Home > मॅक्स रिपोर्ट > व्हायरल आजीबाई !

व्हायरल आजीबाई !

व्हायरल आजीबाई !
X

आयपीएलची फायनल मॅच अनेक कारणांनी चर्चेत राहिली. मुंबईनं पुण्यावर एक रनने विजय मिळवला आणि सोशल मीडियावर मुंबई-पुणेकरांनी एकमेकांना 'टोमणे' मारायला सुरुवात केली. या सर्वांमध्ये जास्त भाव खाल्ला तो एका आजीबाईंनी.

मुंबई-पुणे फायनल सुरु असतांना टीव्हीच्या स्क्रीनवर या आजीबाई देवाचा धावा करताना दिसल्या. आणि निकाल लागल्यावर आजीबाईंमुळेच मुंबईची टीम आयपीएल जिंकली असं सर्व सोशल समाजाने गृहीत धरलं. त्यामुळे अर्थात त्यानंतर सोशल मीडियावर जो काही जोक्सचा सपाटा सुरु झाला त्यात आजीबाई नसत्या तरच नवलच झालं असतं.

सोशल समाजात अत्यंत प्रसिद्ध असलेलं 'एआयबी' तर आयपीएलच्या पलीकडे गेलं. याआधी आजीबाईंनी देवाचा धावा करून काय काय चमत्कार केले आहेत याचे फोटोच त्यांनी प्रसिद्ध केले. म्हणजे अगदी माहिष्मती साम्राज्यात राजमाता शिवगामी देवी जेव्हा महेंद्र बहुबलीला राजा घोषित करत होत्या तेव्हा तिथं या आजीबाई होत्या. नासाच्या अपोलो मिशनच्या वेळीही आजीबाई तिथं उपस्थित होत्या. बरं, त्याच्या पलीकडे ओसामाला ठार करण्याच्या अमेरिकेच्या सिच्युएशन रूममध्येही ओबामांच्या सोबत आजीबाई होत्या, आणि त्यांच्या प्रार्थनेमुळेच सर्व गोष्टी सुरळीत पार पडल्यात. आत्ता बोला.

आजीबाई गेले ३-४ दिवस सोशल मीडियावर चांगल्याच झळकत आहेत. त्या मुंबई इंडियन्सच्या मालकीणबाई नीता अंबानी यांच्या नातेवाईक असल्याचंही समजतंय. पण बाकी काही असो, जिंकल्यावर मुंबईची जेवढी हवा व्हायची होती त्यापेक्षा जास्त हवा आजीबाईंनी करून घेतली.

Updated : 24 May 2017 6:55 AM GMT
Next Story
Share it
Top