Home > मॅक्स रिपोर्ट > पारधी समाजातील तिहेरी हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला!

पारधी समाजातील तिहेरी हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला!

पारधी समाजातील तिहेरी हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला!
X

बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या मांगवडगाव परिसरात, अत्यंत खळबळजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडलीय. जमिनीच्या वादातून पारधी समाजाच्या कटुंबावर हल्ला चढवत तीन व्यक्तींची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आलीय. यात एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

केज तालुक्यातील युसूफ वडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील, मांगवडगाव येथील भटक्या जमातींपैकी पारधी समाजातील बाबू पवार आणि निंबाळकर कुटुंबात मागील काही वर्षां पासून गट नंबर १७१/३ यातील १० एकर १२ गुंठे जमिनीचा वाद सूरु आहे. त्यांच्यात अनेक वेळा वाद देखील झाला आहे. अनेकवेळा मारहाण देखील झालेल्या आहेत. तसेच त्यांच्यात अनेक वेळा एकमेकांवर पोलीस केस देखील केलेल्या आहेत. या वादामुळेच पारधी समाजाचे पवार कुटूंब मागील काही वर्षांपासून अंबाजोगाई येथील यशवंतराव चौकात राहत होते.

मात्र, गावातील उपसरपंच व इतरांनी पवार कुटुंबाची समजूत काढून, गावी येण्यास सांगितलं. असं पीडित कुटुंबातील व्यक्तीचं म्हणणं आहे. यामुळं दि.१३ मे रोजी बाबू शंकर पवार आणि त्यांची मुले प्रकाश बाबू पवार, संजय बाबू पवार, धनराज बाबू पवार, शिवाजी बाबू पवार, दादूली संजय पवार व त्यांचे कुटुंबातील लहान मोठे असे एकूण वीस व्यक्ती हे एका ट्रॅक्टर मधून मांगवडगाव येथील शेतात आले.

आता ते जमीनीवर ताबा करतील म्हणून निंबाळकर कुटुंबातील सर्वांनी कट केला आणि ते रात्री दहाच्या दरम्यान सर्व मिळून हातात काठ्या कुऱ्हाडी, लोखंडी गज व तलवारी घेऊन शेतात गेले. आणि ज्या शेतात हे पारधी समाजाचं कुटूंब थांबलं होतं. तिथे जाऊन त्यांच्यावर हल्ला केला.

हा हल्ला एवढा पूर्वनियोजित होता की, पारधी कुटुंबाला पळून जाता येऊ नये किंवा त्यांनी पोलिसांना माहिती देण्यासाठी जाता येऊ नये. म्हणून पवार कुटुंबाकडे असलेल्या तीन मोटार सायकलींना आग लावून त्यांची नासधूस केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळं पवार कुटूंब हे जीव वाचविण्यासाठी सैरा वैरा पळत असताना त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर सपासप कुऱ्हाड, तलवार व लोखंडी गजाने वार करत ट्रॅक्टर च्या हेड लाईटच्या उजेडा समोर घेऊन मारले.

यात ६० वर्षीय बाबू शंकर पवार व त्यांची मुले प्रकाश बाबू पवार (वय ४५ वर्ष), संजय बाबू पवार (वय ४० वर्ष) हे तिघे बाप लेक जागीच मृत्युमुखी पडले. तसेच दादूली संजय पवार हिला देखील मारहाण करण्यात आल्यानं ती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना एवढी भीषण होती की, तिन्ही मृतदेह हे वेगवेगळ्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

या घटनेत धनराज बाबू पवार, शिवाजी बाबू पवार आणि कुटुंबातील लहान मुले ही जिवाच्या आकांताने पळून गेली म्हणून ते वाचले.

याची माहिती मिळताच दि.१४ मे ला मध्यरात्री पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, स्वाती भोर, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, युसुफवडगाव पोलीस स्टेशनचे सपोनी आनंद झोटे, केजचे पोनी प्रदीप त्रिभुवन हे घटना स्थळावर पोहोचले. या हत्याकांड प्रकरणी 12 लोकांना संशयित म्हणून रात्रीच ताब्यात घेतले आहे. दरम्यान या निर्घृण हत्याकांडाची माहिती मिळताच परिसरातील पारधी समाजाचे सुमारे दोनशे ते अडीचशे महिला व पुरुष एकत्र आले. केज येथील उपजिल्हा रुग्णालयात या हत्याकांडाबद्दल त्यांनी प्रचंड आक्रोश व रोष व्यक्त केला.

दरम्यान काल पासून पीडित कुटुंबांनी मृतदेह ताब्यात घेतले नव्हते..कारण उपसरपंच आणि पाटलांवर कारवाई करा अशी मागणी पवार कुटुंब करत होते.

‘त्या गावी आता आम्हाला जायचं नाही..आम्हाला इतर गावी गायरान जमीन द्या’ अशी मागणी त्यांनी केली. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत फोनवरून झालेल्या संभाषणानंतर पीडित कुटुंबांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेत...

मागील वीस वर्षांपूर्वी निंबाळकर कुटूंबातील मोहन निंबाळकर हे बेपत्ता झाले होते आणि त्यांचा खून हा बाबू पवार व त्याच्या कुटुंबीयांनी केला असा आरोप पवार कुटुंबावर होता. त्या आरोपातून पवार कुटूंबियांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता देखील झालेली आहे. मात्र, अद्याप पर्यत मोहन निंबाळकर यांचा तपास लागलेला नाही. अशी चर्चा गावात आहे.

विशेष बाब म्हणजे दि.१३ मे रोजी मांगवडगाव येथे येण्या पूर्वी हे पवार कुटुंबातील सदस्य हे युसूफ वडगाव पोलीस स्टेशन येथे भेटून आले असल्याची माहिती धनराज आणि शिवाजी यांनी दिली असून या बाबत पोलिसांनी वेळीच दक्षता घेतली असती तर कदाचित तिघांचे प्राण देखील वाचू शकले असते.

ती जमीन आता काय कामाची ?

या गट नंबर मधील दहा एकर जमीन ही पवार कुटुंबाच्या ताब्यात आहे. आणि उर्वरित वादग्रस्त दहा एकर बारा गुंठे जमीन ही निंबाळकर यांच्या ताब्यात असून काही महिन्यांपूर्वी या जमिनीचा निकाल हा पवार यांच्या बाजूने लागला असल्याची माहिती धनराज पवार यांनी दिली. म्हणून ज्या जमिनीसाठी हत्याकांड झाले त्या पैकी तिघांचा खून झाला तर निंबाळकर हे कारागृहात जातील त्यामुळे पुन्हा ही जमीन पडीकच राहणार आहे. त्यामुळं ज्या जमिनी मुळं ही जमीन काय कामाची असा सवाल या कुटुंबियांनी केली आहे.

Updated : 16 May 2020 1:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top