Home > News Update > पत्रकार जमाल खशोगी हत्येपुर्वीचा तो अखेरचा संवाद

पत्रकार जमाल खशोगी हत्येपुर्वीचा तो अखेरचा संवाद

पत्रकार जमाल खशोगी हत्येपुर्वीचा तो अखेरचा संवाद
X

पत्रकार जमाल खशोगीच्या (Jamal Khashoggi) क्रूर हत्येला एक वर्ष पुर्ण झालंय. या प्रकरणी थातूरमातूर चौकशी करुन ५ जणांना मृत्युदंड तर ३ जणांना जन्मठेपेची शिक्षा सौदीच्या कोर्टानं सुनावली आहे. ही शिक्षा मुळात फार्स असल्याचं स्पष्ट आहे. सौदीचा राजपुत्र मोहम्मद बिन सलमान याच्या इशाऱ्यावर खशोगीचा बळी घेतला गेला. मात्र सौदी अरेबीया अजूनही हे मान्य़ करायला तयारी नाही. जमाल खशोगी धाडसी पत्रकार होता.

जमालला संपवलं मात्र अंतिम श्वासापर्यंत जमालमधील पत्रकारीता संपली नव्हती. त्याला ठार करतांना मारेकरी आणि जमालमध्ये झालेला अंतिम संवाद रेकॉर्ड झालाय.. त्यातून जमाल नावाचं रसायन काय होत ते आपल्याला कळेल.

२ ऑक्टोंबर २०१८

वेळ- दुपारची

स्थळ- इस्तंबूलमधील सौदी अरेबियाचा दूतावास

जमाल खशोगी यांनी रहिवासी कागदपत्रं मिळवण्यासाठी सौदीच्या दुतावासात प्रवेश केला. तत्पूर्वी त्यांना काही वेळ दुतावासाबाहेर थांबवण्यात आलं होतं. जमाल खशोगी यांची हत्या करण्यासाठी सज्ज झालेली टीम आतमध्ये सावजाची वाटच पाहत होती. दुतावासात प्रवेश केल्यावर एका ओळखीच्या व्यक्तीने त्यांचं स्वागत केलं.

“तुम्हाला सौदी उचायुक्तांनी दुसऱ्या मजल्यावरच्या कार्यालयात बोलावलं आहे.” असं या व्यक्तीने खशोगी यांना सांगितलं.

मात्र मुरलेला पत्रकार असलेल्या खशोगीला संशय आला आणि त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. मात्र त्यानंतर या डेथ स्कॉडमधील काही सदस्यांनी खशोगींवर झडप घातली आणि त्यांना फरफटत त्या कार्यालयात घेऊन गेले. दुतावासाचा अधिकारीसुध्दा या प्रकाराने घाबरला होता. तो म्हणाला माझ्या कार्यालयात असं करु नका. त्यावेळी सौदी एजंट्सनी त्यांना गप्प राहण्यास बजावलं.

यावेळी खशोगी म्हणाले “ मला जाऊ द्या, तुम्ही माझ्यासोबत हे काय करताय?

मुत्रेब (सौदी एजंट) – तुम्ही गप्प बसा, तुम्हाला रियाधला (सौदी अरेबियाची राजधानी) इथं घेऊन जायचं आहे. आमच्याकडे इंटरपोलचे तसे आदेश आहेत. आम्ही तुम्हाला इथून घेऊन जायला आलो आहोत.

खशोगी- माझ्यावर कुठलाच आरोप नाही, खटला नाही, मला जाऊ द्या, माझी होणारी बायको बाहेर माझी वाट पाहत आहे, मला जाऊ द्या.

सौदी एजंट - तुझ्याकडे मोबाईल आहे का ?

खशोगी- माझ्याकडे दोन मोबाईल आहेत.

सौदी एजंट - कुठल्या कंपनीचे मोबाईल फोन आहेत ?

खशोगी- आयफोन

सौदी एजंट - तु तूझ्या मुलांसाठी काही मेसेज कर

खशोगी- काय सांगू माझ्या मुलांना ?

सौदी एजंट - तू मेसेज कर, त्याची रिहर्सल करु, मात्र मेसेज मला दाखव

खशोगी- काय लिहू, तुला लवकरच भेटेन असा मेसेज टाकू का मुलांना?

सौदी एजंट- तू लिही, मी इंस्तबूल शहरात आहे. माझा संपर्क झाला नाही तरी काळजी करु नका, मी सुरक्षित आहे, असा मेसेज कर

खशोगी- म्हणजे माझं अपहरण झालं हे नको लिहायला

दुसरा सौदी एजंट - तुझं जॅकेट काढ

खशोगी- हा काय प्रकार आहे, अशा गोष्टी दुतावासात कशा का होवू शकतात. मी मेसेज टाकणार नाही.

सौदी एजंट - त्याला गप्प बसवा, आटोपतं घ्या

खशोगी- मी मेसेज टाकणार नाही

सौदी एजंट ( मुत्रेब)- जमाल, तू मेसेज टाक लवकर, तू आम्हाला सहकार्य कर. आम्ही तुला मदत करु. आम्हाला तुला सौदी अरेबीयामध्ये घेऊन जायचं आहे. जर तू सहकार्य केलं नाही तर काहीही होवू शकते.

एजंटनी एक टॉवेल काढला.

खशोगी- टॉवेल कशासाठी आणला, तुम्ही मला इंजेक्शन देणार आहात का ?

त्यानंतर खशोगी यांना इंजेक्शन देण्यात आलं

सौदी एजंट – टॉवेल तुझ्या तोंडावर ठेवणार आहोत. तुला शांत झोप लागण्यासाठी...

खशोगी- कृपया माझं तोंड दाबू नका

खशोगी- मला अस्थमाचा त्रास आहे. तुम्ही हे करु नका, मी गुदरमतोय, माझा श्वास कोंडतोय.

यानंतर डेथ स्कॉडने प्लास्टीक बॅग जमालच्या गळ्याभोवती आवळली आणि जमाल खशोगीचा तडफडत मृत्यू झाला.

सौदी एजंट - तो कायमचा झोपला का ? पुन्हा एकदा चेक करा, पुन्हा एकदा फास आवळा.

खशोगी मेल्याचं स्पष्ट झाल्यावर त्याच्या शरीराचे तुकडे करण्याची प्रक्रीया सुरु झाली. यासाठी डेथ स्कॉडने करवत आणली होती.

खशोगीच्या मृतदेह करवतीने कापण्यात आला. महत्वाचं म्हणजे हे सर्व करतांना संबंधित सौदी एजंट कानात इयरफोन लावून गाणी ऐकत होता आणि थंड रक्ताने खशोगीचं शरीर कापत होता.

जमालच्या शरिराचे छोटे छोटे तुक़डे केल्यानंतर चार बॅगांमध्ये ते कोंबण्यात आले.

दुतावास एक दिवसासाठी बंद ठेवून सर्व फॉरेन्सिक पुरावे मिटवण्यात आले.

त्या बॅग तुर्कस्थानातून सौदी अरेबियामध्ये पाठवण्यात आल्या. आजपर्यंत खशोगीच्या मृतदेहाचं काय झालं हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. सौदी अरेबियाने याबद्दल अवाक्षरही काढलेलं नाही. जमाल खशोगी हत्येप्रकरणाचा खटला गुप्त पध्दतीने चालवला गेला.

या खटला कव्हर करण्याची परवानगी पत्रकारांना दिली गेली नाही. सुनावणीच्यावेळी केवळ सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी देशांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती.

Updated : 27 Dec 2019 12:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top