Home > News Update > पुणे विष्ठा प्रकरण : निवडणुकीमुळं वंचितच्या नेत्यांनी पिडीत कुटुंबाची भेटच टाळली

पुणे विष्ठा प्रकरण : निवडणुकीमुळं वंचितच्या नेत्यांनी पिडीत कुटुंबाची भेटच टाळली

पुणे विष्ठा प्रकरण : निवडणुकीमुळं वंचितच्या नेत्यांनी पिडीत कुटुंबाची भेटच टाळली
X

‘’सध्या निवडणुकांचे दिवस आहेत. अशा परिस्थितीत मी तिथं गेलो तर त्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो, त्यामुळं मी तिथं गेलो नाही. मात्र, आमच्या शिष्टमंडळानं जाऊन पिडीत पवळे कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. निवडणुकानंतर आम्ही आमच्या पद्धतीनं पवळे कुटुंबाला मदत करू,’’ असं आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनिल जाधव यांनी दिलंय.

पवळे कुटुंबियांतील तरूणाला 'आईशी संभोग कर किंवा विष्ठा खा', अशी शिक्षा सुनावत विष्ठा खायला लावणाऱ्या विटभट्टी मालकाविरोधात गुन्हा दाखल झालाय. पण घाबरलेल्या पवळे कुटुंबियांच्या पाठिशी कुठलाही राजकीय नेता ठामपणे उभा राहायला तयार नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. सध्या लोकसभा निवडणुका असल्यानं कुठल्याही नेत्यानं या पिडीत कुटुंबाची भेट घेण्याचं सौजन्यही दाखवलं नाही.

पुणे जिल्ह्यात मागास समाजातील एका तरूणाला विष्ठा खाऊ घालण्यात आली. मात्र, एरवी बेंबीच्या देठापासून मागास घटकांच्या न्याय हक्कासाठी बोलणाऱे पक्षही या घटनेबाबत मूग गिळून गप्प बसलेत.

नेमकी घटना काय ?

१४ मार्चला मुळशी तालुक्यातील जांबे येथे संदीप पवार नावाच्या वीटभट्टी मालकाकडे पवळे कुटुंबीय मजूरी करत होते. किरकोळ भांडणावरून पवारने पवळे कुटुंबातील सुनीलला (वय २७ वर्षे) दिलेली शिक्षा मानवतेला काळीमा फासणारी आहे. पवारने संपूर्ण कुटुंबाच्या समोरच सुनीलला स्वतःच्या आईशी संभोग कर किंवा विष्ठा खा, अशी धमकी देत विष्ठा खायला भाग पाडलं. ही घटना वीटभट्टीवरील सर्वांच्या समोरच घडली. यासंदर्भात मुख्यप्रवाहातील माध्यमांनीही फारशी दखल घेतली नाही. सध्या हे कुटूंब पुण्यातील एका नातेवाईकडे आश्रयाला आहे.

निवडणुकांमुळं नेत्यांनी फिरवली पाठ

महाराष्ट्रातील वंचित घटकांपैकीच एक असलेल्या मातंग समाजातील पवळे कुटुंबियांवर झालेल्या या अन्यायाविरोधात कुठल्याच राजकीय नेत्यानं पुढे येण्याचं धाडस दाखवलं नाही. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनिल जाधव यांच्याशी संपर्क साधला. जाधव यांनी स्पष्टपणे सांगितलं की, सध्या निवडणुकांचे दिवस आहेत. अशा परिस्थितीत मी तिथं गेलो तर त्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो, त्यामुळं मी तिथं गेलो नाही. मात्र, आमच्या शिष्टमंडळानं जाऊन पवळे कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. निवडणुकानंतर आम्ही आमच्या पद्धतीनं पवळे कुटुंबाला मदत करू, असं जाधव यांनी सांगितलं.

या घटनेसंदर्भात अधिकृत माहिती नाही. कायद्यानुसार पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली पाहिजे. या घटनेचं समर्थन करता येणार नाही. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिलीय.

घटना ऐकल्यानंतर पालकमंत्री गिरीष बापटांचा फोनला प्रतिसादच बंद

पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपचे लोकसभेचे उमेदवार गिरीष बापट यांना २ एप्रिलला सायंकाळी आमच्या प्रतिनिधीनं फोन केला, तेव्हा त्यांनी संपूर्ण घटनाक्रम ऐकून घेतला. त्यानंतर मी लिफ्टमध्ये आहे थोड्यावेळानं फोन करतो, असं सांगत फोन कट केला. थोड्यावेळानंतर पुन्हा फोन केला असता त्यांनी प्रतिसादच दिला नाही. ३ एप्रिललाही त्यांना बातमी लिहेपर्यंत फोन सुरूच होता. मात्र, बापट यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

Updated : 3 April 2019 12:48 PM GMT
Next Story
Share it
Top