Home > मॅक्स किसान > फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी विकली 11 टन मोसंबी....

फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी विकली 11 टन मोसंबी....

फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी विकली 11 टन मोसंबी....
X

एकीकडं कोरोनाने सर्वत्र थैमान घातल्यानं, संपूर्ण बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात संचारबंदी अन लॉक डाऊन आहे. यामुळं अनेक शेतकऱ्यांनी आपल्या उभ्या पिकात नांगर फिरवला आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी जीवाचं रान करून जपलेली कलिंगड, खरबूज, टोमॅटो हे रस्त्याच्या कडेला फेकून देखील दिले आहेत. तर कित्येक शेतकरी पुरेशी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने, आपली मोसंबी, कलिंगड, खरबूज यासह इतर पीकं कवडीमोल भावात विकत असल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडं बीडच्या जरूड येथील काकडे कुटुंबीयांनी, या कोरोनाच्या वातावरणात सोशल मीडियाचा आदर्शवादी फायदा करून घेतलाय. त्यांनी चक्क फेसबुक अन वॉट्स अँप ग्रुपच्या माध्यमातून, तब्बल 11 टन मोसंबीची विक्री करून विक्रमी उत्पन्न मिळवलंय.

बीड तालुक्यातील जरूड गावचे, प्रगतशील शेतकरी बाळासाहेब काकडे. त्यांना तीन मुले असून दोन मुलं व एक सून पोलीस विभागात आपलं कर्तव्य बजावत आहेत. तर लहान मुलगा सचिन काकडे हा पोलीस भरतीची तयारी करत वडिलांना शेतात मदत करत आहे. बाळासाहेब काकडे यांनी दीड एक्कर शेतीमध्ये मोसंबीची 140 झाडं लावली आहेत. मोसंबीसह त्यांनी केशर आंबा, पेरू, जांभूळ, रामफळ, पपई यांची देखील फळबाग जोपासली आहेत. ही फळबाग जोपासण्यासाठी त्यांनी, शेतातील 20 गुंट्यांमध्ये 48 लाख लिटर पाणी साठणारा शेततलाव देखील उभारलाय. तर बहरलेल्या बागेतील मोसंबी विकण्यासाठी, पिंपरी चिंचवड येथे कर्तव्य बजावणारा मोठा मुलगा नितीन काकडे यांनी, फेसबुक व व्हाट्स अप ग्रुपवर 50 रुपये प्रतिकिलो मोसंबी घरपोहोच मिळेल, अशा पोस्ट केल्या. आणि याचाच फायदा काकडे कुटुंबियांना मोठ्या प्रमाणात मिळाला.

बाळासाहेब काकडे यांनी सुरुवातीला दीड एक्कर मोसंबी लावली होती. तर गत दोन वर्षे त्यांना मोसंबीचं उत्पन्न कमी मिळालं होतं. मात्र, यावर्षी अपेक्षापेक्षा जास्त उत्पन्न मिळालं ते फेसबुक मूळ.. ही मोसंबी सेंद्रिय खतावर जोपासल्यामुळं, अनेक शेतकऱ्यांसह अधिकाऱ्यांनी देखील, या बागेला भेट दिली आहे. आम्ही ही मोसंबी फेसबुक वर पोस्ट करून विकली आहे. कारण या पोस्टच्या माध्यमातूनच, आम्हाला ग्राहकांच्या ऑर्डर यायच्या..एकदा जर एखाद्याने मोसंबी घेतली तर आमच्याकडून त्यांनी पाच-सहा वेळा मागून घेतली आहे. आम्हाला फेसबुक ने मोठी साथ दिल्याने मोठं उत्पन्न मिळालं आहे.

मुलगा सचिन काकडे सांगतात, की एकीकडं कोरोनाने कहर केला असतांना, दुसरीकडं मोसंबीची बाग चांगलीच बहरली होती. मात्र, लॉकडाऊन असल्यानं बाजारपेठा बंद झाल्या. परंतु बंद झालेल्या बाजारपेठा मूळ आम्हाला काहीच नुकसान झालं नाही..कारण माझे मोठे बंधू नितीन काकडे हे पिंपरी चिंचवड येथे कर्तव्य बजावत असतांना, शेतातील फळबागेसाठी फेसबुकच्या माध्यमातून मोठी मेहनत घेत होते. त्याने बाग लहान असल्यापासून ते आतापर्यंत प्रत्येक गोष्ट फेसबुकवर टाकली आहे.

याचाच फायदा आम्ही मोसंबी विकण्यासाठी घेतला..फेसबुकच्या माध्यमातून आमचे बंधू बागेतील, मोसंबीचे फोटो टाकत होते. याला ग्राहकांनी खूप मोठा प्रतिसाद दिला. फेसबुकच्या माध्यमातून दररोज 5 /6 क्विंटलच्या ऑर्डर आमच्याकडे येत होत्या. याच माध्यमातून तब्बल 11 टन मोसंबी विकली असून मोठं उत्पन्न आम्हाला मिळालं आहे. जर प्रत्येक शेतकऱ्यांनी असं काही केलं तर शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही.

एकंदरीत पाहिलं तर फेसबुक सारख्या सोशल मीडियाचा वापर, प्रत्येक जण एक ना अनेक कामांसाठी करत आहे. याचं सोशल मिडियाच्या गैरवापरामुळे अनेक लोक जेलची हवा खात आहेत.. अनेकांची कुटूंब या सोशल मीडियाने बसवले आहेत. तर अनेकांची उद्ध्व देखील केली आहेत. अनेक कुटुंबात याच सोशल मीडियाने माणूस दुरावला आहे. अशा एक ना अनेक घटना या सोशल मिडियामुळं झालेल्या आपण पहिल्या होत्या. मात्र, जरूड येथील या काकडे कुटुंबीयांनी, याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून, दुरावलेला माणूस जोडत, 11 टन मोसंबी विकलीय. दरम्यान शेतकरी आत्महत्या होणाऱ्या बीड जिल्ह्यात, त्यांनी एक नवा आदर्श शेतकऱ्यांसमोर उभा केलाय.

Updated : 17 May 2020 12:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top