Home > मॅक्स रिपोर्ट > मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरून 33 कोटी देव गायब...

मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरून 33 कोटी देव गायब...

मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरून 33 कोटी देव गायब...
X

राज्यातील भाजपा शिवनसेनेचे (?) युती सरकारच्या मुख्यमंत्र्यांचे दैवी पाठबळ आता नाहिसे झालेय. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकिय निवासस्थानातून 33 कोटी देव गायब झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या मागे असलेले दैवी पाठबळ आपसूकच गायब झाले असून यात कुणाचा हात आहे, याचा बहुधा शोध घेतला जाण्याची शक्यताही गृहखात्याने नाकारली आहे. पण असे झाले तरी काय की या देवांनी थेट वर्षावरून पोबारा करावा, की त्यांना पळवून लावण्यात आले याचा राज्यातील सर्वसामान्य शेतकरी विचार करू लागला आहे.

होय़, गोष्ट खऱी आहे, राज्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थीतीशी एकरूपता साधता यावी, त्यांच्या आसवांची जाणिव व्हावी, तसेच 33 कोटी देवांचीही साथ लाभावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी अतिशय थाटात वर्षावर गोमातेची स्थापना केली होती. त्यासाठी त्यांनी निलंग्याहून गाय आणि वासरूच वर्षाच्या प्रांगणात आणून बांधले होते. गेले वर्षभर ही गाय निसंदिग्धपणे या वर्षाच्या परिसरात फिरताना दिसत होती. गाय़ीच्या गोष्टी, गायीचे दुध, वासराचे गायीला लुचणे, वासराचे पाडसासारखे हुंदडणे केवढा आनंद.... वर बोनस म्हणून तेहतीस कोटी देवांचे वर्षावर वास्तव्य. राज्यातील शेतकऱ्यांच्या गायी चारा छावण्यांमध्ये धडपडत होत्या. दावणीमध्ये वाळलेला चारा, कडबा आणि गवत खाऊन जगत होत्या. मात्र, वर्षावरील गायीला पोटभर हिरवा चारा मिळत असल्याने गायही किती खूशीत होती. त्यामुळे आपसूकच 33 कोटी देवही सुखावून राज्याला आणि सरकारला किती आशिर्वाद देत होते. अमृतावहिनी आणि मुख्यमंत्र्यांची सुकन्याही केवढी खुष होती. मग माशी कुठे शिंकली. अतिशय गुण्यागोविंदाने मुख्यमंत्र्यांच्या अंगणात नांदणारी ही गाय आता त्यांच्या अंगणात दिसत नाही. बरं, त्याबद्दल कुणाला विचारावे तर मामला सेन्सिटीव्ह असल्याचे सांगून कुणी काही सांगायला तयार नाही. अखेर आम्ही राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडेही चौकशी केली तर त्यांनीही कानावर हात ठेवले पण गाय तिथे नाही याला मात्र दुजोरा दिला. अरेच्चा... तेहतीस कोटी देवांसह वर्षावर राहणारी गाय, देवांसह नाहीशी झाली असताना याची वाच्यता का कुठे नाही? राज्यातील शेतकरी आपले पशुधन सांभाळताना त्याची दमछाक होते. त्याला कळत नाही यांचं काय करायचे, केवळ अंगणात गाय असावी म्हणून तो गायी म्हैशी पाळत नाही तर त्यांच्यावर त्याची गुजराण होत असते. त्यांच्यावर पुत्रवत प्रेम करतो शेतकरी. एखादा दिवस गाय गोठयात हंबरली नाही तर शेतकऱ्याच्या घश्याखाली घास जात नाही. पण अवकाळीने हवालदिल झालेला शेतकरी आपली जनावरे चारा छावणीत बांधतो ते नाईलाज म्हणून. ती जगावीत म्हणून, हौस म्हणून नाही. अखेर शेतकऱ्यांच्या गायी आटल्या की त्यांना कसायाला दिले जाते. इच्छा असूनही भाकड गायी सांभाळण्याची शेतकऱ्याची ऐपत आणि ताकदही नसते.... मग वर्षावर काय झालं असेल, ती गाय भाकड झाली असेल का? कुठे गेली असेल ती गाय?

  • सुरेश ठमके

Updated : 25 April 2017 3:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top