Home > मॅक्स रिपोर्ट > आमची घरं मोडायला सगळे येतात, जोडायला कोणी येत नाही हारपवडे धनगर वाड्याची आर्त हाक

आमची घरं मोडायला सगळे येतात, जोडायला कोणी येत नाही हारपवडे धनगर वाड्याची आर्त हाक

आमची घरं मोडायला सगळे येतात, जोडायला कोणी येत नाही हारपवडे धनगर वाड्याची आर्त हाक
X

सह्याद्री पर्वत रांगेच्या पूर्व पश्चिम विस्तारावरील माथ्यावर अनेक धनगर समाजाचे वाडे आहेत. खंडाळा घाट ते अगदी आजरा आणि कोकणापर्यंत धनगरवाडे वसलेले आहेत. आजरा तालुक्यात डंगे धनगर यांचे वास्तव्य आहेत. या भागातील अभ्यासक श्रमिक मुक्ती दलाचे राज्य संघटक डंगे या शब्दाचा अर्थ सांगतात. दाट झाडीचा ज्याला ग्रामीण भाषेत कीचनाचा प्रदेश म्हणजे डंगा असा होतो. या प्रदेशात राहणारे म्हणजे डंगे असा अर्थ असावा असे दिसते. डोंगर माथ्यावर राहणाऱ्या या धनगर वाड्यांच्या बहुतांश समस्या गडचिरोली भागातील आदिवासी लोकांच्या समस्या यांच्या सारख्या दिसून येतात.

“आम्ही पूर्वीपासून इथ राहतोय हे जंगल खातं नवीन आलंय त्यांनी आम्हाला नोटीस दिलं, आम्ही त्येज उत्तर दिलं त्यानंतर लगेच आमची घरं पाडली.” धोंडिबा झोरे ही व्यथा सांगताना त्यांची छोटी मुलं तात्पुरत्या टाकलेल्या तंबुतून पाहत होती.

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील हारपवडे धनगर वाड्यातील दोन घरे अतिक्रमणग्रस्त म्हणून पाडलेली आहेत. या कुटुंबाला भेट दिली असता त्यांनी आपली व्यथा ‘मॅक्समहाराष्ट्र’कडे मांडली.

ज्यांचं घर अतिक्रमण म्हणून पाडलेले आहे ते लहू झोरे सांगतात की “आमच्या गावात दोन मसन घाटात प्रत्यक्षात किती दगड हायत प्रत्यक्ष तुम्ही मोपा, ही जागा सोडून आम्ही कुणी कुणीकडं गेलाव नाय आमची घरं आम्हाला परत माय बाप सरकारने द्यायला पाहिजे.”

धनगर समाज हा पशुपालक समाज आहे. पशुपालन जंगलावर अवलंबून असल्याने वनखाते आणि त्यांच्यात सतत संघर्ष होत आहे. वनहक्क कायद्यानुसार त्यांचा हक्क त्यांना मिळावा अशी त्यांची मागणी आहे. अंकुश झोरे यांचा संसारदेखील उघड्यावर पडलेला आहे. तात्पुरत्या बांधलेल्या खोपेत पेटत्या चुलीत लाकूड घालत ते सांगतात “या खात्याने या डोंगरावर घरं पाडण्यासाठी लागणारा जेसीबी आणायला रस्ता केला पण आमची पोरं-बाळं दगड धोंड्यातून दीड हजार फुटाचा डोंगर उतरून रोज शाळेत जातात त्यासाठी रस्ता करायला वेळ नाय. आम्हाला माय बाप कुणी नाय.” धनगर वाड्यातील घरं पाडण्याच्या घटनेच्या निमित्ताने गावकऱ्यांनी त्यांना वर्षानुवर्षे भोगाव्या लागणाऱ्या व्यथा ‘मॅक्समहाराष्ट्र’कडे सविस्तर मांडल्या...

हारपवडे धनगर वाड्यात पोहचण्यासाठी दीड हजार फुटाचा डोंगर चढावा लागतो. या गावात जाण्यासाठी कसलाच रस्ता अजुन बनवलेला नाही. मात्र अतिक्रमीत घरं ठरवून ती पाडण्यासाठी रस्ता करून डोंगरावर जेसीबी चढविण्यात आला.

बयाबाई येडके सांगतात “आम्हाला पाण्याची, लायटीची पोरांच्या शाळेची अडचण हाय, कुणी बाई अडली तर घोंगड्यातून डोंगर उतरावा लागतो.”

आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. कुणी गंभीर आजारी असेल तर त्याला दवाखान्यात पोहचवणे आणि त्यानंतर उपचार करणे हा मोठा जीवघेणा संघर्ष हे लोक करत आहेत. येथे जमलेल्या अन्य स्त्रिया सांगतात “आमची पोरं या दगडातून शाळेत जातात तr इतकी थकतात की, पुन्हा दुसऱ्या दिवशी शाळेत जात नाहीत. गावात लाईट नाही सरकारने राकेल बंद केलंय आमच्या चिमणीला राकेल नाय. आमची पोरं मेणबत्ती वर किती अभ्यास करणार.”

ही अवस्था फक्त हारपवडे धनगर वाड्याची नाही सह्याद्रीच्या माथ्यावर वसलेल्या अनेक धनगर वाड्यांवर अजूनही लाईट पोहचलेली नाही. विकास या दगड गोट्याच्या रस्त्यावरून वरती जाईपर्यंत धापा टाकेलं अशी अवस्था आहे. पाण्यासाठी लोकांना झऱ्याचा आधार घ्यावा लागतो. लोक जंगलात असलेल्या कारवीच्या इतर पर्यायांचा वापर करून कच्ची पारंपरिक घरं बनवतात. ज्या घराला पाडायला केवळ एक धक्का पुरेसा आहे अशा घरांना पाडायला वनखाते जेसीबी नेते आणि सर्व साहित्य उचलून नेते ही बाब आश्चर्यकारक आहेत. वास्तविक ही पशुपालक धनगर जमात पर्यावरणातील आवश्यक गोष्टी घेऊन त्यांच्या पर्यावरण पूरक संस्कृतीतून पर्यावरणाचे संवर्धन करत असते. पर्यावरणात बाह्य हस्तक्षेप करणे गुन्हा असताना देखील या भागात काही परदेशी झाडं लावली असल्याचं या भागातील स्थानिक सांगतात.

धनगर समाज हा बहुतांशी डोंगराळ भागात राहत आहे. पशुपालन करत असल्याने अनेक वर्षे हा समाज जंगलावर अवलंबून आहे. वनहक्क कायद्यामध्ये आदिवासींचे वनहक्क दावे तेथील नेत्यांनी संघर्ष करून मिळवले. श्रमिक मुक्ती दलाचे राज्य संघटक संपत देसाई सांगतात, ”आम्ही संघर्ष करून कदाचित देशात पहिल्यांदाच बिगर आदिवासी दावे मंजूर करून घेतले आहेत. ही चळवळ संपूर्ण भागात उभी राहिली पाहिजे आणि इथल्या भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे. ही सर्व कामे सामाजिक संघटना करत आहेत. मात्र, नागरी सुविधा पुरवण्याचं, लोकांचे हक्क अबाधित ठेवण्याचं ज्यांचं कर्तव्य आहे ते प्रशासन ज्या भागात वर्षानुवर्षे लाईट पोहचली नाही, पाणी पोहचलेले नाही, शाळा पोहोचली नाही, दवाखाने पोहचवले नाही, त्या भागातील घरे पाडण्यासाठी भलेमोठे जेसीबी मशीन पोहचवत आहे हे न उलगडणारे कोडे आहे.

Updated : 20 Dec 2019 12:58 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top