Home > मॅक्स रिपोर्ट > साताऱ्यातील शहीद जवान सुभाष कराडे अनंतात विलीन

साताऱ्यातील शहीद जवान सुभाष कराडे अनंतात विलीन

साताऱ्यातील शहीद जवान सुभाष कराडे अनंतात विलीन
X

अरूणाचल प्रदेशात देशसेवा बजावत असताना शहीद झालेले साताऱ्यातील कराडवाडी येथील जवान सुभाष लाला कराडे यांच्या पार्थिवावर सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. भारत माता की जय, सुभाष कराडे अमर रहे, अशा घोषणांच्या नादात आणि अत्यंत शोकाकुल व भावपूर्ण वातावरणात तसेच पुर्ण शासकीय इतमामात जवान कराडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या जन्मगावी कराडवाडीच्या सांजेच्या माऴावर हजारोंचा जन समुदाय उपस्थित होता. प्रशासनाच्या वतीने विविध अधिकारी आणि लोकप्रतिनिधिंनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली.

शहीद कराडे हे अरुणाचल येथे तैनात होते. शुक्रवारी रात्री जेवण झाल्यावर सर्व जवान तंबूत बसले असताना थंडीपासून ऊब देणाऱ्या बुखारीचा अचानक स्फोट झाला. यामुळे कराडे आणि इतर जवान बसलेल्या तंबूला आग लागली. या घटनेत कराडे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

भारतीय सैन्य दलामध्ये जवान सुभाष कराडे हे इंजिनियरीगं युनिट १२० बिग्रेड ४६ मध्ये हवालदार या पदावर अरुणाचल प्रदेश येथे देशसेवा करत होते. जवान सुभाष कराडे शहीद झाल्याची बातमी कळताच गावात शोककळा पसरली आहे.

कराडवाडी येथील जवान सुभाष कराडे हे २००१ मध्ये भारतीय सैन्यदलात सहभागी झाले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, कराडवाडी आणि अंदोरी या ठिकाणी झाले. जवान सुभाष कराडे मागील १६ वर्षांपासून भारतीय सैन्यदलात कार्यरत होते. सन २०१६ मध्ये त्यांची भारतीय सैन्य दलातील सेवा संपली होती. मात्र त्यांनी आणखी दोन वर्षे देशसेवा करण्याचा निर्णय घेतला होता. शहीद जवान सुभाष कराडे यांच्या पार्थिवावर आज दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Updated : 6 Nov 2017 5:30 AM GMT
Next Story
Share it
Top