Home > मॅक्स रिपोर्ट > ‘लॉर्ड बुद्धा’, तुम्ही सुद्धा?

‘लॉर्ड बुद्धा’, तुम्ही सुद्धा?

‘लॉर्ड बुद्धा’, तुम्ही सुद्धा?
X

अलीकडेच ‘लॉर्ड बुद्धा’ चॅनेलवर गौतम बुद्धांच्या मूर्तीला चमत्कारी मूर्ती भासवून विकण्याची एक जाहिरात सातत्याने अगदी दहा-दहा मिनिटात दाखविली जात आहे. या जाहिरातीत एक इसम या मूर्तीतील किरणं मनशांती देतात, उर्जाशक्ती सोडतात आणि त्यामुळे त्याचा क्रोध शांत होतोय असा दावा करतोय. एका महिलेचा घरगुती तणाव दूर होऊन तिला शांती मिळते. एका मुलाची एकाग्रता वाढून तो परिक्षेत पास होतो. हे सर्वजण या मूर्तीमुळे मानसिक ताणतणावापासून मुक्ती मिळते अशी बडबड करीत आहेत. या मूर्तीसोबत चमत्कारी लॉकेट आणि पदक फ्री आहे. वगैरे.

हे सगळं बघून तीव्र धक्का बसला आहे. ज्या गौतम बुद्धाने कर्मकांडापासून, अंधश्रद्धांपासून मुक्त असा शास्त्रशुद्ध धम्म दिला, त्या धम्मालाच मूठमाती देण्याचा हा अघोरी प्रकार आहे. हे वैचारिक अधःपतन आहे. मानसिक दिवाळखोरी आहे. गौतम बुद्धाचे आणि बाबासाहेबांचे दैवतीकरण करण्याचे जे षडयंत्र केलं जातंय त्याला ‘लॉर्ड बुद्धा’ चॅनेल हातभार लावतेय हे बघून वेदना आणि क्लेश होतोय.

‘लॉर्ड बुद्धा’ चॅनल उभे करण्याकरिता आर्थिक स्थिती बेताची असणाऱ्या बहुजन जनतेने अगदी 10 रुपयांपासून लाखो रुपये या चॅनलला दान दिले आहेत. त्यातून हे चॅनेल उभे करण्यास हातभार लागला आहे. मेन स्ट्रीम मीडिया वंचित बहुजनांच्या न्यूज कव्हर करीत नाही म्हणून आपल्या चळवळीला गती देणारा, प्रबोधन करणारा एक हक्काचा प्लॅटफॉर्म असावा अशी जनभावना त्यामागे होती.

जनतेच्या सहाय्याने हे चॅनेल काही वर्षात उभे राहिले आणि लोकप्रिय झाले. आज हे चॅनल 8/9 राज्यात प्रक्षेपित होते आणि याची व्ह्युअरशीप जवळजवळ आठ करोड असल्याचा दावा केला जातो.

यावर बुद्धधम्मासंबंधी कार्यक्रम आणि बहुजन चळवळीतीळ कार्यक्रम दाखविले जातात. चॅनेल चांगले चालत असताना केवळ अधिक नफा कमविण्यासाठी असल्या प्रकारच्या बाजारू जाहिराती दाखवल्यामुळे चळवळीच्या विचारधारेलाच हरताळ फासला जात आहे. इंडिया टीव्ही, साम टीव्हीसारख्या बाजारू चॅनेल्सच्या पंक्तीत हे चॅनेल आता जाऊन बसले आहे असे खेदाने म्हणावे लागेल.

अशा प्रकारच्या अंधश्रद्धा, वशीकरण, बुवाबाजी, जादूटोणासारख्या कुप्रथांना चालना देणाऱ्या जाहिरातींवर पूर्णपणे बंदी आणणे जरूरी आहे. केवळ तगडा मोबदला मिळतो म्हणून जनतेला अंधश्रद्धांच्या विळख्यात फसवणाऱ्या या जाहीरातींवर बंदी यायला हवी आणि ते दाखवणाऱ्या चॅनेल्सवरही कडक कायदेशीर कारवाई व्हावी. यासंदर्भात ‘लॉर्ड बुद्धा’ चॅनेलकडून खुलासा अपेक्षित आहे. आणि ही जाहिरात त्वरिस्त हटवावी अशी मागणी आहे.

- जयश्री इंगळे

Updated : 24 July 2019 8:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top