Home > मॅक्स रिपोर्ट > टी.व्ही. 'प्राईम टाईम' रिपोर्ट

टी.व्ही. 'प्राईम टाईम' रिपोर्ट

झी २४ तास (रोखठोक)

झी २४ तासच्या रोखठोक या कार्यक्रमात मंगळवारी चंद्रकांत पाटील यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी सरकार पाडायची काँग्रेस, राष्ट्रवादीची नाही ताकद असं त्यांनी म्हंटलंय. राज्य सरकार विरोधात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने अविश्वास ठराव आणला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, तसंच दोन्ही काँग्रेसच्या या खेळीला शिवसेना साथ देणार नाही असा विश्वास सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय. सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे एकूण राज्यातील विधानसभेत ८१ च्या आसपास सदस्य आहेत. त्यामुळे त्यांनी अविश्वास ठराव आणला तरी तो फेटाळला जाईल. या खेळीत शिवसेना त्यांना साथ देणार नाही. शिवसेना सरकारमध्ये आहे. ते सरकार सोडणार नाही, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. अविश्वास ठराव फेटाळला जाणार यामुळे फडणवीस सरकार हे आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

टीव्ही नाईन मराठी

टीव्ही नाईन मराठीच्या बोल महाराष्ट्र या टॉक शोमध्ये मंगळवारी 'घोटाळ्याचे EVM?' या विषयावर चर्चा झाली. असोसिएट एडिटर निखिला म्हात्रे यांनी या टॉक शोचं सूत्रसंचलन केलं. भाजप प्रवक्ते निरंजन शेट्टी, काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, शिवसेना उमेदवार संजय कदम, माजी नगरसेविका अँड. रूपाली पाटील आणि अपक्ष उमेदवार गणेश अवस्थी या चर्चेत सहभागी झाले होते. यावेळी EVM मध्ये घोटाळा करून सत्ताधारी भाजपनं निवडणुका जिंकल्याचा आरोप यावेळी शिवसेना, मनसे, काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांनी केला. तर विरोधक त्यांच्या पराभवाचं खापर EVM मशिनवर फोडत असल्याचा टोला भाजप प्रवक्ते निरंजन शेट्टींना लगावला. तर चर्चेत सहभागी झालेले सामाजिक कार्यकर्ते रवी घाटे यांनी राजकीय पक्षांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचा दावा केलाय.

साम टीव्ही ( आवाज महाराष्ट्राचा )

सध्या मुंबईत काय होणार आणि राज्यातल्या सरकारचं काय होणार, या संदर्भात जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपला एवढ्या जागा कशा मिळाल्या, याचंही आश्चर्य अनेकांना वाटतंय. याच विषयावर साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्राचा या शोमध्ये चर्चा होती. यात मॅक्स महाराष्ट्रचे प्रमुख रवींद्र आंबेकर म्हणाले, पेपर फुटला, पण तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सोडवता आला नाही. मुद्दे माहीत होते. पण, निवडणुकीच्या रिंगणात ते घेऊन जाता आले नाहीत. तर दैनिक सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार म्हणाले, राजकारण हे आता परसेप्शन झालंय. त्यामुळं विश्लेषणही जुन्या पठडीत करुन चालणार नाही. अंदाज व्यक्त करताना, ज्येष्ठ पत्रकार धर्मेंद्र पवारांनी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना युतीची, राज्यासह मुंबईत, शक्यता बोलून दाखवली. मात्र, भाजप-शिवसेना एकत्र येणे हेच घडेल, असे नामवंतांचे मत होते. ज्येष्ठ पत्रकार योगेश पवारांच्या मते मात्र भाजप मुंबईत मुद्दाम विरोधात जाईल. त्यातून विरोधक म्हणून आपला आवाज बुलंद करेल. सेना इतरांच्या मदतीने महापालिका ताब्यात घेईल. दरम्यान राज्यातल्या सरकारला धोका नाही, असे सर्वांचेच मत होते.

महाराष्ट्र वन (आजचा सवाल)

ईव्हीएम मशीनमध्ये घोळ असल्याच्या विरोधकांच्या आरोपात तथ्य आहे का? ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, भाजप प्रवक्ते अवधूत वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, परिवर्तन एनजीओचे प्रमुख तन्मय कानिटकर, कम्युनिस्ट नेते डी. एल. कराड तसंच फोरम फॉर VETA चे संयोजक व्ही. व्ही राव या चर्चेत सहभागी झाले होते. यावेळी इव्हीएम मशीनवर अनेक देशात बंदी आहे. त्या Manipulate करता येतात. त्याचे डेमो उपलब्ध आहेत. असे मुद्दे वेगवेगळ्या पॅनेलिस्टने मांडले. तसंच ईव्हीएमच्या सुरक्षेसंदर्भात काळजी घेतलेली जात नाही. जॅमर लावले जात नाहीत, कॅमेरे लावलेले नाहीत. असेही सुद्धा मुद्दे उपस्थित करण्यात आले. त्यावर भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी उत्तरं दिली. ईव्हीएम मशिन जर भाजपला हॅक करता आलं असंत तर मुंबईत भाजपची सत्ता आली असती, बीड आणि काही ठिकाणी जिथे राष्ट्रवादी आलीय तिथे भाजप आली असती असा दावा वाघ यांनी केला. शिवाय केंद्र सरकार 2019 च्या निवडणुकीत लोकांना मतदानानंतर पावती मिळण्याची व्यवस्था करतंय असंही वाघ यांनी सांगितलं. विरोधक पराभवातून असे आरोप करतायत असा आरोप वाघ यांनी केला. त्यावर विरोधकांनी भाजपनं केलेला पैशांचा वापर आणि मुख्यमंत्र्यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर केल्याचा आरोप केला. ‘नाशिक दत्तक घेतोय...’ ‘ आकडा तुम्ही टाका’ या मुख्यमंत्र्यांच्या प्रचारादरम्यानच्या वक्तव्यांचा उल्लेख यावेळी करण्यात आला

Updated : 28 Feb 2017 6:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top