…आणि पवारांची मोटबांधणी

12
देशातील तिस-या टप्प्यातील मतदान नुकतेच पार पडले. देशातील मोदी लाट ओसरत असली तरी त्याचा प्रभाव किती कमी झाला आहेय़ हे मतदान होईपर्यंत स्पष्ट होत नव्हते. पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये त्याची झलक पाहायला मिळाली, त्यानंतर दुस-या आणि तिस-या टप्प्यातील मतदानाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केले. देशातील मोदींची लाट ओसरली असून जनता पुन्हा नॉर्मल मोडवर आल्याचे चित्र थोड्याफार फरकाने राज्यासह देशात पाहायला मिळत होते. जनतेच्या मनातील सुप्त मोदी विरोध आणि नवा पर्याय शोधण्याची धडपड ही १७ वी लोकसभा त्रिशंकू असणार याची पूर्वसुचना देणारी ठरते आहे. गेल्या महिनाभरातील या बदलाने अनेक राजकीय उलथापालथीं, घडामोडींना वेग आला आहे. या नव्या चित्रात रंग भरण्यासाठी कुशल आणि वाकबगार राजकीय किमयागाराची गरज आहे. त्यादृष्टीने पाहता देशात सर्वमान्य आणि सर्वांशी समान पातळीवर संबंध असलेले नेतृत्व म्हणजे शरद पवार.
 शरद पवारांना राजकीय वातकुक्कुट म्हटले तर वावगे ठरू नये. राजकीय वारे कोणत्या दिशेला फिरत आहेत आणि त्यादृष्टीने आपल्या पवनचक्कीचे पाते कसे फिरवायचे याची नेमकी माहीती असलेले हे मुत्सद्दी नेतृत्व आहे. या नव्या परिस्थितीत शरद पवार हेच विरोधी पक्षांची अथवा विरोधी मित्रपक्षांची मोट बांधू शकणारे आहेत. हे निश्चित आणि याची संपूर्ण देशातील राजकीय धुरंधरांना कल्पनाही आहे. गोष्ट अत्यंत साधी आहे.
देशात तिस-या टप्प्याचे मतदान सुरू असताना शरद पवार यांनी मुंबईतील य़शवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत एक पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेचा विषय होता ईव्हीएम मशीनमध्ये होणारी अफरातफर आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या ५० टक्के स्लिपसच्या मोजणीचा आग्रह. हा विषय नक्कीच महत्त्वाचा आणि निवडणूकीत होणारी अनागोंदी यावर प्रकाश टाकणारा आहे. त्यासाठी देशातील २३ राजकीय पक्ष न्यायालयाचे दरवाजेही ठोठावत आहेत. ही बाब आपण आता केवळ एवढ्यापूरती पाहून चालणार नाही. तर बदललेल्या राजकीय परिस्थीतीत या ऐक्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले पाहिजे. येणा-या काळात कॉंग्रेस आणि मित्रपक्षांना जर दिडशेच्यावर जागांचा टप्पा गाठता आला तर सरकार स्थापण्याची संधी निर्माण होणार आहे. अशा वेळेस सध्या तोंड फिरवलेल्या सर्व पक्षांशी सन्माननीय चर्चा करण्याची क्षमता आणि कौशल्य असलेल्या शऱद पवारांना अनन्य साधारण महत्त्व आलेले आहे, याचीच झलक या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने पाहायला मिळाली. यावेळी चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले की, शरद पवार हे सर्वमान्य नेते असून आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र आलो आहोत. त्यांचा राजकीय व्यासंग आणि अनुभव तसेच सर्वांशी असलेले सोहार्दाचे संबंध हे याचे कारण आहे. या व्यासपीठावर कॉंग्रेससह, तेलगु देसम पार्टी, डीमके, एआयडीएमके, सीपीएम, सीपीआय, आप, फॉर्वर्ड ब्लॉक यांच्यासह अन्य काही पक्षांचे प्रतिनीधी उपस्थित होते. आज हे पक्ष छोटे किंवा त्यांची सध्याची राजकीय ताकद छोटी वाटते आहे. मात्र, जेव्हा सत्ता स्थापनेसाठी गोळाबेरीज करण्याची वेळ येईल तेव्हा याच पक्षांचे खासदार आणि त्यांची एकत्रित ताकद ही मोठी होवू शकते.
राज्यातही सत्ताबदलाचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. त्यामुळे गेल्या निवडणूकीत कॉंग्रेस राष्ट्रवादीला मिळून दोन अंकी संख्याही गाठता आली नव्हती. त्याच कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या महाआघाडीला राज्यात निम्म्या जागा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थीतीत शऱद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मिळणा-या जागा या पंतप्रधानपदावर दावा करण्यासाठी नक्कीच पुरेशा नसल्या तरी सत्ता स्थापनेत त्या महत्त्वाच्या ठरणार आहेत. पवारांचे राजकीय कौशल्य आणि मोर्चेबांधणी त्यांना या पदापर्यंत नक्कीच घेवून जावू शकते.
आज विरोधात असलेली शिवसेना मराठी माणसाच्या मुद्द्यावर पवारांना पाठींबा देवू शकते. कारण यापुर्वीही राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत शिवसेनेने प्रतिभा पाटील यांना पाठींबा दिल्याचे उदाहरण आहे. एकुणच काय तर २३ मे ला लागणा-या लोकसभेच्या निकालात काही धक्कादायक निकाल लागलेले पहायला मिळाले, भाजपच्या हातून सत्ता निसटताना पहायला मिळाले तर आश्चर्य वाटण्याजोगी परिस्थीती नाही. म्हणूनच शरद पवार या ऐंशीच्या आसपास पोहोचलेल्या नेत्याच्या आकांक्षेला बळ मिळणारी परिस्थीती नाकारता येणार नाही. शरद पवार कदाचित पंतप्रधान होणारही नाहीत पण नव्या सत्तास्थापनेत त्यांच्या महत्त्वाचा वाटा असेल याची ही नांदी आहे.
Comments