Home > मॅक्स रिपोर्ट > विद्यार्थ्यांकडून गटार साफ केल्याने नागरिक संताप

विद्यार्थ्यांकडून गटार साफ केल्याने नागरिक संताप

विद्यार्थ्यांकडून गटार साफ केल्याने नागरिक संताप
X

खामगाव तालुक्यातील कारेगाव खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून शाळेसमोरील गटार आणि नाल्या साफ करवून घेतल्या जात असल्याचा गंभीर प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे चिमुकले नाल्यातील घाण कचरा साफ करीत असतांना येथील शिक्षक मात्र उघड्या डोळ्यांनी बघ्याच्या भूमिकेत दिसून आले. यामुळे संतापाची लाट उसळली असून विद्यार्थ्यांचा गटार साफ करण्याचा व्हिडीओ दुपार पासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात यावे यासाठी शासनाकडून विविध शैक्षणिक सवलती देण्यात येतात. मात्र, खामगाव तालुक्यात येणाऱ्या कारेगाव बु. येथील शाळेत शिक्षणाऐवजी शिक्षकांकडून इयत्ता १ ते ७ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शाळेसमोरील संपूर्ण गावातील कचरा, साचलेली गटार साफ करुन घेतली जाते. कारेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत करीत करणाऱ्या सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची सकाळची शाळा होती. मात्र, शाळेत शिक्षणा ऐवजी विद्यार्थ्यांकडून गटार साफ करून घेतली जात आहे. संबधित प्रकार येथील काही नागरिकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसारित केला आहे.

व्हायरल झालेल्या चित्रफीतानंतर शिक्षकांप्रती गावातून संताप व्यक्त केला जातोय. “या संदर्भात मुख्याध्यापक चांदणे यांच्याशी संपर्क साधला असता सदर प्रकार हा गंभीर असून याबाबत चौकशी करून कारवाई केल्याचं त्यांनी सांगितले.” प्रभारी गटशिक्षणाधिकारी गजानन गायकवाड यांना या बाबत विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. घडलेला प्रकार अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची सपुर्ण चौकशी करून संबंधितावर योग्य कारवाई करण्यात यावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संघपाल जाधव यांनी दिला आहे.

Updated : 19 Dec 2019 1:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top