कोरोनाशी लढा- महाराष्ट्रातील वाढत्या रुग्णसंख्येचा नेमका अर्थ काय?

covid-19 - curve is really  falttening in maharashtra, shows research report
Courtesy : Social Media

देशात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातही महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. पण महाराष्ट्रातील रुग्णसंख्या वाढत चालली असली तरी रुग्णसंख्या वााढीची पातळी आता समांतर असल्यानं हे कोरोनाचं संकट हळूहळू कमी होत असल्याचे संकेत असल्याचा निष्कर्ष मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक नीरज हातेकर आणि प्राध्यापक पल्लवी बेल्हेकर यांनी आपल्या संशोधन अहवालातून मांडला आहे.

सध्या जगभरात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना विषाणूचे गंभीर परिणाम आणि त्याच्या संक्रमणाचा वाढता दर अभ्यासल्यानंतर यातून मिळणारी माहिती सर्वसामान्यांच्या समजुतीपेक्षा उलट असल्याचे लक्षात येते. कोरोना विषाणू संक्रमणाचा वाढता दर अभ्यासण्यासाठी विविध तज्ज्ञ मंडळी सातत्यपूर्वक परिश्रम घेत आहेत. त्यांनी पुरवलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात कोरोना संक्रमणाचा वाढत्या दर संथपणे ओसरते आहे.

संपूर्ण भारतात महाराष्ट्राच्या  एकूण ३६% कोविड -१९ च्या केसेस आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चला पहिली टाळेबंदी जाहीर केली, त्यावेळी देशभरात कोरोना  रुग्णसंख्या फक्त ५०० एवढी होती. भारतात  टाळेबंदीचे 3 टप्पे पूर्ण झाले असून चौथा टप्पा  संपत आलेला आहे. शासनाने या तीन टप्प्यांमध्ये उचललेली प्रभावशाली पावले कोरोना रुग्णसंख्या वाढीचा दर कमी करण्यात अत्यंत उपयुक्त ठरली आहेत.

पहिल्या टाळेबंदीमध्ये प्रत्येक राज्यामध्ये किमान दहा रुग्ण संख्या असताना कडक निर्बंध लादून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला गेला. तज्ज्ञ मंडळींच्या माहितीनुसार वेळ आणि कोरोना संक्रमणाच्या नवीन रुग्णांचा आलेख काढला तर तो  ‘S’ आकारात तयार होतो. यानुसार सुरुवातीच्या टप्प्यात हा  वाढीचा दर  एकदम संथ असतो, नंतर झपाट्याने वाढतो आणि तिसऱ्या टप्प्यात तो हळूहळू ओसरतो.

मर्यादित वातावरणात विषाणूंची  वाढ होते आणि नंतर ती स्थिर होते. जसे दुधाचे दही होताना सुरुवातीला जे विरजण असते त्यात बॅक्टेरियाचे प्रमाण कमी असते पण दुधाचे दही होण्याच्या प्रक्रियेत ते बॅक्टेरिया वाढतात आणि  दही झाले की त्यांचे प्रमाण स्थिर होते. त्याचप्रमाणे आपले राज्य हे दह्याच्या वाडगा आणि  कोरोना संक्रमित व्यक्ती ही बॅक्टेरिया समजूया. जनजागृती,  सामाजिक अंतर,  विलगीकरण,  टाळेबंदी,  विविध चाचण्या, विलगीकृत लोकांच्या हालचालींवर नियंत्रण, औषध-उपचार इत्यादीद्वारे आपण एका मर्यादित वातावरणाची निर्मिती केलेली आहे, त्यामुळे हा वाढता दर नियंत्रणात येतो आहे.

कोविड-१९ च्या वाढीचा दर महाराष्ट्रात  कसा आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधताना मुंबई-पुण्यासारखी महानगरे अग्रस्थानी असल्याचे लक्षात येते. फक्त मुंबईमध्येच ६% केसेस असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा दर ओसरला होता पण नंतर हाच दर झपाट्याने वाढत गेला. मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण व त्यांना सुरक्षित घरांची असणारी कमतरता, दक्षता न  घेता गर्दी करणारे लोक, झोपडपट्टीमधील असुरक्षित जीवन, तेथील अस्वच्छ वातावरण यामुळे विषाणूंचा प्रादुर्भाव आणि संक्रमणाचा दर वाढतो आहे.

परंतु समाधानाची बाब अशी की टाळेबंदीच्या अंमलबजावणीमुळे कोरोना रुग्णांच्या दुपटीच्या दराच्या वेळेमध्ये वाढ झाली आहे. टाळेबंदी -३ मध्ये नवीन रुग्ण एवढ्या प्रमाणात वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे लोकांचे शहराकडून आपल्या गावाकडे होणारे स्थलांतर होय. महाराष्ट्रातील जिल्हानिहाय केसेसचा अभ्यास केल्यानंतर बऱ्याच जिल्ह्यांच्या हा दर कमी झाला आहे. तसेच  तिसऱ्या टाळेबंदीच्या दरम्यान आणि टाळेबंदीनंतर ज्या जिल्ह्यांमधून लोकांचे स्थलांतर झाले आहे तिथे हा दर वाढल्याचे दिसून येते.

कोरोना महामारीमुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीयुक्त वातावरण आहे, तरी त्यांना वाटते तेवढी कठीण परिस्थिती महाराष्ट्राची नक्कीच नाही. लोकांच्या चिंतेमध्ये भर घालणारे  वक्तव्य, बातमी, राजकारण,  चुकीची माहिती न पसरवता महानगरातील गरीब जनतेला या आणीबाणीच्या प्रसंगी मदत करावी आणि ही साखळी संपुष्टात आणण्यासाठी  कसून प्रयत्न करावे.