Home > News Update > ट्रोलसंस्कृतीचं हस्तांतरण

ट्रोलसंस्कृतीचं हस्तांतरण

ट्रोलसंस्कृतीचं हस्तांतरण
X

गेल्या ५-६ दिवसांमध्ये राज्यातील प्रमुख भाजप नेत्यांना फेसबुकवर 'ट्रोल' करण्यात आलं. हे ट्रोलिंग आजही सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, गिरीश महाजन, संभाजी पाटील निलंगेकर, राम कदम, श्वेता महाले यांच्यासह अनेक नेत्यांना या ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

राम कदम, सुधीर मुनगंटीवार यांना तर ट्रोलिंगमुळे आपले व्हिडीओ डिलीट करावे लागले. यापैकी राम कदम यांनी मर्यादा सोडून कमेंट्स करणाऱ्यांवर सायबर ऍक्ट अंतर्गत कारवाई केली जाईल असा इशाराही दिला होता. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही.

या ट्रोलिंगनंतर भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या. ट्रोल करणारे चार आहेत, आम्हाला पाठिंबा देणारे लाख आहेत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. भाजपच्या नेत्यांना ट्रोल करणारे लोक भाडोत्री असल्याचं विनोद तावडे यांनी म्हटलंय. मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि विनाकारण माझ्या वाट्याला गेलेल्याला मी सोडतही नाही, असा इशारा सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.

फेसबुक ग्रुपमार्फत चालवली जात आहे मोहीम

फेसबुकवरच्या या मंडळींनी एक फेसबुक ग्रुप तयार केला आहे. 'एक करोड हसणाऱ्यां लोकांचा ग्रुप' या नावाच्या ग्रुपमध्ये सध्या ७ हजारांहून जास्त सदस्य आहेत. ग्रुप चालकांनी या ट्रोलिंगला 'भाजप आयटी सेल विरोधातील ऑनलाइन आंदोलन' असं नाव दिलंय. सोबतच नेमकं काय करायचं याबाबत एक १० सूत्री कार्यक्रम निश्चित केलाय.

भाजपच्या एखाद्या नेत्याने फेसबुकवर एखादी पोस्ट केली, व्हिडीओ, फोटो काही अपलोड केला की त्याची लिंक या ग्रुपमध्ये टाकली जाते. नंतर ग्रुपमधील सदस्य त्या पोस्टवर जाऊन रिऍक्ट आणि कमेंट्स करतात. भाजप नेत्यांच्या पोस्ट, फोटो, लाईव्ह यावर नेटीझन्स हसण्याच्या स्माईली टाकत आहेत. 'हा-हा' रिऍक्ट करतायत. कमेंट बॉक्समध्ये हजारोंच्या संख्येने कमेंट्स पडत आहेत. कधी वैयक्तिक तर कधी राजकीय गोष्टींवरून या नेत्यांची खिल्ली उडवली जातीय. पोस्टच्या एकूण लाईक्सपैकी 'हा-हा' रिऍक्शन कसे जास्त आहे असं सांगून ही मंडळी स्वतःची पाठ थोपवून घेत आहेत.

महाविकास आघाडीचे समर्थक

ही सर्व मंडळी कोणत्या एका पक्षाशी संबंधित नाहीत. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या समर्थकांचा समावेश आहे. अनेक तर जणांचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातील बहुतांश अकाऊंट्स खरे आहेत. यात फेक अकाऊंट्सची संख्या फार कमी आहे. यातील अनेक जण उत्स्फूर्तपणे हे काम करत आहेत.

'कोरोनासारख्या दैवी संकटसमयी पण भाजपवाले महाराष्ट्रद्रोही राजकारण करत असतील तर त्यांनी जे पेरलं आहे ते त्यांना व्याजासकट परत देण्याची वेळ आली आहे,' असं या नेटिझन्सच्या फेसबुक ग्रुपवरील एका पोस्टमध्ये लिहिलंय.

परतीचा पाऊस...

खरं तर 'सोशल ट्रोलिंग'चा उदय भाजप सरकारच्या काळातला आहे. राज्यात भाजपची सत्ता असतांना तत्कालीन सरकारला प्रश्न विचारणाऱ्या अनेकांना ट्रोल केलं गेलं. यात अनेक पत्रकार, विचारवंत, सामान्य नागरिक होते. सरकारच्या धोरणांवर टीका केली, प्रश्न विचारले तर जीवे मारण्याच्या, बलात्काराच्या धमक्या देणं, अश्लील शिवीगाळ असे अनेक प्रकार घडले आहेत.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये सोशल मीडियाच्या वापरावरुन भाजपवर टीका केली होती. लोकसभा निवडणुकीत भाजपने जे पेरले तेच आता उगवले आहे. खोटी माहिती पसरवण्यासाठी आणि लोकांची मने कलुषित करण्यासाठी भाजपने सोशल मीडिया नावाचे अस्त्र वापरले, तेच आता त्यांच्यावर बुमरँग झाले आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. यासंदर्भात त्यांचं एक व्यंगचित्र चांगलंच गाजलं होतं.

त्यामुळे भाजप सरकारच्या काळात झालेल्या ट्रोलिंगचा वचपा काढण्यासाठी म्हणा, किंवा आणखी काही. काही नेटिझन्सच्या पुढाकारातून हा समूह तयार झालाय आणि तो वाढत आहे.

मागच्या सरकरच्या काळात प्रश्न विचारणाऱ्यांना, विरोधी पक्षाच्या नेत्यांना 'ट्रोल' केलं जात होतं. आताही तेच होतंय. फरक एवढा आहे की राजकीय पक्षांच्या जागा बदलल्या आहेत. लोकशाहीत संवादाला स्थान आहे. संवैधानिक मार्गानेही विरोध दर्शवला जाऊ शकतो.

Updated : 26 April 2020 2:39 AM GMT
Next Story
Share it
Top