Home > News Update > ‘स्वच्छता दुत’ सुशिला मोदींना म्हणतात... ' मोदी दादा मला रोजगार द्या'

‘स्वच्छता दुत’ सुशिला मोदींना म्हणतात... ' मोदी दादा मला रोजगार द्या'

‘स्वच्छता दुत’ सुशिला मोदींना म्हणतात...  मोदी दादा मला रोजगार द्या
X

दुपारच्या रणरणत्या उन्हात सात महिन्यांची गर्भवती हातात पहार घेऊन खड्डा खणतेय. मधूनच क्षणभर विसावत घाम पुसते. पुन्हा एकाग्रतेने काम सुरू. तीन दिवस लगातार काम करून ती हा खड्डा पूर्ण करते... पुढच्या चार दिवसांत या शोष खड्ड्यावर शौचालय उभे राहतं.

हे सगळं केलं सुशीला खुरकुटे यांनी. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील नांदगाव या छोट्याशा गावातली जिद्दी महिला. 2017 मध्ये पालघर जिल्हा स्वच्छता अभियानाच्या त्या ब्रँड अँबेसिडर झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शक्ती अवार्ड देऊन त्यांचा सन्मान देखील करण्यात आला. तसंच राष्ट्रीय पातळीवर निवडल्या गेलेल्या अशाच ३० जिगरबाज महिलां सोबत सुशीला यांचं देखील नाव जोडलं गेलं.

यामुळे साहजिकच शासन आमच्याकडे लक्ष देईल. असं त्यांना वाटतं होतं. परंतू मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे हे कुटूंब आजही रोजगारासाठी भटकतंय. गावातल्या इतर महिलांप्रमाणे सुशीला यांना उघड्यावर शौचालयाला जावं लागायचं. त्यांनी स्वच्छ भारत अभियानाबद्दल ऐकले. घरात शौचालय असायला हवे. त्यातून स्वच्छता राहील आणि आपल्या कुटुंबाचे, मुलांचे आरोग्यही जपता येईल, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विचार तिला मनोमन पटले. मजूर लावून खड्डा खोदण्या इतपत सुशिलाकडे पैसे नव्हते आणि मदतीला पतीला घ्यावे तर रोजगार बुडणार. मग सुशीला यांनी स्वतःच पहार घेऊन काम सुरू केले. याच दरम्यान ‘युनिसेफ’चे सल्लागार जयंत देशपांडे तिथून जात असताना त्यांनी सुशीला यांचा काम करताना फोटो काढला.

राज्याच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे सचिव राजेश कुमार यांनी याची दखल घेत सुशीलाबाईंचे नाव केंद्र सरकारकडे धाडले.

केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता सचिव परमेश्वर अय्यर यांनी तो ट्विट केला आणि चक्रे फिरली. मोदी सरकारने सुशिला यांना तात्काळ मदत करत सुशीला यांचे शौचालय बांधून पूर्ण केले, शिवाय त्या गावातल्या इतर महिलांचे प्रेरणास्थान व्हावे म्हणून पंतप्रधान मोदींनी त्यांना स्वच्छतादूत बनवले. संपूर्ण पालघर जिल्ह्याच्याच त्या ‘स्वच्छतादूत’ झाल्या. पंतप्रधान कार्यालयाने सुशीलाबाईंच्या कामाची नोंद घेतली. महाराष्ट्रातून पाठवलेल्या १५ नावांमधून त्यांना राष्ट्रीय पातळीवर शक्ती सन्मानासाठी निवडले. व गुजरातमधील गांधीनगर 8 मार्च 2017 येथे महिला दिनी खुद्द पंतप्रधानांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

सुरुवातीला त्या अनेक वेळा माध्यमांसमोर झळकल्या परंतू माध्यमांसमोर झळकल्यानं वित भर पोटाची टीचभर खळगी थोडीच भरणार होती. त्यामुळे तिचा हा सन्मान सत्कार सोहळा पुरस्कारा पुरताच मर्यादित राहील्याचं म्हणावं लागेल. कारण... सुशीला खुरकुटे हया त्यांच्या तोडक्या - मोडड्या बोली भाषेत मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना सांगतायत की ‘मोदी दादा मला स्वच्छतादूत बनवलं हे तू चांगलं केलं, परंतु मला काम दिलं नाही. काम दिलं असतं तर मला माझ्या लहान लहान मुलांना कामासाठी बाहेरगावी घेऊन जावं लागलं नसतं. म्हणून तू मला काम दे’ जणू काही साकडंच त्यांनी पंतप्रधानांना घातलंय.

आता पंतप्रधान नरेंद्र त्यांना दादा म्हणणाऱ्या सुशीलाचं गाऱ्हाणं ऐकून तिच्या मदतीस धावून येतील का? तिच्या रोजगाराचा प्रश्न सुटेल का? हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.

सुशीला यांना सरकारी मदत तर सोडाच परंतू स्वच्छतादूत असलेल्या सुशिलाला आजपर्यंत कोणत्याही शासकीय कार्यक्रमात देखील बोलावण्यात आलेल नाही. शासनाकडून कोणतीच मदत देखील मिळाली नाही. आजही या कुटूंबाचा रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. शासनाच्या उज्वला गॅस योजनेचा लाभ देखील सुशिलाच्या कुटूंबाला मिळालेला नाही. दर वर्षीच सुशीलाच्या कुटूंबियांना रोजगारासाठी स्थलांतरित व्हावे लागते. यामुळे शासनाने या कुटूंबियांच रोजगार दिला असता तर त्यांना स्थलांतरित तरी व्हावं लागले नसतं. मत युवा आदिवासी संघटनेचे जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केलं आहे.

Updated : 11 Sep 2019 1:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top