Home > Election 2020 > विधानपरिषदेत देशमुखांच्या जागी देशमुख

विधानपरिषदेत देशमुखांच्या जागी देशमुख

विधानपरिषदेत देशमुखांच्या जागी देशमुख
X

विधानपरिषदेचे माजी सभापती आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी भाजपने पृथ्वीराज देशमुख यांची उमेदवारी जाहीर केलीय. या एका जागेसाठी येत्या ७ जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे.

विधानसभेत भाजप आणि शिवसेनेच्या सदस्यांचं बहुमत असल्यानं काँगेस राष्ट्रवादी विरोधात उमेदवार देण्याची शक्यता कमी आहे. शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या एका जागेसाठी येत्या ७ जून रोजी पोटनिवडणूक होतेंय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत भद्रावतीचे शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर यांनी शिवसेनेचा आणि आमदारकीचा राजीनामा देवून कॅांग्रेसकडून निवडणूक लढवली आहे. शिवसेनेचे नांदेडचे आमदार प्रताप पाटील यांनी शिवसेनेचा राजीनामा देत भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली. धुळ्याचे भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी भाजपाचा राजीनामा देत अपक्ष म्हणून निवडणूक लढवलीय. तर कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेचा आणि आमदारकीचा राजीनामा देत अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली. या चारही विधानसभा सदस्यांचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंजूर केल्यानं शिवसेना भाजपाची सदस्य संख्या घटली आहे. काटोलचे भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी यापूर्वीच भाजपाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. माळशिरसचे राष्ट्रवादीचे आमदार हणुमंत डोळस यांचे निधन झाल्यानं आता विधानसभेत एकूण सहा जागा रिक्त आहेत.

सध्या विधानसभेत अनिल गोटे यांच्या राजीनाम्यानंतर भाजप १२१, सुरेश धानोरकर, हर्षवर्धन जाधव, प्रताप पाटील यांनी शिवसेनेचा राजीनामा दिल्यानं शिवसेना 60, कॅांग्रेस ४२ , हणमंत डोळस यांचे निधनांनंतर राष्ट्रवादी ४०, बहुजन विकास आघाडी ३, शेकाप ३, एम आय एम २, भारीपा बहुजन महासंघ १, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया १, रासपा १, समाजवादी पार्टी १, अपक्ष ७ असे संख्याबळ आहे. माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचा कार्यकाल २४ एप्रिल २०२० पर्यंत असल्यानं निवडून येणा-या सदस्याला केवळ ११ महिन्यांचा कार्यकाल मिळणार आहे. तसंच विधानसभेत युतीचे संख्याबळ जास्त असल्यानं विरोधक या पोटनिवडणूकीत उतरण्याची शक्यता कमी दिसतेय त्य़ामुळं ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. कॉंग्रेसमधून भाजपाचत गेलेले भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. सांगली जिल्हाध्यक्षाच्या नात्याने भाजपचा विस्तार करण्यात तसंच नुकत्याच झालेल्या निवडणूकीत भाजपाला यश मिळवून देण्यात देशमुखांचा महत्त्वाचा वाटा आहे.

Updated : 27 May 2019 12:37 PM GMT
Next Story
Share it
Top