Home > मॅक्स कल्चर > 'मराठी भाषा दिना'निमित्त वेगवेगळे कार्यक्रम

'मराठी भाषा दिना'निमित्त वेगवेगळे कार्यक्रम

मराठी भाषा दिनानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम
X

सोमवार दि. २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिन म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन, या वर्षी महाराष्ट्र शासनातर्फे गेट वे ऑफ इंडियावरील भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा होणार आहे. या कार्यक्रमात मराठी भाषा विभागाचे सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्याबरोबरच, मराठी भाषा हे मध्यवर्ती सूत्र असलेला सांगीतिक कार्यक्रमही सादर होणार आहे. तसेच विविध साहित्य-प्रकारांसाठीचे ३३ राज्य वाड्.मय पुरस्कारही प्रदान केले जाणार आहेत, अशी माहिती मराठी भाषा विभाग मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने संगणकावरील आणि महाजालावरील मराठी या विषयाला प्राधान्य देणारे विविध उपक्रम कार्यान्वित होत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येकाने महाजालावर (इंटरनेटवर) मराठीचा वापर वाढविण्याचा आणि प्रत्येक संगणकावर युनिकोड-आधारित मराठी कार्यान्वित करण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे. अलीकडच्या काळात, समाजमाध्यमांवर (सोशल मीडियावर) मराठीचा वापर वाढतो आहे. परंतु, या वापराचा वेग आणि व्याप्ती वाढणेही आवश्यक आहे,असं तावडे यांनी म्हंटलं आहे. त्यासाठी एक विशेष चित्रफीत तयार करण्यात आली आहे जी सर्व समाजप्रसारमाध्यमांतून विनामूल्य प्रसारित केली जाणार आहे.

विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा आणि ग्रंथालयांमध्ये विकिपीडियावर लेखन व युनिकोडातून मराठी अशा दोन महत्त्वाच्या उपक्रमांसह व्याख्याने, परिसंवाद, स्पर्धा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल आहेत.

या शिवाय पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर देखील कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेत्या नीलमताई गोऱ्हे उपस्थिती राहणार आहेत.

तर मुंबईमध्ये शामसुंदर सोन्नर, प्रशांत डिंगणकर, सुनील तांबे, सुरेश ठमके यांच्या न्यूजलेस कवितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबई लाईव्ह वर दुपारी १ वाजता हा कार्यक्रम होईल

Updated : 26 Feb 2017 4:03 PM GMT
Next Story
Share it
Top