Home > मॅक्स रिपोर्ट > ‘...तर अजित पवार म्हणून नाव नाही सांगणार’

‘...तर अजित पवार म्हणून नाव नाही सांगणार’

‘...तर अजित पवार म्हणून नाव नाही सांगणार’
X

अजित पवार म्हणून नाव नाही सांगणार असं म्हणत आज अजित पवार यांनी सभागृहात आज सत्ताधाऱ्यांना चॅलेंज केलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत असतानाच दादांनी सत्ताधाऱ्यांना चिमटेही काढले. सत्ताधारी पक्षाकडे कोणी नव्हते म्हणून इतर पक्षातून माणसे आणली... मनसेकडून आणली... राष्ट्रवादीकडून आणली... काँग्रेसकडून आणली... आणि स्वतःचे लोक राहिले मागे ... आमचीच लोकं घेवून सत्ताधाऱ्यांची पोटं मोठी झाली आहेत असा उपरोधिक टोला लगावतानाच जे गेले ते कुणाचे नाहीत. ते उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे लोक आहेत. आमची सत्ता आली की हेच लोक परत आले नाहीतर अजित पवार म्हणून नाव नाही सांगणार असा इशाराही अजितदादांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

राज्यात पीकविमा योजनेचे तीनतेरा वाजले आहे. बीडमध्ये अनेक शेतकऱ्यांना १ रुपया पिकविमा दिला गेला आहे. अरे या सरकारने जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायला हवी होती शेतकऱ्यांची थट्टा करताना... ज्यांनी तुम्हाला निवडून दिले त्यांचीच तुम्ही फसवणूक करत आहात अशा शब्दात विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारविषयी संतप्त भावना आज सभागृहात व्यक्त केल्या.

मागील वर्षी जून महिन्यात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. यावेळी मोठा गाजावाजा करण्यात आला परंतु आतापर्यंत किती शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा झाला? याचे आत्मचिंतन सत्ताधाऱ्यांनी करणे गरजेचे आहे. आम्ही गावोगावी फिरलो शेतकऱ्यांना विचारले की, कर्जमाफी मिळाली की नाही. एकही शेतकरी उत्तर द्यायला तयार नाही. सांगताना मात्र सरकारने ऐतिहासिक, ३४ हजार कोटीची कर्जमाफीची घोषणा अशी जाहिरातबाजी केली.

सरकारने कर्जमाफीचा अर्ज घेण्यासाठी ऑनलाईन पद्धत काढली ती यंत्रणा काही नीट नव्हती. बँकांमध्ये आणि सरकारच्या कारभारात ताळमेळ नव्हता. एकाही शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळाला नाही. सरकारने दीड लाखाची तरी कर्जमाफी केली पाहिजे. मुख्यमंत्री सांगताना असे सांगतात की, आता सर्व नीट होईल मुळात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहे असा आरोपही दादांनी केला.

एका सोसायटीचा सचिव शेतकरी महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत आहे. हे महाराष्ट्रात कधी घडले नव्हते. त्याच्या घरी आयाबहिणी नाहीत का ? सरकार का अशा लोकांवर कारवाई करत नाही. हा मुद्दा समोर आला पण असे अनेक प्रकार असू शकतात. सरकारने कायदा करावा अशा लोकांना फाशीची शिक्षा देण्याचा कायदा करा अशा संतप्त भावना दादांनी व्यक्त केल्या.

डिसेंबर महिन्यात बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना, तुडतुडयांमुळे धानग्रस्त शेतकऱ्यांना भाऊसाहेब फु़ंडकरांनी मदतीची घोषणा केली होती. ती मदत अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नाही. हे या सरकारचे अपयश आहे. हे सरकार शेतकरी विरोधी हे यातून स्पष्ट होत असल्याचा आरोपही अजितदादांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीडपट हमीभावाची घोषणा केली होती. निवडणुकीच्या काळातही अशीच घोषणा करण्यात आली होती. म्हणून लोकांनी कमळाचे बटन दाबले. हे सरकार जुमला दाखवण्यात माहीर आहे. शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून रोखण्यासाठी सरकारने पाऊले उचलायला हवी. सरकार आपल्या पाठीशी उभे आहे ही भावना शेतकऱ्यांच्या मनात तयार करण्यासाठी सरकार अपयशी ठरले आहे असा थेट आरोप अजितदादांनी यावेळी केला.

केळी उत्पादक शेतकरी आज हैराण झाला आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने जसा दिलासा दिला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जसा दिलासा दिला त्याचप्रमाणे इतर पीक उत्पादक शेतकऱ्यांनाही सरकारने दिलासा द्यावा अशी मागणी अजितदादांनी केली.

बँकेच्या रांगेत एका वृद्ध शेतकऱ्याचा गर्दीत गुदमरून मृत्यू झाला. सरकारने महिलांसाठी वृद्धांसाठी काही कायदा करायला हवा. उपाययोजना करणे सरकारला जमत नाही. सरकारमधील लोकांना फक्त राजकारण जमतं. मागच्या दाराने सहकार क्षेत्रात स्वतःची माणसं पाठवण्याचा रडीचा डाव सरकारमधील लोक करत आहे. हिम्मत असेल तर निवडणुकांच्या माध्यमातून या असे थेट आव्हानच अजितदादांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी बाकावर असताना कापसाला ७ हजार प्रति क्विंटल भाव द्यावा अशी मागणी करत होते आणि आता त्यांचे सरकार आहे. का देत नाही ७ हजार प्रति क्विंटल भाव असा सवालही अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना केला.

धनगर समाजाला बारामतीत नेवून फक्त ऊसाचा रस पाजला आरक्षण काही दिले नाही. हे फक्त जुमले दाखवतात हे लोकांना कळले आहे अशी टिकाही अजितदादांनी केली.

Updated : 10 July 2018 3:34 PM GMT
Next Story
Share it
Top