Home > मॅक्स रिपोर्ट > राज्यातलं सत्तापरिवर्तन हे मुंडे साहेबांनी रचलेला इतिहास आहे - मुख्यमंत्री

राज्यातलं सत्तापरिवर्तन हे मुंडे साहेबांनी रचलेला इतिहास आहे - मुख्यमंत्री

राज्यातलं सत्तापरिवर्तन हे मुंडे साहेबांनी रचलेला इतिहास आहे - मुख्यमंत्री
X

संघर्षाचे शिलेदार , बीड जिल्ह्यातील नाथ्रा ते न्युयॉर्क पर्यंतचा प्रवास स्वत: च्या हिमतीवर करणारे ,लोकनेते व आमचे मार्गदर्शक गोपीनाथ मुंडे साहेब, यांनीच आम्हाला सत्तेत बसवण्याचे काम केले असून , राज्यातलं सत्तापरिवर्तन हे मुंडे साहेबांनी रचलेला इतिहास आहे....आज मुंडे साहेबांशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही.माझे राजकीय मार्गदर्शक हे मुंडे साहेब असून त्यांच्यामुळेच मी घडलो आहे. माझ्या पाठीशी उभे असलेले साहेब आजही मला दिसतात. अशी भावना स्व.गोपीनाथराव मुंडे , यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, गोपीनाथगड येथे व्यक्त केली.... ते पुढे म्हणाले की, मुंडे साहेब गृहमंत्री असताना त्यांनी मुंबई भयमुक्त केली होती. त्यांच्या विचारावरच आज आम्ही चालत आहोत. सहकार क्षेत्रातील मक्तेदारी मोडीत काढण्यामध्ये साहेबांचे मोठे योगदान आहे. सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी सत्तेचा वापर झाला पाहिजे, याबाबत त्यांचा सतत आग्रह असायचा असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

ज्यांनी आमचा सन्मान केला त्या मुंडेसाहेबांसाठी आम्ही आलोत- खा. संभाजी राजे

एक बहीण एका भावाला हक्काने बोलवते. खरं तर गोपीनाथ गडावर येण्यासाठी आमंत्रण लागत नाही. आज या कार्यक्रमाला दोन्ही छत्रपती उपस्थित आहेत. दोघेही एकाच कार्यक्रमाला कधी येत नाहीत, आलेलो नाहीत मात्र ज्या गोपीनाथ मुंडे साहेबांनी कायम आमचा सन्मान केला त्या मुंडे साहेबांच्यासाठी आम्ही आज गडावर कार्यक्रमासाठी आलोत असे मत यावेळी खा. संभाजी राजे यांनी व्यक्त करत ते पुढे म्हणाले की, छत्रपतींचा सन्मान व्हावा म्हणून मुंडेसाहेबांनी मला खासदार केले. यापुढच्या काळात दोन्ही छत्रपतींचे आर्शिवाद कायम पंकजा मुंडे यांच्या पाठीशी असतील असा विश्वास संभाजी महाराज यांनी यावेळी दिला.

मी छत्रपती म्हणून नव्हे तर त्यांचा मुलगा म्हणून आलोय- खा. उदयनराजे

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी कायम गोर-गरीब जनतेचा विचार केलेला आहे. मी आज या कार्यक्रमाला छत्रपती उदयनराजे म्हणून आलेलो नाही तर गोपीनाथ मुंडे यांचा मुलगा म्हणून उपस्थित आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा लोकराजा होऊन गेला. ते आमचे मार्गदर्शक मित्र होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झालेले आहे. मुंडे साहेबांनी कधी जात-पात पाहिली नाही. तळागळातील माणसाला कायम आधार दिला. तेच गुण पंकजा मुंडे यांच्यात आहेत. खरं तर माझं भाग्य आहे की, मला मुंडे साहेबांचा सहवास लाभला. अशी प्रतिक्रीया यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.

कामगारांचे नेते म्हणजे मुंडे साहेब- खोत

कामगारांचे नेते म्हणून मुंडे साहेबांची ओळख होती. आजही आम्ही साहेबांच्या विचारावरच चालवत आहोत. मुंडे साहेबांनी दिलेले विचार गोर-गरीबांना बरोबर घेवून जाणारे आहेत. समाजातल्या तळागळातील वंचितांना बरोबर घेवून जायचे असेल तर गोपीनाथ मुंडे यांचे विचारच आत्मसात करावे लागतील अशी प्रतिक्रीया शेतकरी नेते तथा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यावेळी व्यक्त केली.

Updated : 3 Jun 2018 1:17 PM GMT
Next Story
Share it
Top