Home > मॅक्स रिपोर्ट > प्रिय पंतप्रधान, तुम्हांला जराही लाज वाटत नाही का? - राहुल गांधी

प्रिय पंतप्रधान, तुम्हांला जराही लाज वाटत नाही का? - राहुल गांधी

प्रिय पंतप्रधान, तुम्हांला जराही लाज वाटत नाही का? - राहुल गांधी
X

पाकिस्तानातून भारतीय पायलट अभिनंदन सुखरूप परतल्यानंतर पुन्हा राफेल विमानाचा मुद्दा चर्चेत आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका भाषणात राफेलचा मुद्दा काढला, त्यावरून त्यांनी काँग्रेसवर टीका केली. मोदींच्या टीकेला काँग्रेसनंही जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये आणखी चांगले परिणाम पाहायला मिळाले असते जर भारतीय हवाई दलाकडे राफेलसारखी विमानं असती तर, असं वक्तव्यं पंतप्रधान मोदींनी करत काँग्रेसमुळं राफेल खरेदीत होऊ शकली नसल्याचं म्हटलंय. या एरिअल स्ट्राईकमध्ये भारताला राफेलची कमतरता जाणवली. आज संपूर्ण देश म्हणतोय की, आपल्याकडे राफेल असतं तर सर्व काही शक्य झालं असतं. काही राजकीय पक्षांच्या हेकेखोरपणामुळं संपूर्ण देशाला त्याचा त्रास झाल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. भारतानं दहशतवादाविरोधात पुकारलेल्या लढाईला जगभरातून पाठिंबा मिळतोय. मात्र, या लढाईवरच काही पक्ष प्रश्न उपस्थित करत आहेत. सध्या भारतापुढे आणखी एक आव्हान आहे ते म्हणजे काही लोकं स्वतःच्याच देशाला विरोध करत आहेत. जेव्हा संपूर्ण देश लष्करासोबत उभा आहे, तेव्हा लष्करावरही काही राजकीय पक्ष शंका घेत आहेत, असं सांगत मोदींनी काँग्रेससह विरोधी पक्षांवरही टीका केलीय. विरोधकांनी मोदी आणि त्यांच्या धोरणांची चिकित्सा जरूर करावी, मात्र, हे करतांना मोदी विरोधामुळं जैशचा म्होरक्या मसूद अजहर आणि हाफिज सईद यांच्या समर्थकांना बळ मिळेल, असं कृत्य करू नका, अशी टीकाही मोदींनी केलीय. काही राजकीय पक्षांच्या लोकांची वक्तव्यं पाकिस्ताननं मोदींच्या विरोधात वापरली आहेत, याकडेही मोदींनी लक्ष वेधलं आहे.

प्रिय पंतप्रधान, तुम्हांला जराही लाज वाटत नाही का ?

पंतप्रधान मोदींनी राफेलवरून काँग्रेसवर टीका केली. त्या टीकेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी ट्विटद्वारे उत्तर दिलंय. राहुल ट्विटमध्ये म्हणाले, प्रिय पंतप्रधान, तुम्हांला लाज कशी वाटत नाही ? ३० हजार कोटींची चोरी करून तुम्ही तुमचे मित्र अनिल अंबानी यांना दिले. राफेल विमान भारतात येण्यासाठी एकमेव तुम्हीच जबाबदार आहात. तुमच्यामुळेच भारतीय हवाई दलाचे वीर विंग कमांडर अभिनंदन यांना आपला जीव धोक्यात घालून जेटसारखी कालबाह्य विमान चालवावी लागत आहेत, असा गंभीर आरोपच राहुल गांधी यांनी केलाय.

Updated : 2 March 2019 5:57 PM GMT
Next Story
Share it
Top