Home > मॅक्स रिपोर्ट > मोदींचं गारुड लवकरच उतरेल - कुमार केतकर 

मोदींचं गारुड लवकरच उतरेल - कुमार केतकर 

मोदींचं गारुड लवकरच उतरेल - कुमार केतकर 
X

मेधाताई पाटकरांनी ऑनलाईन केलेल्या काहीश्या परखड पण भावपूर्ण संवादाने नांदेड येथील ५ व्या डॉ. आंबेडकर विचार संमेलनाचे उद्घाटन झाले. मरणोत्तर अवयवदानाने उभ्या महाराष्ट्राला आदर्श देऊन अकाली निघून गेलेले सुधीर रावळकरांच्या पत्नीच्या साक्षीने संविधान सरनाम्याच्या सामूहिक वाचनाने संमेलनाचा आरंभ झाला. अश्या अभूतपूर्व प्रयोगशीलतेने आणि प्रचंड उर्जेने पार पडलेल्या या नांदेड संमेलनाचे आयोजन प्रगतीशील लेखक संघ, मौर्य प्रतिष्ठान आणि उद्याचा मराठवाडा यांच्या संयुक्त विध्यमाने नांदेड येथे रविवार दि. २५ जुन २०१७ रोजी केल्या गेले होते. "सामाजिक न्याय" ह्या विषयसूत्रावर आधारित या विचार संमेलनात ‘सामाजिक न्याय‘ या विषयाचे विविध पैलू घेऊन आमंत्रित मान्यवरांनी केलेली मांडणी ही उपस्थित श्रोतुवर्गासाठी दीर्घकाळ स्मरणात राहील अशी समकालीन वास्तव दर्शी वैचारिक शिदोरी देणारी ठरली.

या संमेलनाला ज्येष्ठ पत्रकार विचारवंत पद्मश्री कुमार केतकर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मा. मेधाताई पाटकर, प्रसिद्ध दलित साहित्य अभ्यासक कवयित्री लेखिका मा. डॉ. प्रज्ञा दया पवार, साम टीव्हीचे संपादक संजय आवटे, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भालचंद्र कांगो, तसेच दिल्ली येथील प्रसिद्ध दलित साहित्य अभ्यासक आणि दलित आंदोलनाचे अभ्यासक डॉ. बजरंग बिहारी तिवारी आणि ठाणे येथील साहित्य संम्मेलनाचे अध्यक्ष आणि संपादक, जेष्ठ पत्रकार मा. उत्तम कांबळे या मान्यवरांची उपस्थिती लाभल्यामुळे उत्तुंग वैचारिक उंची प्राप्त झाली.

अपरिहार्य कारणामुळे येऊ न शकल्यामुळे मेधाताई पाटकर यांनी छोट्याश्या व्हिडीयो क्लीपच्या माध्यमातून पाठविलेल्या उद्घाटनपर भाषणात एका महापुरुषाला दुसऱ्या महापुरुषाविरोधात उभं करून राजकारण खेळल्या जात असल्याची खंत व्यक्त केली. त्यानंतर प्रसिद्ध दलित साहित्य अभ्यासक आणि दलित आंदोलनाचे अभ्यासक डॉ. बजरंग बिहारी तिवारी यांच्या सामाजिक न्याय' या संकल्पनेच्या ऐतिहासिक तथ्यांची तात्विक मांडणी असलेल्या बीजभाषणाने संमेलनाची सुरुवात झाली. नांदेडच्या महापौर शैलजा स्वामी यांच्या उपस्थितित पार पडलेल्या पहिल्या सत्रात डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मोजक्या शब्दात पण परिणामकारकपणे अश्या संमेलनाच्या आवश्यकते बद्दलची अपरिहार्यता विषद केली. तर संमेलनाचे मुख्य समन्वयक श्री नयन बारहाते यांनी ते घडवून आणण्यामागची भूमिका स्पष्ट करतांना सांगितले की, समाजाला संविधान साक्षर करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला संवैधानिक नैतिकतेचा दृष्टीकोन प्रस्थापित करणे आणि सर्व समविचारी पुरोगामी तत्वांचा समन्वय घडवून आणणे या उद्दिष्ट पूर्तीसाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रज्ञा दया पवार ‘महिला, मुले, अल्पसंख्यांक आणि सामाजिक न्याय’ या विषयावरील आपल्या भाषणात सरकारवर घणाघाती प्रहार करीत म्हणाल्या की, सामाजिक न्यायाचे विरोधकच सत्तेत बसले असून धर्मनिरपेक्षता, समाजवादाच्या केवळ पोकळ वल्गना केल्या जात असून आजच्या घडीला न्याय आणि समता हरवत चालली असल्याचे प्रतिपादन केले.

ज्येष्ठ माध्यमतज्ञ संजय आवटे ‘सामाजिक न्याय आणि माध्यमांची भूमिका’ या विषयाची मांडणी करतांना म्हणाले की एकीकडे मनोरंजनाची माध्यमे अधिक वस्तुनिष्ठतेने व्यक्त होतांना दिसत आहेत. तर पत्रकारितेची माध्यमे मात्र सध्या जनतेला भूल देण्याचे काम करीत असून सरकारच्या अधीन झाल्याचे जाणवत आहेत. परदेशात जाऊन बाबासाहेबांच्या नावाचे उद्घोष करायचा तर स्वदेशात त्यांच्या विचारांच्या विरुद्ध विचारांना पेरायचे काम सध्या जोरदार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. भारत आणि पाकीस्तान एकाच इतिहासाचे साक्षीदार असून बाबासाहेबांच्या विचारांमुळे आणि नेहरूंच्या धोरणांमुळे भारत देश पुढे जात आहे. दुसरीकडे पाकीस्तान अश्या व्यक्तीमत्वांच्या वैचारिक वारश्यच्या कमतरतेमुळे रसातळाला जात आहे, असे मत प्रसिद्ध पाकिस्तानी लेखिका आयेशा सिद्धीकीच्या पुस्तकातील मजकुराचा आधारे त्यांनी व्यक्त केले. सोशल मीडियावर जास्तीत जास्त सामान्य जनता व्यक्त होत असतांना दुसरीकडे कलबुर्गी, पानसरे सारख्या स्वतंत्र पुरोगामी आवाजांचा गळा दाबला जात आहे.

पद्मश्री कुमार केतकर यांच्या झंझावाती भाषणात त्यांनी मोदींवर आणि त्यांच्या सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. येत्या २०१९ च्या निवडणुकांमध्ये मोदी परत पंतप्रधान होणे अशक्य असल्याचे मत मांडले. गायीसाठी माणसांना मारणारे हे सरकार असून ह्यांच्या डिजिटल इंडिया, कॅशलेस, लेसकॅश इंडियासारख्या निर्णयामुळे हाहाकार माजलेला आहे. लोकशाहीप्रणीत मार्गावर हे सरकार चालत नसून केवळ मोदी, अमित शाह, अजित डोवाल आणि अरुण जेटली ही चारच लोक हे सरकार चालवीत असल्याचे घणाघाती प्रहार त्यांनी केले.

सरकार विरोधी भूमिकेला देशद्रोह समजला जात असून भाजपाला केवळ ३१ टक्के मत मिळालेली आहेत. बाकी ६९% जनता भाजपाविरोधी असल्याची ते निक्षून बोलले. देशाचा इतिहासच नेस्तनाबूत करण्याचे या सरकारचे कटकारस्थान असून २०१९ मध्ये त्यांच्या अपेक्षांचा भंग होणार अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली. मोदी आणि ट्रम्प भेट इतर कुठल्या धोरणासंबंधी नसून अमेरिकेच्या आयटी कॉर्पोरेट्स संबंधित कडक धोरणांना शिथिल करण्यासाठी आणि भारतीयांना आयटी क्षेत्रातून हद्दपार न होऊ देण्यासाठी मोदी भीक मागायला गेलेत अश्या रोखठोक शब्दात केतकर बरसले.

डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी आणि भालचंद्र कोंगो यांच्या प्रमुख उपस्थितीत अध्यक्षीय समारोप करतांना ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे म्हणाले की, बाबासाहेबांना एका जातीत बंद करणे योग्य नाही कारण ते संपूर्ण देशाचे आणि जगाचे नेते आहेत. बाबासाहेबांनी आपल्या देशाची घटना सामान्य माणसाला अर्पण केली असुन या संविधानाचा मुख्य आधार सामाजिक न्याय हाच आहे. शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात आणली. मात्र, आताच्या राज्यकर्त्यांमध्ये सामाजिक न्याय देण्याची मानसिकताच नसल्याचा रोष त्यांनी व्यक्त केला. सुंदर जगण्याचा अधिकार म्हणजेच सामाजिक न्याय होय असे ही ते म्हणाले.

नांदेड तसेच पूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या प्रगल्भ प्रेक्षकांच्या दिवसभर लाभलेल्या उस्फुर्त प्रतिसादामुळे संमेलन अविस्मरणीय झाले. नयन बाराहाते, राम शेवडीकर, डॉ. यशपाल भिंगे, संजीव कुलकर्णी, डॉ. पी. विठ्ठल आणि इतरांच्या अथक परिश्रमातून हे संमेलन यशस्वी रित्या पार पडले.

Updated : 30 Jun 2017 12:56 PM GMT
Next Story
Share it
Top