Home > मॅक्स रिपोर्ट > फुले दांपत्यांना ‘भारतरत्न’ नको - सत्यशोधक ओबीसी फेडरेशन

फुले दांपत्यांना ‘भारतरत्न’ नको - सत्यशोधक ओबीसी फेडरेशन

फुले दांपत्यांना ‘भारतरत्न’ नको - सत्यशोधक ओबीसी फेडरेशन
X

मुंबई – भांडवलदार, विषमता आणि हिंसेचं समर्थन करणाऱ्यांना भारतरत्न पुरस्कार दिला जात असेल तर समतेसाठी आयुष्य वेचणाऱ्या सत्यशोधक सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांना भारतरत्न पुरस्कार देऊ नये, अशी भुमिका सत्यशोधक ओबीसी फेडरेशननं घेतल्याचं सचिन माळी यांनी स्पष्ट केलं.

गुजरात दंगलीच्या मास्टर माईंड असलेल्या व्यक्तीला भाऊ मानणाऱ्या प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर, सिमेंट, इंजिन ऑईल, शीतपेय, महागड्या गाड्या आणि टायरच्या जाहिराती करणारा भांडवलदारांचा सेल्समन सचिन तेंडूलकर आणि आता थेट विषमता, हिंसापूजक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक नानाजी देशमुख यांना जर भारतरत्न दिला जात असेल तर असा पुरस्कार समतेसाठी आय़ुष्य वेचणाऱ्या सत्यशोधक सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांना देण्यात येऊ नये, अशी मागणीच सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्यावतीनं करण्यात आली आहे. आजवरच्या भारतरत्न पुरस्कारांवर ब्राह्मण जातीचेच वर्चस्व दिसत असल्याचा आरोप फेडरेशनने केला आहे. त्यामुळं हा सांस्कृतिक वर्चस्ववाद आम्हांला मान्य नसल्याचं फेडरेशनचं म्हणणं आहे.

फुले दांपत्यांची तुलना तथागत गौतम बुद्ध, सॉक्रेटिस, मार्टिन ल्युथर, नेल्सन मंडेला अशा विश्वरत्नांशीच होऊ शकते. अशी आमची ठाम धारणा असल्याचं शंकरराव लिंगे आणि सचिन माळी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केलं.

सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबा फुलेंनी केलेले कार्य हे वैश्विक होते. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने विश्वरत्न आहेत. त्यांचा समतेचा विचार पुढे घेऊन जाणे हाच खरा पुरस्कार अर्पण करण्यासारखे आहे. आम्ही आमच्या लढ्यातून आणि कृतीतून सावित्रीबाई फुले आणि जोतिबा फुले यांना विश्वरत्न पुरस्कार देऊ, असं फेडरेशनच्यावतीने शंकरराव लिंगे आणि सचिन माळी यांनी सांगितलं आहे.

Updated : 27 Jan 2019 10:20 AM GMT
Next Story
Share it
Top