Home > मॅक्स रिपोर्ट > Exclusive | राज्यात सत्तावाटपासाठी पहिल्यांदाच पॅनल सिस्टीम, माजी मुख्यमंत्र्यांना मंत्रीमंडळात स्थान नाही?

Exclusive | राज्यात सत्तावाटपासाठी पहिल्यांदाच पॅनल सिस्टीम, माजी मुख्यमंत्र्यांना मंत्रीमंडळात स्थान नाही?

Exclusive | राज्यात सत्तावाटपासाठी पहिल्यांदाच पॅनल सिस्टीम, माजी मुख्यमंत्र्यांना मंत्रीमंडळात स्थान नाही?
X

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून सत्ता स्थापन करणार असून काँग्रेस थेट सत्तेत सहभागी होणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. यासाठी राहुल गांधी यांचा हिरवा कंदील मिळाला असल्याची माहिती ‘मॅक्स महाराष्ट्र’ला मिळाली आहे. येत्या सोमवारी किंवा मंगळवारी याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते.

शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून सत्ता स्थापन करतील आणि काँग्रेस या आघाडीला बाहेरून पाठींबा देईल असं सांगण्यात येत होतं. काँग्रेस हायकमांड या नव्या सत्तासमीकरणांबाबत फारशी अनुकुल नाही अशाप्रकारच्या चर्चा सुरू होत्या. मात्र या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून आता काँग्रेस सत्तेत थेट सहभागी होणार आहे.

वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन करण्याचा अलिकडच्या काळातला या पहिलाच प्रयोग आहे. गेल्या दोन-तीन दशकांपासून राज्यात चालत आलेल्या पारंपारिक राजकीय समीकरणांना छेद देऊन ही नवी आघाडी अस्तित्वात येऊ पहात आहे.

त्यामुळे सत्तेचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करायचा असल्यास त्यासाठी सत्तेचं सर्वांसाठी अनुकुल वाटप होणं गरजेचं आहे. त्यासाठी पहिल्यांदाच राज्यात पॅनल पद्धतीने मंत्रीपदांचं वाटप होणार आहे.

कसं आहे सत्तावाटपाचं सूत्र?

नगरविकास, गृहमंत्रालय आणि महसूल या तीन महत्वाच्या खात्यांनुसार मंत्रीमंडळाचे संच करण्यात आले आहेत. ज्या पक्षाला यातील एक खातं हवं आहे त्या पक्षाला त्या खात्यांशी संबंधित खाती मिळणार आहेत.

म्हणजेच नगरविकास, गृहमंत्रालय आणि महसूल यापैकी कोणतीही दोन खाती एकाच पक्षाकडे असणार नाहीत. जो पक्ष एक खातं निवडेल त्यानुसारच इतर खात्यांचं वाटप होणार आहे. खातेवाटपाची ही नवी पद्धत शरद पवार यांच्या सुचनेनुसार अवलंबली जात असल्याचंही कळतंय.

या तिनही पक्षांमध्ये आतापर्यंत झालेल्या चर्चांनुसार मुख्यमंत्रीपद आणि नगरविकास खातं हे शिवसेनेकडे, गृहमंत्रालय हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि महसूल आणि त्याच्याशी संबंधित खाती काँग्रेसकडे असतील अशी शक्यता आहे.

माजी मुख्यमंत्र्यांना मंत्रीमंडळात स्थान नाही?

विधानसभा निवडणुकांचा निकाल आणि त्यानंतर अनपेक्षितपणे सत्तेत सहभागी होणार असल्याने काँग्रेसच्या अनेक नेत्यांची मंत्रीपदाची ईच्छा जागृत झाली आहे. मात्र, एकेकाळी मुख्यमंत्री राहीलेले अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांना या नव्या मंत्रीमंडळात स्थान मिळणार नाही असं समजतंय.

पृथ्वीराज चव्हाणांची विधानसभेच्या अध्यक्षपदी वर्णी लागू शकते. काँग्रेसचे आणखी एक मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आपल्या मुलीला मंत्रीमंडळात स्थान मिळावं म्हणून प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांची ही ईच्छा पूर्ण होईल अशी काही शक्यता दिसत नाही.

या संपूर्ण प्रक्रीयेमध्ये काँग्रेसचा मूड बघता मंत्रीमंडळात काँग्रेसकडून अनेक नव्या आणि तरूण चेहऱ्यांना संधी मिळू शकते.

Updated : 16 Nov 2019 4:13 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top