Home > News Update > गदिमा आम्हाला माफ करा !

गदिमा आम्हाला माफ करा !

गदिमा आम्हाला माफ करा !
X

महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी.... ज्यांच्या लेखणीतून अनेक पिढ्यांना आनंद देणारी गीतं निर्माण झाली, महाराष्ट्राचा साहित्यिक इतिहास ज्यांनी सोनेरी केला ते गदिमा अर्थात ग.दि. माडगुळकर..... पण मराठी माणसाला अजरामर काव्याचा वारसा देणाऱ्या या महाकवीच्या जन्मगावी असलेल्या स्मारकाची दूरवस्था झालीये. ज्यांनी मराठी रसिक मनाला एवढं भरभरुन दिलं त्यांच्या नावानं उभं राहिलेलं एक स्मारकही आपल्याला जपता येऊ नये हे वास्तव आहे.

स्मारकाची दूरवस्था

ग. दि. माडगुळकर यांच्या जन्मगावी शेटफळे इथे 2008 साली दिवंगत पतंगराव कदम, जयंत पाटील तत्कालीन आमदार सदाशिवराव पाटील यांच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन झाले होते. स्मारकाची इमारत उभी राहिली मात्र जाहीर केलेल्या आराखड्यातील अनेक कामे सुरुदेखील झाली नाहीत. आता तर या स्मारकाच्या इमारतीची एवढी भयंकर अवस्था झालीये की इथे नाकाला रुमाला लावल्याशिवाय फिरतासुद्धा येत नाही.

या स्मारकातून गदिमांचा साहित्य सहवास घडावा, त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा, या ठिकाणी त्यांचे साहित्य उपलब्द्ध व्हावे अशी अपेक्षा होती. मात्र या थोर साहित्यिकाच्या स्मारकाच्या भिंतींचा वापर लघुशंका आणि शौच करण्यासाठी होत असल्याचे धक्कादायक वास्तव मॅक्स महाराष्ट्रने उघड केले आहे. या अवस्थेत तिथे काही क्षण थांबणेही जिकीरीचे होते. या स्मारकातील शौचालय बंद अवस्थेत असून येथे उघड्यावर प्रातः विधी आटोपले जात आहेत. हागणदारी मुक्त गाव पुरस्कार मिळालेल्या या गावातील हे भयानक वास्तव आहे. स्मारकातील खिडक्यांच्या काचा फुटलेल्या असून अभ्यासिका बंद अवस्थेत आहेत. एकही पुस्तक या स्मारकात दिसून येत नाही.

गावकऱ्यांचा स्मारकाच्या संरक्षक भिंतीला विरोध?

याबाबत या गावातील विद्यार्थी अथर्व गायकवाड सांगतो, “ गदिमांच्या जन्म दिवशी फक्त या ठिकाणी लोक येतात इतर दिवशी कोणीही येत नाही. इथं स्वच्छता व्हावी, कंपाऊंड करावे, लोकांनी इथं नेहमी यावे, गावातील मुलांसाठी इथं वाचनालय असावे,” अशी अपेक्षाही तो व्यक्त करतो.

अतुल गुरव हा विद्यार्थी म्हणतो, “जेंव्हा आम्ही मुंबईसारख्या ठिकाणी जातो तेंव्हा माझ्या गावाचे फक्त नाव सांगितल्याने कुणी ओळखत नाही, मात्र गदिमांची ओळख सांगितल्यावर सर्व ओळखतात. लोकांना गदिमांविषयी एवढा आदर आहे, पण गावतल्या लोकांना नाही. इथे घाण केली जाते, काचा फोडल्या आहेत सरकारने हे स्मारक स्वच्छ करुन इथं ग्रंथालय उभे करावे ही माझी सरकारला विनंती.”

या स्मारकाच्या दूरवस्थेबाबत गावकऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा इथले एक सामाजिक कार्यकर्ते राहुल गायकवाड सांगतात, ' इथे 1 ऑक्टोंबरला जयंती दिनी कार्यक्रम होतो आणि यात पुढच्या जयंतीपर्यंत स्मारक पूर्ण करण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र अनेक वर्षे उलटली तरी कामं होत नाहीत. या ठिकाणी आराखड्यात ठरलेली कामंसुद्धा झालेली नाहीत.”

खासदार निधी गेला कुठे?

याहून धक्कादायक बाब म्हणजे, या स्मारकाच्या जवळ आम्हाला एक झाकलेला बोर्ड आढळला. त्यावरचे कापड आणि नंतर चिकटवलेले कागद काढल्यानंतर धक्कादायक माहिती पुढे आली. खासदार संजय पाटील यांच्या खासदार निधीतून इथे स्मारकाच्या गेटच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. यावर विशाल काकासो जाधव असे ठेकेदाराचे नाव आहे. त्या जागेवर असे कोणतेच काम दिसून आलेले नाही.

यावर आटपाडीच्या सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या सहाय्यक अभियंत्यांना विचारणा केली तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इथे जमिनीचा वाद आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा या कामाला विरोध आहे. स्मारक समितीचे कार्यवाहक चंद्रकांत पाटील सांगतात या गावात एकाही व्यक्तीचा या स्मारकाला आणि त्यांचा कंपाऊंडला विरोध नाही. 53 गुंठे जागा महाराष्ट्र सरकारने स्मारकाला दिलेली आहे.

इथे कुणाची वैयक्तिक जागा नसल्याने गावकऱ्यांच्या विरोधाचा प्रश्नच नाही असंही ते सांगतात. याबाबत खासदार संजय पाटील यांना संपर्क साधला तेव्हा माहिती घेऊन प्रतिक्रिया देतो असं त्यांनी सांगितलं पण अजूनही त्यांना माहिती मिळालेली दिसत नाही. यावर सहाय्यक अभियंत्यांना भेटण्याचा आंम्ही प्रयत्न केला मात्र त्यांनी भेटण्यास नकार दिला. मीडीयाशी न बोलण्याचे सर्क्युलर आले असल्याने बोलणार नाही असे त्यांनी फोनवर सांगितले.

पालकमंत्र्यांचं स्मारकाच्या दुरूस्तीचं आश्वासन

तत्कालीन मंत्री आणि सध्या सांगलीचे पालकमंत्री असलेल्या जयंत पाटील यांनी या स्मारकाचे उद्घाटन केले होते. ते आता पुन्हा सत्तेत आहेत. आम्ही त्यांना याबाबत विचारले असता स्मारकाची दूरवस्था झाल्याचे त्यांनीही मान्य केले. त्यावर लवकरच कारवाई करुन स्मारक व्यवस्थित करु असं आश्वासन त्यांनी दिले आहे. आता या महाकवीच्या स्मारकाची आठवण सत्ताधारी ठेवतात का ते पाहावे लागेल.

Updated : 27 Feb 2020 2:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top