Home > मॅक्स किसान > मराठवाडा - दुष्काळाच्या झळा, ऊस उत्पादक आणि ऊसतोड मजुराचं दुष्काळानं कंबरड मोडलं 

मराठवाडा - दुष्काळाच्या झळा, ऊस उत्पादक आणि ऊसतोड मजुराचं दुष्काळानं कंबरड मोडलं 

मराठवाडा - दुष्काळाच्या झळा, ऊस उत्पादक आणि ऊसतोड मजुराचं दुष्काळानं कंबरड मोडलं 
X

सर्वात सुखी शेतकरी म्हणून ऊस उत्पादकाची ओळख होती. मात्र, गेल्या काही वर्षांतील सततच्या दुष्काळामुळं मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकरी देशोधडीला लागलाय. लातूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी हा निसर्गाच्या दृष्टचक्राचा आधीच बळी ठरलेला आहे त्यातच साखर कारखाना आणि सरकारकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्यानं पुरता निराश झालाय. सरासरी पाऊस पडल्यावर एकरी ५०-६० टन ऊसाचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला आता एकरी ५-६ टन उत्पादन मिळू लागलंय. परिणामी ऊसतोडणी मजूरांना पुर्वी मिळणारी ५०० रूपयांची मजुरीही आता १५० रूपयांवर आलीय.

दोन वर्षांपुर्वी लातूर जिल्हा अचानक चर्चेत आला तो रेल्वेनं पाणीपुरवठा झाल्यानंतर. दुष्काळानं लातूरला दिलेला तो धोक्याचा इशारा होता. मात्र, त्यातून प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सरकारनं कुठलाही धडा घेतल्याचं दिसत नाही. मॅक्समहाराष्ट्रनं लातूर तालुक्यातील एकुर्गा या गावाला भेट दिली. तिथल्या ऊसउत्पादक शेतकरी, शेतमजूर आणि तरूणांशी संवाद साधला. या संवादातून ऊसउत्पादक आणि ऊसतोडणी मजूरांची विदारक परिस्थिती समोर आलीय.

ऊस उत्पादकांची आर्थिक परिस्थितीत बिघडली

ज्या वर्षी सरासरी इतका पाऊस झाला त्यावर्षी इथला शेतकरी ऊसाचं प्रति एकरी ५०-६० टन उत्पादन घेतो. मात्र, सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्यानं यावर्षी प्रतिएकरी ५-६ टन ऊसाचं उत्पादन होईल, अशी भीती ऊस उत्पादकांनी वर्तवलीय. ऊस उत्पादकांना अद्यापही शासनाकडून नुकसानभरपाई, विम्याची रक्कम मिळालेली नसल्याचं शेतकरी सांगतात. ऊसाच्या उत्पादनात झालेली ही घट यापुर्वी कमी होती, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून एकूण ऊसापैकी सुमारे २० टक्के ऊस हा वाळलेला म्हणून कपात करूनच शेतकऱ्यांना पैसे दिले जाणार असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. ऊस तोडणी मजुरांसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरशः पिण्यासाठी पाणी विकत आणावं लागतंय. त्यातच लातूर जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असतांनाही फक्त ६ कोटी ६३ लाख रूपयेच मंजुर झालेले असून त्यापैकी पहिला हप्ता म्हणून ३ कोटी ३१ लाख रूपये मिळणार आहे.

ऊसतोडणी मजुरांना तुटपुंजी मजुरी

ज्यावर्षी पाऊस चांगला झाला त्यावर्षी ऊसतोडणी मजूरांना प्रतिदिन ५०० रूपये मजूरी मिळायची. आता दुष्काळामध्ये हीच मजुरी १५० रूपयांपर्यंत आली आहे. रोजगाराचे इतर पर्यायच उपलब्ध नसल्यानं आहे ती ऊसतोडणी करून हे मजुर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.

पाण्याचा प्रश्न गंभीर

जिथं पिण्याचा पाण्याचा प्रश्नचं गंभीर आहे तिथं शेती आणि जनावरांची काय बिशाद. ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांसाठी अक्षरशः शेतमालकाला पिण्याचं पाणी विकत आणावं लागतंय. पाण्यामुळं जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट होत चाललाय. या जनावरांना पिण्यासाठी गावपातळीवर पाणीच फारसं उपलब्ध नाही, अशा परिस्थितीत ही जनावरं जगावायची कशी असा प्रश्न निर्माण झालाय. अशा परिस्थितीत पुढील ५ महिने कसे काढायचे असा भीषण प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना पडलाय.

शासनाची मदत मिळत नाही - शेतकरी

सततच्या दुष्काळामुळं इथल्या शेतकऱ्यांना बँकाही आता कर्ज द्यायला धजावत आहेत. त्यामुळं शेतकरी आणखीच चिंताग्रस्त होत चाललाय. दुष्काळासाठी शासनाच्या विविध योजना, मदत आहेच कुठे ? या सर्व गोष्टी कागदोपत्रीच आहेत, असा थेट आरोपच एकुर्गा इथले शेतकरी करू लागलेत. जिल्ह्याला जाहीर झालेली ६ कोटी ६३ लाख रूपयांची दुष्काळी मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचं शेतकरी सांगत आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागात नैराश्येचं वातावरण वाढत चाललंय, त्यातूनच मग चोरी आणि व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढत चालल्याचं स्थानिक युवकांचं मत आहे.

Updated : 10 Feb 2019 11:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top