Home > News Update > "करोना, डरोना आणि मरोना..." 

"करोना, डरोना आणि मरोना..." 

करोना, डरोना आणि मरोना... 
X

जगभरात करोना व्हायरसने (हिंदीत कोरोना) थैमान घातले आहे. आता त्याचे हादरे भारतालाही बसायला लागले असून गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त एकच चर्चा सुरु आहे... करोना व्हायरस.!! दर दोन वर्षांनी एक नवा व्हायरस येतो आणि जग कवेत घेवू पहातो... वर्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिलेल्या माहितीनुसार करोनाने चीनसह जगभरात आतापर्यंत 3000 हुन अधिक बळी घेतले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून चीनसह जगभरात करोनाचा प्रताप आणि प्रभाव ओसरायला सुरुवात झाली असताना अचानक भारतात करोनाच्या भीतीला सुरुवात झाली आणि सरकारने तात्काळ त्यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या. मात्र, भारतासाठी खरेच करोना इतका भयावह आहे का?

भारताला जितकी भीती दाखवली जाते ती सत्य आहे का? करोनापेक्षा कुठला भयानक व्हायरस भारतीयांच्या रक्तात शिरला आहे जो माणसे मारण्याचे काम करत आहे?? याचाही विचार करण्याची वेळ आली आहे. करोनाच्या कारनाम्यांनी आणि उभ्या राहिलेल्या (की केलेल्या) भीतीने भारतातील आत्यंतिक महत्वाच्या काही विषयांवरील लक्ष विचलित झाले आहे. तर काही प्रश्न नव्यानेच निर्माण केले आहेत.

चीनमधील वुहान प्रांतात सुरु झालेल्या करोनाचा आजपर्यंत सर्वात जास्त प्रभाव चीननंतर दक्षिण कोरिया, इटली आणि इराणमध्ये झाला असून येथे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मात्र, चीनमध्ये गेले वर्षभर याचा सर्वाधिक भितीदायक अनुभव आला असून आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू चीनमध्येच झालेले आहेत.करोनाचा अर्थ होतो "मुकुट". मात्र जागतिक उद्योगाचे "मुकूटमणी" होऊ पाहाणाऱ्या चीनच्या जागतिक बाजार व्यवस्थेचे आणि अर्थव्यवस्थेचे करोनाने पार कंबरडे मोडले आहे. पण चीनच्या पोलादी चौकटीमुळे चीनमधील करोनासंदर्भातील बातम्या चीनच्या भिंतीबाहेर आल्याच नाहीत.

चीनला करोनाचा वेढा पडल्यानंतर जगाने चीनवर अघोषित बहिष्कारच टाकला होता. चीनचा व्यापार, पर्यटन, दळणवळण सारेच काही ठप्प झाले आहे. चीनमध्ये करोनाचा हाहाकार सुरु झाल्यानंतर जगभरातील चीनमध्ये गेलेल्या व काम करणाऱ्या नागरिकांची मायदेशी परतण्यासाठी धडपड सुरु झाली. यातूनच करोनाचे संक्रमण जपान, दक्षिण कोरिया, इटली, आणि इराणकडे झाले. या करोनाची भीती इतकी की, जगभरातील कोणताही देश चीनकडून मायदेशी येणाऱ्या आपल्या नागरिकांना सहजासहजी स्वीकारायलाही तयार नव्हता.

गेले अनेक महिने सुरु असलेला चीनमधील करोनाचा प्रभाव ओसरतो आहे असे वाटत असताना अचानक भारतात करोनाची जोरदार चर्चा सुरु झाली. सरकारी यंत्रणा कामाला लागल्या, माध्यमांवर धडाधड बातम्या झळकायला लागल्या आणि जगातले संकट आपल्या उंबऱ्यापर्यंत येवून ठेपल्याची जाणीव भारतीयांना झाली. भारतात केरळ, तेलंगणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशनध्ये आतापर्यंत 40 करोनाबाधित संशयित रुग्ण ( बाधित नाही) आढळले आहेत. अशी चर्चा आहे. भारतात आतापर्यंत एकही करोना बळी गेलेला नाही. तसेच भारतात ती कमी आहे. भारतीयांच्या अन्न शिजवून खाण्याच्या आहार पद्धती आणि येथील उष्ण वातावरण यामुळे भारतात करोनाचा प्रसार होण्याची शक्यता फार कमी आहे, ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. मात्र, सरकारने जनतेच्या मनात "करोना" नामक "डरोना"चे खौफ इतक्या मोठ्या प्रमाणात भरायला लावले आहे की, मोबाईल कानाला लावला तरी सरकारी करोनाची भीती, टीव्ही लावला, तरी करोनाची भीती आणि बाहेर फिरले, तरी करोनाची भीती. त्यामुळे काळजी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांपेक्षा सरकारपुरस्कृत पसरवल्या जाणाऱ्या करोनाच्या भीतीमुळे भारतातील सर्वच क्षेत्रात याचे भयावह परिणाम होत असून या परिणामांची चिंता आणि चर्चा करणे येथे क्रमप्राप्त आहे.

दिल्लीची दंगल, 53 जणांचा बळी -

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा विजय आणि भाजपाचा पराभव झाल्यानंतर CAA च्या मुद्यावर राजधानी दिल्लीत भयावह दंगली उसळल्या. पोलिसांनी आणि "द हिंदू" ने दिलेल्या माहिनीनुसार यात तब्बल 53 जणांचे जीव गेले तर 270 अधिक नागरिक जखमी झाले आहेत. यात हिंदू आणि मुसलमान या दोघांचाही समावेश आहे. हा दंगलीचा व्हायरस देशभरात पसरतो की काय असे वाटावे? अशी परिस्थिती असताना अचानक भारतात करोनाचे प्रवेश झाला आणि दिल्ली दंगलीवर संपूर्ण पडदा पडला. जणू करोनाने दिल्ली दंगल (की दंगलीचा विषयच) संपवून टाकला, जो आप आणि भाजपा या दोघांसाठीही अडचणीचा होता. करोना सर्वांचा बाप निघाला. मात्र, या दंगलीत मेलेली माणसे, झालेले प्रचंड नुकसान व त्याचे परिणाम यावर चर्चा होणे भाग होते. तोही विषय संपला. राजधानी दिल्लीत मानवनिर्मित घडवलेल्या दंगलीत मेलेल्यांची संख्या भारतातील करोना संशयित रुग्णांपेक्षाही कितीतरी अधिक आहे, ही बाब आपण कायम लक्षात घेतली पाहिजे.

आधी सोशल मीडिया मग करोना…

दिल्लीची दंगल संपते न संपते तोच भारताचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपण सोशल मीडिया सोडत असल्याचे जाहीर केले आणि जणू सर्व भारतीयांवर दु:खाचा डोंगर कोसळतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाल्याच्या अविर्भावात तमाम मीडियाने याला प्रचंड कव्हरेज दिले. यावर मोठे शो केले. पुढील पाच दिवस व्यापलेल्या टिव्हीच्या पदद्यावर पड़दा पडतो न पडतो तोच भारतात करोना व्हायरसचे आगमन झाले आणि भारतात माध्यमांसाठी "करोना - डरोना"ची परिस्थिती निर्माण झाली.

आर्थिक कोंडीतून सरकारची सुटका ?

खरे तर भारतावर सर्वात मोठे संकट कोसळले आहे ते आर्थिक कोंडीचे आणि बेरोजगारीचे. भारताचा जीडीपी 3 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. अर्थव्यवस्था सावरण्याचे सर्वात मोठे आव्हान सरकारसमोर असताना सरकार वारंवार यापासून पळ काढताना दिसत आहे आणि जात - धर्म- राममंदिर- सीएए - करोनाच्या आडून त्यावर मार्ग काढू पहातेय. माध्यमांवर बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेच्या बातम्या झळकूच नयेत याची खबरदारी घेत रोज नवा नवा विषय माध्यमांसाठी पुरवला जात आहे. हे आतापर्यंत सिद्ध झाले आहे. करोनामुळे काही काळ का होईना आर्थिक कोंडीतून सरकारची सुटका झाली आहे हेच सिद्ध होत आहे.

औषध कंपन्यांची दिवाळी

कोणताही आजार आला की, सर्वात आधी दिवाळी सुरु होते ती औषध कंपन्यांची. करोनाच्या आगमनाने मास्क, एन्टी बायोटिक्स, सेनेटरची प्रचंड मागणी सूरु झाली असून ही मागणी पुढील काळात वाढतच जाणार आहे. सरकार कितीही प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या तयारीची भाषा करत असले तरी त्यांची सगळी मदार औषध कंपन्यांवरच असते. औषध कंपन्यांनी स्टॉक केलेला प्रचंड माल संपणेही आवश्यक असते. त्यासाठी "भीती" आवश्यक असते. त्यामुळेच "आजार आवडे औषध कंपन्यांना" हे सत्य कधी लपून राहिलेले नाही.

पर्यटनावर - व्यवसायावर प्रचंड परिणाम

करोनाच्या धसक्याने देशांतर्गत आणि देशाबाहेरील पर्यटनावर प्रचंड परिणाम झाला असून माणसे घराबाहेर निघायलाही घाबरत आहेत. त्यामुळेच "प्रवास नको आणि पर्यटनही नको" असा सार्वत्रिक प्रभाव सुरु झाला आहे. पर्यटनस्थळे, हॉटेल ओस पडायला लागली आहेत. आमचे एक मित्र व्यवसायानिमित्त दिल्ली ते कलकत्ता असा प्रवास करत होते. 260 फ्लाइटच्या या विमानात केवळ 26 प्रवासी होते. या म्हणजेच विमान कंपन्या, ट्रॅवल्स यावरही याचा प्रचंड परिणाम झाला आहे. उद्योग, व्यवसाय अडचणीत आले आहेत.

माणूस घरातून बाहेर पडला की तो किमान 10 जणांना रोजगार देतो. यात टैक्सीवाला, हॉटेलवाला, दुकानदार, पानवालापासून अनेकांचा समावेश आहे. या सर्वांचे रोजगार बुडाले आहेत. या सर्वांचे दूरगामी परिणाम पुढील काही महिने आपल्यावर होणार आहेत.

हॉटेल, रेस्ट्रोरेंट ओस

करोनाच्या कारनाम्यांचा हॉटेल, रेस्ट्रोरेंटवर प्रचंड प्रभाव पडला असून लोक लोकल आणि प्रवास वगळता गर्दीच्या ठिकाणी जायला टाळत आहेत. तसेच खवय्यांनी चिकन, मटनासह नॉन व्हेजवर अघोषित बहिष्कारच टाकल्याने लोक जेवणासाठी, पार्टीसाठी हॉटेल, रेस्ट्रोरेंटमध्ये यायला टाळायला लागली आहेत. त्यामुळे मुंबई, दिल्ली, कलकत्ता, बंगलोरसह सर्वच मेट्रो सिटीमध्ये हॉटेल, रेस्ट्रोरेंट ओस पडायला लागली असून हॉटेल इंडस्ट्री अडचणीत आली आहे.

कोबड्या व पोल्ट्री व्यवसायावर संक्रांत

करोना हा कोंबड्यांपासून पसरतो हे आपल्या डोक्यात कायम फिट बसले असल्यामुळे याचा पहिला फटका बसतो तो पोल्ट्री व्यवसायावर. लोकांनी चिकन खाणे बंद केल्यामुळे किंवा तसा प्रचार होत असल्याने एरवी 200/250 ने विकल्या जाणाऱ्या चिकनला आता कोणी 10 - 20 रुपये किलोनीही खरेदी करायला तयार नाही. मागणी नसल्यामुळे पालघरमधील एका उद्योजकाने नऊ लाख अंडी, दीड लाख पिल्ले आणि एक लाख कोंबड्या जमिनीत पुरुन त्याची विल्हेवाट लावली. इतके प्रचंड करोना भीतीचे सावट या व्यवसायावर असून हे सर्वच्या सर्व शेतकरी आहेत. त्यामुळे या करोनाने पोल्ट्री व्यवसायासह शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले असून शेतकरी यातून सावरतील की नाही यांची शाश्वती राहिली नाही. तसेच या व्यवसायावर अवलंबून असणारे सगळेच जण अडचणीत आले आहेत. म्हणूनच या करोनाने माणसे मारली नाहीत. पण केवळ भीतीने लाखो शेतकरी जरूर मारले आहेत.

कापूस, भाजीपाला व कृषी निर्यातीवर परिणाम

करोनामुळे कापूस, भाजीपाला, फळे, चिकन- मटन यांच्या खरेदी - विक्री आणि निर्यातीवर प्रचंड परिणाम झाला आहे. फळे- भाजीपाला, मटन - चिकन , दूग्धजन्य पदार्थ नाशवंत असल्याने ते अधिक काळ साठवूही शकत नाही आणि त्याच्या खर्चातही वाढ होते. त्यामुळे त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना व त्यावर अवलंबून असणाऱ्या सर्वच यंत्रणांना बसत आहे.

500 ते 1000 करोडचे नुकसान

भारतातील केवळ करोना नामक भीतीनेच शेती, शेतकरी आणि छोट्या - मोठ्या उद्योजकांचे किमान 500 ते 1000 कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. यातील सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे असून ते कधीही भरून न निघणारे असे आहे. त्यामुळे एखादी गोष्ट पसरवताना - त्याच्या परिणामांची चिंता करताना त्याचे दुष्परीणाम काय होतात याचाही आपण विचार करायला हवा.

रोज होतायत शेतकरी आत्महत्या

भारतात शेतकरी आत्महत्यांचा प्रचंड मोठा व्हायरस पसरला असून गेल्या काही वर्षात लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. महाराष्ट्रात रोज किमान दोन तरी शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र, सरकारदरबारी यावर कुठल्याही प्रभावी उपाययोजना होताना दिसत नाहीत. गेल्या दोन दशकांची शेतकऱ्यांच्या हमीभावाची मागणीही मान्य होत नसल्याने या शेतकरी आत्महत्यांच्या व्हायरसची तीव्रता अधिक वाढत आहे.

अहमदनगरमध्ये 'बळीराजा नको करू आत्महत्या' असे एकीकडे मुलगा शाळेत गीत सादर करत असताना वडील आत्महत्या करतात तर दुसरीकडे कर्जमाफीच्या यादीत नाव आले नाही म्हणून जालन्यातील शेतकरी आत्महत्या करतो.

जरी वरवर या आत्महत्या वाटत असल्या तरी त्याचा सर्वांगाने विचार केला असता या राजकीय हत्याच आहेत. याचा प्रत्यय येईल. प्रचंड राजकीय अनास्था, शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नांच्या खोलात न जाण्याची वृत्ती, शेतकरी वर्ग असंघटित असल्याने त्याच्या अगतिकतेचा घेतला जाणारा गैरफायदा, शेतकऱ्यांच्या घामाला न मिळणारे योग्य दाम याची परिणीती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये होत आहे. त्यामुळे केवळ कर्जमाफीसारख्या वरवरच्या उपाययोजनांमध्ये समाधान मानून फायदा नाही. तर या प्रश्नांचा सर्वांगिण वेध घेत त्याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. तरच जगभरातील करोना व्हायरसपेक्षा भयावह रूप धारण केलेला भारतातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा व्हायरस थांबवता येईल. यासाठीच सरकारने करोनाबरोबरच "मरोना"ची नकारात्मक मानसिकता झटकायला हवी. कारण भारतातील शेतकरी आत्महत्यांच्या व्हायरसमुळे जगात कोणत्याही व्हायरसने (रोगाने) बळी गेले नाहीत. इतके बळी गेले आहेत आणि अजूनही हा व्हायरस थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळेच सरकारचा "करोना, डरोना आणि मरोना" खेळ आता कुठे तरी थांबायला हवा.

- अ‍ॅड. विवेक ठाकरे, मुंबई

Updated : 10 March 2020 9:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top