Home > मॅक्स रिपोर्ट > सप्टेंबर 2018 मध्ये लोकसभा-विधानसभांच्या निवडणुका एकत्र ?

सप्टेंबर 2018 मध्ये लोकसभा-विधानसभांच्या निवडणुका एकत्र ?

सप्टेंबर 2018 मध्ये लोकसभा-विधानसभांच्या निवडणुका एकत्र ?
X

सप्टेंबर 2018 पर्यंत देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकत्र घेण्याची तयारी निवडणूक आयोगानं दाखवली आहे. निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी बुधवारी भोपाळमध्ये ही घोषणा केली.

देशात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी भाजपा प्रयत्नशील असली तरी सर्वच राजकीय पक्ष या प्रस्तावाशी सहमत नाहीत. भाजपच्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की लोकसभेच्या आणि विधानसभांच्या निवडणुका एकत्र घ्यायच्या असतील तर त्यासाठी आयोग पूर्णपणे तयार आहे. रावत म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी इव्हीएम आणि व्हीव्हीपीटी यंत्रे मोठ्या प्रमाणावर लागतील, असे आम्ही सरकारला कळवले होते. त्यानुसार आम्हाला अनुक्रमे 3400 कोटी आणि 12 हजार कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

आम्ही सरकारच्या अखत्यारीतील दोन कंपन्यांना ही यंत्रे पुरवण्याची ऑर्डर दिली असून ही यंत्रे मिळण्यास सुरूवातही झाली आहे. सप्टेंबर 2018 पर्यंत आम्हाला सर्व यंत्रे मिळतील आणि त्यानंतर निवडणूक आयोग लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकत्र घेऊ शकेल.

या निवडणूका एकत्र घेण्यासाठी एकूण 40 लाख इव्हीएम आणि व्हीव्हीपीटी यंत्रे लागतील. आम्ही सप्टेंबर 2018 पर्यंत या निवडणूका एकत्र घेण्यासाठी सज्ज होऊ पण याबाबतचा निर्णय सरकारने घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे आवश्यक कायदेशीर सुधारणा करावयाच्या आहेत, असेही ते म्हणाले.

पुढील वर्षात गुजरात (22 जानेवारी), हिमाचल प्रदेश (7 जानेवारी), कर्नाटक (28 मे), मेघालय (6 मार्च), मिझोराम (15 डिसेंबर), नागालँड (13 मार्च) आणि त्रिपूरा (14 मार्च) या सात राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापैकी मिझोराम वगळता इतर राज्यांच्या निवडणूका सप्टेंबरपर्यंत पूर्ण होतील.

Updated : 5 Oct 2017 9:07 AM GMT
Next Story
Share it
Top