Home > मॅक्स रिपोर्ट > मुख्यमंत्र्यांनी घेतली संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक

मुख्यमंत्र्यांनी घेतली संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक

मुख्यमंत्र्यांनी घेतली संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक
X

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गुप्त बैठक पार पडली आहे. नागपुर मधील स्मृतीभवन येथे ही बैठक पार पडली असल्याची माहिती सुत्रांनी दिली अाहे. विशेष म्हणजे या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत:चा सुरक्षा रक्षकाचा ताफा न नेता हजरी लावल्याचे समजते.

या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह विदर्भातील संघ परिवारातील संघटनांच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसह संघाचे महत्वाचे सर्व पदाधिकारी तसंच राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थिती होते.

दरम्यान पाच राज्याच्या झालेल्या निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर आता अवघ्या चार ते पाच महिन्यांवर लोकसभेच्या निवडणुका आल्या असून त्यानंतर लगेचच राज्यात विधानसभेची निवडणुक आहे. त्यात ग्रामीण भागात भाजपबाबत नाराजीचा सूर असल्याचं पाहायला मिळत असून त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकांच्या पार्श्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची संघ परिवारातील भेट महत्वाची असल्याचं बोललं जात असून राजकीय वर्तुळात या भेटीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

या भेटी संदर्भात अद्यापर्यंत कोणीही जाहीर वाच्यता केली नसून या बैठकीमागे कोणते कारण होते तसंच या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्यापपर्यत समोर आलं नसलं तरी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ही बैठक घेतली असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

Updated : 28 Dec 2018 1:00 PM GMT
Next Story
Share it
Top