Home > मॅक्स रिपोर्ट > पाकिस्तान : इमरान खान यांचं सरकार धोक्यात आलं आहे का?

पाकिस्तान : इमरान खान यांचं सरकार धोक्यात आलं आहे का?

पाकिस्तान : इमरान खान यांचं सरकार धोक्यात आलं आहे का?
X

पाकिस्तान आणि भारत या दोन देशामध्ये स्वातंत्र्यापासून कधीच पटलं नाही. मात्र, एक शेजारील देश म्हणून या देशात शांतता असणं तितकंच गरजेचं आहे. सध्या हा देश मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. त्याच बरोबर पाकिस्तानमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. त्यामुळं पाकिस्तानमधील घडणाऱ्या या घटनांचा एक शेजारील राष्ट्र म्हणून आढावा घेणं महत्वाचं ठरतं.

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान देशाची आर्थिक परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचं मत पाकमधील धार्मिक आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये मोठं आंदोलन सुरु झालं आहे. जमीयत उलेमा ए इस्लामचा प्रमुख मौलाना फजलूर रहमान यांनी काही दिवसापूर्वी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथं मोर्चा काढला होता. यावेळी लाखो लोक या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलकांनी इमरान खान यांच्या विरोधात इस्लामाबाद इथं काही दिवस धरणं आंदोलन केलं. या आंदोलनाचं नेतृत्व करणारे मौलाना फजलूर रहमान यांची एक धार्मिक नेते म्हणून पाकिस्तानमध्ये ओळख आहे.

या आंदोलनानंतर मौलाना फजलूर रहमान यांनी पून्हा एकदा पंतप्रधान इमरान खान यांच्यावर हल्ला चढवला आहे.

‘या सरकारचे मोजकेच दिवस राहिले आहेत. या सरकारची मूळं तुटली आहेत. आणि यांचे आता काहीच दिवसच बाकी आहेत. रहमान यांनी दावा केला आहे की, ‘तहरिक ए इंसाफ’ चे नेतृत्व करणारे इमरान खान यांचे सरकार आता जाणार आहे’.

पाकिस्तान मधील विरोधी पक्ष नेते आता इमरान खान यांच्यावर जोरदार हल्ले करत आहेत. विरोधी पक्ष नेत्यांच्या मते इमरान खान यांनी निवडणुकी दरम्यान केलेल्या घोषणा खोट्या ठरल्या आहेत. त्यांचे सरकार सत्तेत आल्यापासून देशाची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

Courtesy : Social Media

रहमान यांच्या आंदोलनात सहभागी झालेले पाकिस्तानी नागरिक

यापूर्वी इमरान खान यांनी फजलूर रहमान यांचं नाव न घेता विरोधी पक्षावर निशाणा साधला होता. विरोधी पक्षातील नेत्यांना त्यांनी दरोडेखोर म्हटलं होतं. तसंच रहमान यांनी इस्लामाबाद इथं काढलेल्या मोर्चाला ‘सर्कस’ असं संबोधलं होतं. आंदोलनकर्ते इस्लामाबाद एक महिना देखील थांबू शकले नाही. इमरान खान यांनी या आंदोलनाची या आंदोलनाची खिल्ली उडवली होती.

रहमान यांच्या आंदोलनाचा हेतू चूकीचा होता, म्हणूनच त्यांनी अशा प्रकारच्या आंदोलनाची मदत घेतली. असं इमरान यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानी टिव्ही जिओ न्यूजच्या वृत्तानुसार रहमान यांनी इमरान खान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

इमरान खान यांनी आपल्या बहिणीला ‘राष्ट्रीय सलोखा अध्यादेश’ चे काम दिले आहे. आम्हालाही एक शिवनकामाची अशी मशिन द्या, जी एका वर्षामध्ये ७० अब्ज रूपये कमवू शकेल’.

ऑक्टोबर २००७ मध्ये पाकिस्तान सरकारने एक राष्ट्रीय सलोखा अध्यादेश पारीत केला आहे. या अध्य़ादेशात भ्रष्टाचार, मनी लाँड्रिंग, हत्या आणि दहशतवादातील आरोपींना, राजकीय पक्षाच्या नेत्यांना आणि नोकरशहांना त्यांच्या शिक्षेतून सुट देण्याची तरतूद केली आहे.

दरम्यान रहमान यांनी जेव्हा इस्लामाबादला धरणं आंदोलन केलं होतं. तेव्हा, त्यांनी इमरान खान यांना दोन दिवसात राजीनामा देण्यास सांगितले होते. रहमान यांच्या मते सर्व देशांची अर्थव्यवस्था वाढत आहे. फक्त पाकिस्तानची अर्थव्यवस्था घसरत आहे.

रहमान यांनी या मोर्चामध्ये इमरान यांना इशारा दिला होता की, जोपर्यंत इमरान खान राजीनामा देत नाही आणि नवीन निवडणुका जाहीर होत नाही. तो पर्यंत त्यांचे समर्थक इस्लामाबादमधून माघार घेणार नाहीत.

Courtesy : Social Media

इमरान खान यांच्याविरोधात मोर्चा काढणारे मौलाना फजलूर रहमान आणि पाक मधील नेते

त्यानंतर इमरान खान यांच्या सरकारने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. पण रहमान यांनी बोलण्यास नकार दिला. रहमान यांच्या शक्तीप्रदर्शनाची चर्चा पाकिस्तानमध्येच नाही तर जगातील अनेक देशांतही झाली. पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी यांनीही रहमान यांचे समर्थन केले. १३ नोव्हेंबरला त्यांनी हा धरणा संपवला.

पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, पाकमध्ये एक किलो टोमॅटोची किंमत ३०० रुपयांवरून ३५० रुपयांवर गेली आहे. पाकिस्तानमधील दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढत असून जनतेत प्रचंड संताप आहे. तसंच इतर भाज्याही अत्यंत महाग झाल्या आहेत. कराची आणि इतर मोठ्या शहरांमध्ये टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. या संदर्भात सोशल मीडियावरील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

प्रश्न हा आहे की, काश्मिरींचे आपणच सर्वात मोठे तारणहार आहे. असं सांगणाऱ्या इमरान खान यांना देशातील आर्थिक, राजकीय परिस्थिती सुधारण्यास वेळ का मिळाला नाही? ते सुधारण्यास इमरान खान सक्षम नाहीत का?

त्यातच एशियन डेवलपमेंट बॅंके च्या अहवालानुसार पाक ची जीडीपी घसरत चालला आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये पाकचा जीडीपी २.८ टक्के राहील. एडीबीच्या अहवालात पाकिस्तानमधील महागाई येणाऱ्या काळात आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडेल. असं म्हटलं आहे. त्यातच आता ही तूट कमी करण्यासाठी पाकिस्तान सरकार कर वाढवत आहे.

पाकिस्तानचा रुपया सातत्याने घसरत आहे. यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. मनी लाँडरिंग आणि टेरर फंडिंगवर नजर ठेवणाऱ्या वैश्विक जागतिक संघटनेची पाकिस्तानवर करडी नजर आहे. त्यातच एफएटीएफ ने (फायनेंशियल एक्शन टास्क फ़ोर्स) पाकिस्तानला फेब्रुवारी २०२० पर्यंत त्याच्या निर्देशांचे पालन करण्याचा कडक इशारा दिला होता. एफएटीएफने म्हटले आहे की, पाकिस्तान दहशतवादासाठी असलेला आपला आर्थिक पाठिंबा थांबविण्यात पूर्णपणे अयशस्वी झाला आहे.

Updated : 21 Nov 2019 11:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top