Home > मॅक्स रिपोर्ट > #SaalBhar60: लॉकडाऊननंतर मोकळा श्वास घेता यावा यासाठी मुंबई करांची एकजूट!

#SaalBhar60: लॉकडाऊननंतर मोकळा श्वास घेता यावा यासाठी मुंबई करांची एकजूट!

#SaalBhar60: लॉकडाऊननंतर मोकळा श्वास घेता यावा यासाठी मुंबई करांची एकजूट!
X

हॉर्वर्ड आणि इटलीमध्ये होत असलेल्या अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे की, वायू प्रदुषण अधिक असणाऱ्या भागांमध्ये कोविड-१९ चे रुग्ण आणि मृतांची संख्याही अधिक आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छ हवेसाठी राबवल्या जाणाऱ्या #SaalBhar60 या डिजिटल उपक्रमाच्या माध्यमातून मुंबईकर स्वच्छ आणि आरोग्यदायी हवेच्या मागणीसाठी एकत्र आले आहेत.

केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने (सेंट्रल पल्युशन कंट्रोल बोर्ड-सीपीसीबी) आखून दिलेल्या ६० मायक्रोग्रॅम्स पर क्युबिक मीटर (μg/m3) या सुरक्षित पातळीनुसार (२४ तासांसाठी) शहरात PM 2.5 पातळी राखली जावी यासाठी योग्य उपाययोजना राबवल्या जाण्याची खातरजमा सरकारने करावी, अशी मागणी या मोहिमेतून करण्यात आली आहे. यामुळे आरोग्यदायी पर्यावरणाची खातरजमा होण्यासोबतच लॉकडाऊननंतर कोविड-१९ शी लढ्यालाही बळकटी मिळेल.

सीपीसीबीच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत मुंबईचा समावेश १२२ नॉन-अटेनमेंट शहरांमध्ये म्हणजेच नॅशनल एम्बियंट एअर क्वॉलिटी स्टँडर्ड्सच्या पातळीपर्यंत पोहोचू न शकलेल्या शहरांमध्ये होतो आणि येथील वायू प्रदुषण २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सेलिब्रिटीज, कार्यकर्त्यांसोबतच सामान्य नागरिकांनी ‘Clean Air for All’ आणि #SaalBhar60 अशा मागण्या करणारे फलक हातात धरलेले फोटो ट्विटरवर शेअर केले. यात MOEF&CC तसेच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टॅग करण्यात आले. अनेकांनी तर आपल्या मातृभाषेतही संदेश लिहून इंग्रजीसोबतच असामी, तेलुगु, मराठी, हिंदी या भाषांमध्येही संदेशांची लाट आणली.

Jhatkaa.org च्या कॅम्पेन मॅनेजन शिखा कुमार यांच्या मते लॉकडाऊनच्या काळात मुंबईत स्वच्छ हवा आणि निळेशार आकाश पहायला मिळते. मात्र, दुर्देव असे की या महासंकटामुळे हा बदल झाल्याने नागरिकांना मुक्तपणे श्वास घेण्यासाठी बाहेरही पडता आले नाही.

"हेच लक्षात घेऊन हरिद्वारमधील अवघ्या १२ वर्षांच्या पर्यावरण कार्यकर्त्या रिधीमा पांडे यांनी #SaalBhar60 ही भारतभरातील डिजिटल मोहीम सुरू केली. स्वच्छ हवेच्या मुद्द्यावर त्यांनी भारतभरातील विविध संस्थांचे सहकार्य मिळवले आहे. ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या मोहिमेचा कळस गाठला जावा, हा उद्देश यामागे आहे," असे त्या म्हणाल्या.

कुमार यांनी सांगितले की भारतभरातील लोकांकडून आलेली छायाचित्रे च्या वेबसाइटवर एकत्र केले जातील आणि त्यातून एक पोस्टर कोलाज बनवून ते पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन तसेच सर्व राज्यांच्या पर्यावरण मंत्र्यांना पाठवले जाईल.

अर्बन एमिशन मुंबईच्या आकडेवारीनुसार लॉकडाऊनच्या काळात PM 2.5, (NO2), नायट्रोजन डायऑक्साईड तसेच PM10च्या पातळीत लक्षणीय घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

"२० मे रोजी मुंबईतील एक्यूआयची २८ इतकी नोंद झाली. या वर्षातील हा आजवरचा सर्वात स्वच्छ हवेचा दिवस होता. सगळे व्यवहार पूर्ववत झाले की स्वच्छ हवेसाठी आपण आपल्या गाड्या सोडून देऊ, कारखाने बंद करू हे अशक्य आहे. मात्र, कठोर धोरणे आणि नियम त्यांची ठोस अमलबजावणी यामुळे चांगली आणि आरोग्यदायी हवा मिळवता येईल. त्याचीच मुंबईला गरज आहे,"

असे या मोहिमेला पाठबळ देणाऱ्या वातावरण फाऊंडेशनचे संस्थापक भगवान केशभट म्हणाले.

वायू प्रदुषणावर स्वतंत्र संशोधन करणाऱ्या अर्बन एमिशन (इंडिया)चे संचालक सरथ गुट्टीकुंडा म्हणाले,

"आपल्याला वायू प्रदुषणाचे स्रोत ठाऊक आहेत आणि आता आपण ही स्रोते स्वच्छ रहावीत यासाठी अधिक काही करण्याची गरज आहे. हे लक्ष्य गाठणे आपल्याला शक्य आहे. हे कठीण असले तरी शक्य आहे."

दळणवळण, उद्योग, कचरा, स्वयंपाक, हिटिंग, लायटिंग आणि रस्ते अशा सर्व स्रोतांना स्वच्छ ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

"मुंबईतील कोविड १९ रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शहराची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत फक्त स्वच्छ हवा आणि कमी झालेल्या आवाजाने काहीसा दिला दिला. यासंदर्भात एका बळकट जनमोहिमेची आपल्याला गरज आहे. स्वच्छ आणि हरित दळणवळणाला प्राधान्य देत उर्त्जन कमी करण्यासंदर्भात आपण प्राधान्यक्रम ठरवण्याची एकत्रित मागणी मुंबईसाठी करायला हवी,"

असे आवाज फाऊंडेशनच्या संयोजक आणि महाराष्ट्र क्लीन एअर कलेक्टिव्हच्या सदस्य सुमायरा अब्दुलाली म्हणाल्या.

काय आहे #SaalBhar60?

Jhatkaa.org ने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून या मोहिमेची सुरुवात झाली. लॉकडाऊनच्या ६०व्या दिवशी म्हणजेच २३ मे रोजी हरिद्वारमधील १२ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ता रिधिमा पांडे हिचा हा व्हिडीओ आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी 'सर्वांसाठी स्वच्छ हवा' अशी मागणी करणारे फोटोज शेअर करून वर्षभर स्वच्छ आणि आरोग्यदायी हवा मिळावी अशी मागणी करण्यात येणार आहे.

#Saalbhar60 ला कोणाचा पाठिंबा आहे…?

#SaalBhar60 ही एक जनमोहीम आहे आणि Jhatkaa.org, वातावरण फाऊंडेशन, लंगकेअर फाऊंडेशनसोबतच युथ की आवाज, लेट मी ब्रीद, फ्रायडेज फॉर फ्युचर, लेट इंडिया ब्रीद, ग्रीनपीस इंडिया, हेल्प दिल्ली ब्रदी, माय राइट टू ब्रीद, कोलकाता क्लीन एअर फोरम, मुंबईतील आरे संवर्धन ग्रूप, आवाज फाऊंडेशन आणि इतर अनेकांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे.

लॉकडाऊनमधील आकडेवारी:

लॉकडाऊन १ : २४ मार्च ते १४ एप्रिल

लॉकडाऊन २ : १५ एप्रिल ते ३ मे

लॉकडाऊन ३ : ४ मे ते १७ मे

लॉकडाऊन ४ : १८ मे ते ३१ मे

आकडेवारीचे संकलन आणि पृथ्थकरण : अर्बन एमिशन्स

संक्षिप्त रूप :

PM 2.5: २.५ मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी व्यास असलेले कण

SO2: Matter सल्फर डाऑक्साईड

NO2: नायट्रोजन डायऑक्साईड

PM10: १० मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी व्यास असलेले कण

CO: कार्बन मोनोक्साईड

O3: ओझोन

Updated : 5 Jun 2020 2:30 PM GMT
Next Story
Share it
Top