Home > मॅक्स ब्लॉग्ज > पंकजा मुंडे यांचं राजकारण संपत चाललं आहे का?

पंकजा मुंडे यांचं राजकारण संपत चाललं आहे का?

पंकजा मुंडे यांचं राजकारण संपत चाललं आहे का?
X

भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी १ डिसेंबर रोजी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर एक पोस्ट लिहीली. यानंतर राजकीय चर्चांना सुरूवात झाली. त्याला कारणही तसंच होतं.

“पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी १२ डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे.”

त्यांच्या पोस्टमधल्या या ओळींनी अनेक शक्यतांना तोंड फोडलं आहे. पंकजा मुंडे आपल्या पक्षापासून वेगळी राजकीय भूमिका घेणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. पंकजा शिवसेनेत प्रवेश करणार का? की रासपमध्ये जाऊन महाविकास आघाडीच्या सरकारला पाठींबा देणार, अशा एक ना अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.

पण पंकजा मुंडे या खरंच एवढा मोठा निर्णय घेऊ शकतात का? त्यांच्यावर ही वेळ का आली? अशाप्रकारे फेसबुक पोस्ट लिहून त्या काय साध्य करत आहेत? या सर्व परिस्थितीवरून पंकजा यांचं राजकारण संपत चाललं आहे का, असे एक ना अनेक प्रश्न सध्या उभे रहात आहेत.

राज्याचा महत्वाचा ओबीसी नेत्या अशी पंकजा मुंडेंची ओळख आहे. राज्यातील जवळपास ३० मतदारसंघात पंकजा मुंडेंचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव आहे. त्यांना कोणत्या पक्षाच्या चिन्हाची गरज नाही. त्यांच्याकडे गोपीनाथ मुंडे यांचं नाव आहे. या नावावरच त्यांचं आजवरचं राजकारण चालत आलंय.

हे ही वाचा:

गोपीनाथराव मुंडे : मरणोपरांतही कर्तृत्वाची सर्वव्यापक आभा

मुंडे बंधू-भगिनींच्या नेतृत्वाची गरज अवघ्या महाराष्ट्राला अन् देशाला…

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी पुन्हा संघर्ष यात्रा काढली होती. त्याचा भाजपला मोठा फायदा झाला होता. ही यात्रा ज्या मतदारसंघातून गेली त्यातल्या बहुतांश ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले. त्यातही विशेषकरून पंकजा मुंडे यांच्या गटाचे उमेदवार अधिक होते. त्यामुळे पक्षात त्यांचं वजन आपसूकच वाढलं.

सरकार आल्यानंतरही मंत्रीमंडळात त्यांना स्थान देण्यात आलं. फडणवीस सरकारमधल्या त्या महत्वाच्या मंत्र्यांपैकी एक होत्या. मात्र, त्यानंतर सगळं चित्र बदललं. पंकजा यांचा जनसंपर्क कमी झाला. आपण म्हणू तीच पूर्व दिशा अशी त्यांची वागणूक अनेकांना खटकत होती. त्यांचं लोकांशी वागणं अहंपणाचं होतं. याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या. मात्र, त्याकडे पंकजा यांनी साफ दुर्लक्ष केलं. अनेकादा सांगुनही त्यांनी आपल्या स्वभावात बदल केला नाही.

परळीची जनता गोपीनाथ मुंडे या नावामुळे आपल्या कायम पाठीशी आहे असा पंकजा यांचा समज होता. मात्र, या विधानसभा निवडणुकीत परळीकरांनी भावनिक राजकारणाच्या पलिकडे जाऊन कौल दिला आणि पंकजा यांची सगळी राजकीय समीकरणं बिघडली.

पंकजा मुंडे यांच्या राजकारणाबाबत ‘मॅक्स महाराष्ट्र’ने मराठवाडा आणि विशेषतः बीडमधील दैनिकांच्या संपादकांची मतं जाणून घेतली. त्यांनी या सर्व विषयावर विस्तृत भाष्य केलं.

सत्ता असताना अशाप्रकारे भूमिका घेतली असती तर फायद्याचं झालं असतं. ३० हजार मतांनी पराभव झाल्यानंतर ही आत्म आत्मचिंतन करण्याची वेळ आहे. पंकजा मुंडे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतील असं वाटत नाही. पक्षावर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं बीड दै. पार्श्वभूमीचे मुख्य संपादक गंमत भंडारी यांनी सांगितलं.

हे ही वाचा

गोपीनाथराव मुंडे : मरणोपरांतही कर्तृत्वाची सर्वव्यापक आभा

गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षाला जिल्ह्यात मर्यादित ठेवणारे भाऊ-बहीण

अशाप्रकारे पक्षावर दबावतंत्र अवलंबण्याची सध्या गरज नव्हती. गोपीनाथ मुंडे यांच्यावरही अनेकदा अशी वेळ आली. त्यावेळी गोपीनाथरावांनी कशा पद्धतीने परिस्थिती हाताळली हे डोळ्यासमोर ठेवून पंकजांनी वागलं पाहिजे. आज शिवसेनेला पंकजा यांची गरज नाहीय. राज्यात भाजपला सर्व स्तरात बांधून ठेऊ शकेल असा पंकजासारखा दुसरा नेता नाही. त्यामुळे पंकजांनी विरोधी पक्षनेते पदापेक्षा प्रदेशाध्यक्षपद घ्यावं असं भंडारी म्हणाले.

पंकजा मुंडेंमधला अहंपणा या सर्व परिस्थितीला कारणीभूत आहे. फेसबुक पोस्ट लिहीण्यापेक्षा ही वेळ आत्मचिंनाची आहे. भावनिकतेचं राजकारण फार काळ टिकत नसतं. पंकजा यांच्या बळावर अनेक उमेदवार निवडून आले आणि पंकजांचा पराभव झाला. याचाच अर्थ काहीतरी नक्कीच चुकलं आहे. त्याचा विचार करणं गरजेचं असल्याचं भंडारी यांनी सांगितलं

महाराष्ट्राचं राजकारण मोठी धक्कादायक वळणं घेत आहे. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असं बोललं जातंय. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी भाजपवर दबावतंत्र वापरण्याचा एक प्रयत्न असू शकतो. पंकजा तात्काळ काही निर्णय घेतील अशी शक्यता वाटत नाही. पण त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाच तर तो भाजपसाठी हानिकारक ठरू शकतो असं मत सकाळच्या मराठवाडा आवृत्तीचे संपादक संजय वरकड यांनी व्यक्त केलं.

भाजपमध्ये सध्या मोठं अंतर्गत राजकारण सुरू आहे. एवढं मताधिक्य मिळूनही त्यांना सरकार स्थापन करता आलं नाही. देवेंद्र फडणवीस पक्षात एकाकी पडल्याचं चित्र आहे. त्यांच्या बाजूने फक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीष महाजन सोडून सरकार स्थापनेसाठी कोणी प्रयत्न केले नाहीत.

पंकजा मुंडे यांचा हा दबावतंत्राचा भाग आहे. त्या शिवसेनेत गेल्या तर स्थानिक राजकारण त्यांच्यासाठी अनुकुल नसणार आहे. जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादी सोडत असताना पंकजा यांनी त्यांना भाजपऐवजी शिवसेनेत पाठवलं. त्यामुळे त्यांच्या पाठोपाठ पंकजा शिवनसेनेत जातील असं वाटत नाही असं दै. कार्यारंभचे कार्यकारी संपादक बालाजी मारगुडे यांनी सांगितलं.

बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांच्याशी ओबीसी विरूद्ध ओबीसी असा संघर्ष करावा लागत होता. त्यामुळे सेनेत जाऊन पुन्हा जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत पुन्हा असा संघर्ष करावा लागेल. दोन नेते दोन वेगवेगळ्या पक्षात असतील तरच बीडचं राजकारण योग्य चालतं. त्यामुळे त्यांच्यासाठी एकत्र येणं हा पर्याय ठरू शकत नाही असं मारगुडे म्हणाले.

१२ डिसेंबरला पंकजा कोणती भूमिका घेणार? या आहेत शक्यता

१. लाभाचा विषय आला तर पंकजा यांना भाजपपेक्षा शिवसेनेत भवितव्य चांगलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय त्या निवडणार नाहीत आणि काँग्रेसमध्ये त्यांची अवस्था आता भाजपमध्ये आहे तशीच असेल. त्यामुळे पंकजा यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतलाच तर शिवसेना हाच एकमेव पर्याय त्यांच्यापुढे असू शकतो.

गोपीनाथ मुंडे यांचे बाळासाहेब ठाकरेंशी चांगले संबंध होते. भाजपकडून युतीसंदर्भात बोलण्यासाठी मुंडेच मातोश्रीवर जात असत. त्याच धर्तीवर पंकजा यांनीही उद्धव ठाकरेंशी चांगला संपर्क ठेवला असता तर भाजप शिवसेनेच्या युतीच्या बोलणीत पंकजांचा महत्वाचा वाटा राहीला असता. मध्यंतरीच्या काळाच ज्या घडामोडी घडल्या त्यात पंकजा केंद्रबिंदू राहील्या असत्या. मात्र त्यांना ते जमवता आलेलं नाही हे सत्य आहे.

२. बीड जिल्हा आपल्या हातात असेल तरच आपण महाराष्ट्रात पाय रोवू शकतो हे पंकजा यांना चांगलंच माहित आहे. पंकजांना मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा आहे हे काही लपून राहीलेलं नाही. त्यांनी स्वतःच त्याबद्दलची विधानं केली आहेत.

त्यांनी जर आज शिवसेनेत प्रवेश केला आणि उद्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवायचं म्हटलं तर सेनेत अर्थातच सर्वाच आधी ठाकरे कुटुंबातील उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्यानंतर सेनेच्या इतर नेत्यांचा विचार होणार. म्हणजेच पंकजा जरी शिवसेनेत गेल्या तरी त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न शिवसेनेत कधीच पूर्ण होऊ शकणार नाही.

३. याऊलट पंकजा भाजपमध्ये राहील्या आणि उद्या पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यात नेतृत्व बदलाचे संकेत दिले तर त्यात पंकजा मुख्य दावेदार असू शकतात. देवेंद्र फडणवीस वगळता भाजपमधील इतर नेते पंकजा यांच्या नावाला तीव्र विरोध करणार नाहीत.

४. ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. तसंच काहीसं आपण करावं असाही विचार पंकजा यांचा असू शकतो.

५. गेल्या काही दिवसात राज्यातील राजकारणात कौटुंबिक नात्यांना महत्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे ही संधी साधून मुंडे कुटुंबातील गृहकलह थांबावा यासाठी त्यांचा प्रयत्न असू शकतो. धनंजय मुंडे हे परळी मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे यापुढे परळीत मुंडे विरूद्ध मुंडे असा संघर्ष टाळण्यासाठी परळीतून निवडणूक लढवणार नाही असा निर्णयही त्या जाहीर करू शकतात.

परळीऐवजी दुसरा विधानसभा मतदारसंघ किंवा लोकसभेचा पर्यायही त्यांच्यापुढे असू शकतो. यातून मुंडे बंधू-भगिणी यांच्यातील राजकीय संघर्ष टाळून ते पुन्हा एकत्र येऊ शकतील असंही होऊ शकतं.

६. बीड जिल्ह्याच्या बाहेर जायचं झालं तर पंकजा यांच्यापुढे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी मतदारसंघाचा पर्याय असू शकतो. पाथर्डी मतदारसंघ हा वंजारीबहुल आहे. पंकजांना विरोध करू शकेल असा मोठा नेता याठिकाणी नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या भगवानगडावरून वंजारी समाजाचं राजकारण होतं तो भगवानगडही याच तालुक्यात आहे. भगवान बाबांचं जन्मस्थान सावरगावही इथून जवळच आहे. त्यामुळे पाथर्डी हा पंकजा यांच्यासाठी अत्यंत अनुकूल पर्याय ठरू शकतो.

अर्थात, आतापर्यंत घडलेल्या घडामोडींवरून हे विश्लेषण करण्यात आलं आहे आणि या सर्व शक्यता वर्तवल्या आहेत. आता पंकजा नेमका काय निर्णय घेणार हे १२ डिसेंबरलाच स्पष्ट होईल.

Updated : 3 Dec 2019 2:40 AM GMT
Next Story
Share it
Top