Home > मॅक्स रिपोर्ट > गडचिरोली जिल्ह्याची मागणी "दारूमुक्त उमेदवार -दारूमुक्त निवडणूक"

गडचिरोली जिल्ह्याची मागणी "दारूमुक्त उमेदवार -दारूमुक्त निवडणूक"

गडचिरोली जिल्ह्याची मागणी दारूमुक्त उमेदवार -दारूमुक्त निवडणूक
X

राजकीय पक्ष उमेदवार जाहीर करतात आणि जनता त्यातील एकाला मतदान करते. पण गडचिरोली जिल्ह्यात याच्या विरुद्ध गोष्ट यंदा घडत आहे.आमचा उमेदवार कसा असावा यासाठी जिल्ह्यातील २८७ गावांच्या १२० ग्रामपंचायतींनी ग्रामसभांमध्ये प्रस्ताव पारित केले आहे. यामध्ये त्यांनी ही निवडणूक दारूमुक्त व्हावीच पण पक्षाने निवडलेला उमेदवारही दारूमुक्त असावा. दारूविक्रीचे समर्थन करणार्‍या उमेदवाराला तिकीट देऊन नका असे आवाहन सर्वच राजकीय पक्षांना केले आहे. त्यामुळे हा लोकशाहीसाठी आनंदाचा आणि विजयाचा दिवस आहे. जनतेची हीच मागणी आम्ही राजकीय पक्षांपर्यंत पोहोचवीत असल्याची भूमिका मुक्तिपथचे संस्थापक डॉ. अभय बंग यांनी सोमवारी पत्रपरिषदेत मांडली.

विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘दारूमुक्त उमेदवार आणि दारूमुक्त निवडणूक’ या विषयावर आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, जिल्ह्यातील ६०० गावांनी आपल्या गावातील दारू बंद करून ठेवली आहे. ती अशीच टिकून राहावी यासाठी २८७ गावांनी अधिकृतपणे ग्रामसभेत तीन प्रस्ताव पारित केले आहे. या प्रस्तावात त्यांनी पहिले आवाहन राजकीय पक्षांना केले आहे की तुम्ही उभा करीत असलेला उमेदवार स्वतः दारू न पिणारा व दारूबंदीचे समर्थन करणारा असावा. दूसरे आवाहन उमेदवारांना आहे की निवडणुकीच्या प्रचारात दारूचे वाटप करू नये. आणि तिसरे आवाहन स्वतः मतदारांना केले आहे की दारूच्या नशेत मतदान करू नये. निवडणूक मार्गदर्शक तत्वांमध्ये दारूचा विरोध करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू असल्याने ही मागणी महाराष्ट्र शासनाच्या कायद्याशीही सुसंगत आहे. त्यामुळे घटनेच्या आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राजकीय जागृतीची ही मागणी जिल्ह्यातील जनता करीत आहे. सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार आता जाहीर होतील. त्यामुळे सर्वच पक्षांनी व तिकीट मिळालेल्या उमेदवारांनी ही भूमिका लक्षात घेत जनतेच्या मताचा आदर करावा असे आवाहन मुक्तिपथ, सर्च आणि गडचिरोली जिल्ह्यातील जनतेच्या वतीने डॉ. अभय बंग यांनी यावेळी केले. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही असे आवाहन करण्यात आले होते. त्या वेळी प्रमुख पाच पक्षांच्या उमेदवारांनी निवडणुकीत दारूचा वापर व वाटप करणार नसल्याचे लेखी आश्वासन दिले होते. पण यंदा लोकांनी आधीच उमेदवार दारूबंदीचा समर्थक असावा अशी मागणी केली आहे. त्यामुके जनतेचे हे मत राजकीय पक्षांनी लक्षात घ्यावे असे आवाहनही डॉ. अभय बंग यांनी यावेळी केले. मुक्तिपथ चे संचालक डॉ. मयूर गुप्ता हे देखील यावेळी उपस्थित होते.

राजकीय नेत्यांनो, गडचिरोलीच्या दुर्गम भागातही मतदार राहतात

संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी व्हावी

गरीब आणि मागास समजल्या जाणार्‍या गडचिरोली जिल्ह्याने केलेली दारुमुक्त उमेदवार आणि दारुमुक्त निवडणूक ही मागणी संपूर्ण राज्याला एक नवी वाट दाखविणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्या जनतेने राजकीय पक्षांना आणि शासनाला दारुमुक्त निवडणुकीचे आवाहन करावे अशी अपेक्षा डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केली.

जनतेच्या मागण्या काय

विधानसभा निवडणुकीत उमेदवार कसा असावा याबद्दल २८७ गावांनी ग्रामसभांमध्ये प्रस्ताव पारित करून राजकीय पक्षांना आवाहन केले आहे. देसाईगंज तालुक्यातील १२, आरमोरी १८, कुरखेडा ४, कोरची ७, धानोरा ११, गडचिरोली २३, चमोरशी ११, मुलचेरा ९, एटापल्ली ६, भामरागड ८, अहेरी २ आणि सिरोंचा तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे.

गडचिरोलीतल्या रणरागिणींनी पकडली अवैध दारू

१. राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी उभा करायचा उमेदवार स्वतः दारू न पिणारा असावा व दारूबंदीचा समर्थक असावा.

२. उमेदवारांनी निवडणुकीच्या प्रचारात दारू वाटप करू नये.

३. मतदारांनी मतदान दारूच्या नशेत करू नये.

या तीन गोष्टींना सकारात्मक प्रतिसाद देत सर्व राजकीय पक्षांनी जनतेच्या मतांचा सन्मान करावा. उभा राहणारा उमेदवार दारू पिणारा, दारूचे समर्थन करणारा किंवा मतांसाठी दारूचा वापर करणारा असल्यास अशा उमेदवाराला जनता मत देणार नाही. दारू पिणार्‍याला उमेदवारी देऊ नका अशा आशयाचे बॅनर गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र लावण्यात आले आहे आहेत.

Updated : 1 Oct 2019 8:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top