Home > मॅक्स रिपोर्ट > 'महाराष्ट्र बंद' आंदोलन मागे

'महाराष्ट्र बंद' आंदोलन मागे

महाराष्ट्र बंद आंदोलन मागे
X

महाराष्ट्र बंद आंदोलन संध्याकाळी पाचच्या दरम्यान मागे घेण्यात आले. भारीपचे प्रकाश आंबेडकर यांनी संपात सहभागी झालेल्या जनतेचे आभार मानले. राज्यभरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. दिवसभर राज्यातल्या अनेक भागात तणाव होता. औरंगाबाद, नाशिक, जळगाव, अकोला, नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी बंदला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी एसटीबसवर दगडफेक तर रस्त्यावर जाळपोळ केली.

सकाळपासून बंदची सुरुवात झाली. काही तुरळक गाड्या रस्त्यावरुन धावत होत्या. शहरांमधल्या बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या.

औरंगाबाद, जळगाव, नाशिक आणि नांदेड आदी ठिकाणी आंदोलन हिंसक झालं. एसटीच्या काचा फोडण्यात आल्या, तुफान दगडफेक करण्यात आली. काही खासगी गाड्याही आंदोलकांच्या रागाच्या शिकार बनल्या. नांदेडमध्ये अनेक ठिकाणी जबरदस्तीनं दुकानं बंद करण्यात आली. त्यामुळं शहरात तणाव होता.

कोल्हापूरमध्ये ही बंदसाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांना विरोध करण्याचा प्रकार झाला होता. त्यामुळं तिथला तणाव शिगेला पोचला होता. अनेक बाईक्सची तोडफोड करण्यात आली. पोलीसांनी लागलीच हस्तक्षेप केला त्यामुळं तणाव निवळला.

मुंबई आणि ठाण्यातही बंदला चांगला प्रतिसाद

विक्रोळी, चेंबूर, घाटकोपर रमाबाई आंबेडकरनगर या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी सातच्या सुमार ठाणे स्टेशनवर आंदोलकांनी रेल्वे रोको केलं. सुमारे १० मिनिटं मुंबईला जाणारी गाडी रोकण्यात आली. शिवाय घोडबंदररोडवर ही रास्तारोको करण्यात आला. मुंबईला जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले. त्यामुळं इथं प्रचंड वाहतूक कोंडी अनुभवायला मिळाली. अनेक ठिकाणी गाड्याची तोडफोडही करण्यात आली.

गोवंडीमध्ये रेल रोको करण्यात आला. यामुळं कुर्ला ते वाशी ही वाहतूक बंद झाली होती. चेंबूरमधल्या अमर महल, चेंबूर नाका आदी भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. दुपारी अकराच्या सुमारात लाल डोंगर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान असा मोर्चा काढण्यात आला. दुपारनंतर आंदोलन थोडं जास्त तीव्र झाले. घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर सिग्नलजवळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. तिथून एकही गाडी मुंबईच्या दिशेला जाऊ देणार नाही या पवित्र्यात आंदोलक होते. अखेर पोलीसांनी चारच्या सुमारास आंदोलकांना विनंतीकरुन रस्त्यावरुन बाजूला व्हायला सांगितलं. त्यानंतर काही मिनिटातच आंदोलन संपल्याची घोषणा करण्यात आल्यानं रस्ते रिकामी झाले आणि हळूहळू जनजीवन सुरळीत व्हायला लागलं.

आंदोलनाचा सर्वात जास्त फटका एसटी गाड्यांना बसला. १२ हून अधिक गाड्यांची तोडफोड करण्यात आली. असंख्य खासगी गाड्याही आंदोलकांच्या निशाना बनल्या. काही ठिकाणी दगडफेकीत एक-दोनजण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे.

Updated : 3 Jan 2018 1:26 PM GMT
Next Story
Share it
Top