Home > मॅक्स रिपोर्ट > Exclusive: महाराष्ट्राला केरळकडून मिळणारी मदत काँग्रेसमुळे रखडली?

Exclusive: महाराष्ट्राला केरळकडून मिळणारी मदत काँग्रेसमुळे रखडली?

Exclusive: महाराष्ट्राला केरळकडून मिळणारी मदत काँग्रेसमुळे रखडली?
X

कोरोनाशी प्रभावीपणे लढा देऊन योग्य नियोजनाद्वारे केरळने देशभरात आदर्श निर्माण केला आहे. केरळ सरकारकडून महाराष्ट्राला कोरोनासंदर्भात मदतही देण्यात आली आहे. पण केरळकडून आणखी मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 3 जुलै रोजी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना पत्र पाठवले. पण कोरोनासारख्या संकटाच्या काळातही या मुद्द्यावरुन राजकारण केलं गेल्याने ही मदत मिळण्यात कसे अडथळे निर्माण झाले याची माहिती मॅक्स महाराष्ट्रला सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 22 जून 2020 रोजी लिहिलेले पत्र केरळच्या मुख्यमंत्र्यांना 3 जुलै रोजी मिळाले. या पत्राला राज्यातील महाविकास आघाडीतील राजकारणामुळे विलंब झाल्याची माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी मॅक्स महाराष्ट्रला दिली आहे. एका वरीष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, “वस्तुस्थिती अशी आहे की, कोरोना संकटाच्या सुरूवातीच्या काळात महाराष्ट्र सरकारने तातडीने काही निर्णय घेतले. 500 अतिरिक्त ICU बेड खरेदी करण्याचा निर्णय 10 जून रोजी एकमताने घेतला गेला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 500 ICU बेड खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडला. त्याचवेळी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीतर्फे मंत्री नवाब मलिक यांनीही हाच प्रस्ताव स्वतंत्रपणे मांडला आणि एकमताने त्यावर शिक्कामोर्तब झाले.”

हा निर्णय झाला त्याच दिवशी ICU बेड्सबरोबर तज्ज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची (ICU तज्ज्ञ, फुफ्फुसांच्या आजाराचे तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, प्रशिक्षित नर्सेस) मदतही केरळकडून मागण्याचा निर्णय़ घेण्यात आला. कोरोना विरोधातल्या या लढ्यासाठी केरळने वैद्यकीय कर्मचाऱ्यांची दुसरी टीम पाठवावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याचा निर्णय़ घेतला. याचबरोबर आरोग्यमंत्री राजेश टोपे हे केरळच्या आरोग्य मंत्र्यांना आणि मुख्य सचिव अजॉय मेहता हे केरळच्या मुख्य सचिवांना स्वतंत्र पत्र लिहिलीत असाही निर्णय झाला.

हे ही वाचा..

सूत्रांनी मॅक्स महाराष्ट्रला दिलेल्या माहितीनुसार, “केरळच्या मुख्यमंत्र्यांना जे पत्र पाठवायचे होते, त्या पत्राचा मजकूर त्याच दिवशी म्हणजे 10 जून रोजीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तयार करायला घेतला. त्याचबरोबर केरळमधून मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कर्मचारी महाराष्ट्राच्या मदतीला पाठवले गेले तर केरळमध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसतर्फे याला विरोध होऊ शकतो, अशी शक्यता लक्षात घेऊन राजकीय पातळीवर खबरदारी म्हणून मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या नेत्यांना केरळमधील काँग्रेस नेत्यांशी संपर्क साधण्याची विनंती केली. केरळमधील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रमेश चेनीथल्ला आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी केरळ सरकारच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रात पाठवण्याच्या निर्णयाला विरोध करु नये, अशी विनंती करण्याचे आवाहन केले.

त्यानुसार काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेल्या अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी केरळमधील काँग्रेस नेत्यांना संपर्क साधला. पण केरळमधील काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या विनंतीला मान दिला नाही. यामुळे 22 जून रोजी तयार झालेल्या पत्राला काँग्रेसच्या असहकार्यामुळे उशिर झाला. खरे पाहता कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत असताना अशाप्रकारे राजकारण न करता मदत करण्याची गरज होती. पण तसे झालेले नाही.

-रेनी अब्राहम

Updated : 8 July 2020 2:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top