सरकार गेलं चुलीत, सरकार नाही आलं तरी चालेल आधी रूग्णवाहिका येऊ द्या…

302

ग्रामीण भागात तातडीची सेवा म्हणून आघाडी सरकारच्या काळात 108 ही रुग्णवाहिका सुरु करण्यात आली. या रुग्णवाहिकेचा (ambulance )फायदा ग्रामीण भागात अनेकांना होतो. मात्र, खराब रस्ते आणि 108 रुग्णवाहिकाचं अयोग्य नियोजन यामुळे एका अर्भकाचा मृत्यू झाला आहे.

जळगाव (Jalgaon) जिल्ह्याती धामणगाव येथील चंद्रभान देवीदास सपकाळे (वय-३२) यांच्या गरोदर पत्नी खटाबाई चंद्रभान सपकाळे (वय-२५) यांना मध्यरात्री दोन वाजता प्रसुती कळा यायला सुरु झाल्यानंतर तातडीने १०८ शी संपर्क साधला. त्यानंतर रात्री अडीज वाजता रूग्णवाहिका आल्यानंतर महिलेला घेऊन जात असताना धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले.

मात्र, वैद्यकिय अधिकाऱ्यांनी गरोदर महिलेची प्रकृतीची तपासणी केल्यानंतर त्यांना जळगाव जिल्हा रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्याच रूग्णवाहिकेत त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात नेत असताना 108 रुग्णवाहिका फार्मसी कॉलेजजवळ बंद पडली. रूग्णवाहिकेच्या चालकाने त्यांच्या मोबाईलवरून इतर दुसऱ्या रूग्णवाहिकेच्या चालकाला फोन लावला मात्र, रूग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगितले.

दरम्यान, पहाटे 0४:00 वाजेपर्यंत कोणतेही वाहन न आल्यानं महिलेनं नवजात बाळाला जन्म दिला. यानंतर एका तासानंतर खासगी वाहनाने महिलेसह बाळाला जिल्हा रूग्णालयात आणण्यात आलं. मात्र, वैद्यकिय अधिकाऱ्यांनी बाळाला मृत घोषीत केलं. दरम्यान बाळाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या १०८ रूग्णवाहिका आणि जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात ४ रूग्णवाहिका उपलब्ध असताना रूग्णवाहिका पाठविण्यात आली नाही. असं रुग्णाच्या नातेवाईकांचं मत आहे. या संदर्भात रुग्णाचे नातेवाईक चंद्रभान पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे.

या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या वसंती दिघे यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना जळगाव जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची वस्तुस्थिती मांडली. जळगाव जिल्ह्यामध्ये एका गरोदर मातेनं आपलं छोट अर्भक गमावलेलं आहे. शासनाच्या असुरक्षित रुग्णवाहीकेमुळे हा प्रकार घडला असून जिल्ह्यामध्ये शासकीय व खाजगी मिळून एकूण 35 रुग्णवाहिका आहेत. तरीही गरोदर मातेला दवाखान्यात नेत असताना रुग्णवाहिका मध्येच बंद पडल्यामुळे ती तब्बल तीन तास अडकली. दुसऱ्या रुग्णवाहिकेला फोन करुनही कोणतीही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. म्हणून बाळाचा मृत्यू झाला आहे. गर्भवती महीलेचं कुटूंब हे शेतकरी कुटूंब असून ते आत्ताच ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळाला सामोरं गेलेलं आहे.

एकीकडे वैद्यकीय उच्च शिक्षण मंत्री ज्या जिल्ह्याचे आहेत. त्या जिल्ह्यामध्ये रुग्णवाहिकेसारखी साधी सुविधा इतक्या गलथानपणे चालत असेल तर गरिबांनी जायचं कुठं व अशा असुरक्षित रुग्णवाहिकेची तक्रार करायची कुठे ? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

या संदर्भात आम्ही 108 रुग्णवाहिकेचे व्यवस्थापक डॉक्टर निलेश चव्हाण यांच्याशी बातचित केली त्यांनी रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट असल्यानं रुग्णवाहिका बंद पडली आणि दुसरी रुग्णवाहीका उपलब्ध करण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेले असतानाही, रस्त्याच्या बिकट परिस्थितीमुळे दुसरी रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास वेळ लागला. त्यानंतर गर्भवती महिलेला खाजगी गाडीमधून दवाखान्यात आणण्यात आलं. तसंच खड्ड्यांमुळेच आम्हाला रुग्णवाहिका पोहोचवण्यास व आणण्यास त्रास होतो असं डॉ. निलेश चव्हाण यांनीमॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितलं आहे.

या सर्व घटनेमध्ये काही प्रश्न अनुत्तरीत राहतात…

 रुग्णवाहिकेत गरोदर महिलांसाठी आपत्कालीन सुविधा नव्हती का?
रुग्णवाहिका बंद पडून 3 तास झाले तरी दुसरी 108 ची रुग्णवाहिका का आली नाही? 108 रुग्णवाहिकेला येण्यासाठी जर तीन तासांपेक्षा अधिक कालावधी लागत असेल तर त्या तात्काळ सुविधेचा नागरिकांना उपयोग काय?
रुग्णवाहिका उपलब्ध असूनही जर गरजेला हजर राहिली नसेल तर सेवेवर हजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करणार का?
रस्ता खराब होता, हे जर कारण असेल तर त्या रस्त्याची दुरुस्ती कधी होणार? शासन अजून किती लोकांच्या बळीची वाट पाहत आहे.
भाजपचे दिग्गज आणि वजनदार नेते असलेल्या गिरिश महाजन यांच्या जिल्ह्यात जर अशी अवस्था असेल तर महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल? याचा विचार करणं गरजेचं आहे.

स्त्री जेव्हा एका बाळाला जन्म देते, तेव्हा तिचा नवा जन्म होतो. स्त्री ला प्रसुती काळात होणाऱ्या वेदना जीवघेण्या असतात. या असह्य वेदना ती फक्त तिच्या बाळासाठी सहन करत असते. मात्र, या वेदनेनंतर जर तिच्या समोर तिचं बाळ मृत अवस्थेत आलं तर? याचा विचार करणं देखील असह्य आहे. राज्यात महिला आयोग आहे. इतरही प्रशासन आहे. प्रशासन या मातेच्या वेदनांची दखल घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.