीमध्ये कमलला दक्षिण अमेरिकेतील ज्या नेकोक्ली शहरात भेटले होते, तिथे 14 आफ्रिकन लोकांसह 294 लोकांना निवारा मिळण्यासाठी 2 महिने वाट पाहावी लागली.

पर्यावरणीय बदल, आर्थिक जागतिकीकरण यातून निर्माण झालेल्या जागतिक समस्यांना कोरोना विषाणूने आणखी गंभीर बनवले आहे. यामुळे सध्याच्या स्थलांतराच्या धोणांमधील विरोधाभास तर दिसलाच आहे. पण या समस्यांमुळे ज्यांनी आपला देश सोडला त्यांचेच कोरानामुळे हाल होत आहेत. जे लोक जीव वाचवण्यासाठी धावतायत त्यांना विविध देशांच्या सीमांवर त्या त्या देशांच्या गोंधळ निर्माण करणाऱ्या आणि लहरी निर्णयांचा फटका बसतोय. एवढेच काय तर निर्वासितांना स्वसंरक्षणाचा अधिकारही नाकारला जातोय. त्यांना एखाद्या गुन्हेगारासारखी वागणूक मिळते आहे. स्वत:च्या देशातील नागरिकांच्या सुरक्षेच्या नावाखाली विविध देश स्थलांतरीतांविरोधात जी धोरणं राबवत आहेत, त्यामुळे जागतिक संकटात भर पडते आहे. एवढेच नाही तर या देशांमध्ये अशा लोकांना नाकारले जाते आहे जे चांगल्या भवितव्याच्या शोधात निघालेल्या मानवी वृत्तीचे प्रतीक आहेत.

Migrants from Another World हा एक बहुराष्ट्रीय आणि अनेकांच्या सहभागाने तयार झालेला रिपोर्ट आहे. या प्रोजक्टला Fundación Avina आणि Seattle International Foundation कडून विशेष सहाय्य मिळाले. यात कोण कोण सहभागी होते त्यांची नावे खाली दिली आहेत.

Latin American Center for Investigative Journalism (CLIP in Spanish)

Occrp, Animal Político (Mexico)

Chiapas Paralelo and Voz Alterna (Mexico)

Univision Noticias Digital (United States)

Revista Factum (El Salvador)

La Voz de Guanacaste (Costa Rica)

Profissão Réporter from TV Globo (Brazil)

La Prensa (Panama)

Revista Semana (Colombia)

El Universo (Ecuador)

Efecto Cocuyo (Venezuela)

Anfibia/Cosecha Roja (Argentina)

The Confluence Media (India)

Record Nepal (Nepal)

The Museba Project (Cameroon)

Bellingcat (United Kingdom).

मारिया तेरेसा रॉन्डेरॉस, संचालक, CLIP

Updated : 12 July 2020 5:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top