Home > मॅक्स रिपोर्ट > भारतीय बाजारात सॅमसंगचा फॉल्टी माल

भारतीय बाजारात सॅमसंगचा फॉल्टी माल

भारतीय बाजारात सॅमसंगचा फॉल्टी माल
X

नाव मोठे आणि लक्षण खोटे ही म्हण सॅमसंग या कंपनीला चपखल लागू पडते. नाही म्हणायला याच कंपनीनं दक्षीण कोरीयाच्या राष्ट्राध्यक्षांच्या पदाचा बळी घेतलाय आणि आता भारतात लाखो ग्राहकांच्या डोळ्यांचा.

सॅमसंगनं भारतीय बाजारात त्यांचे फॉल्टी पीस म्हणजेच कुचकामी स्मार्टफोन पाठवल्याचं आता स्पष्ट झालं आहे. जगात चांगला ब्रँड असल्यामुळे अनेक प्रतिष्ठीत मंडळींचा कल हा सॅमसंगचे फोन घेण्याकडे असतो. पण, त्यातल्या अनेकांना आता सॅमसंगच्या गुलाबी रेषेनं बेजार केलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याबाबतच्या तक्रारी वाढल्या आहेत. पण सॅमसंग त्याकडे पद्धतशीरपणे कानाडोळा करत आहे.

विशेष करुन सॅमसंगच्या S6 Edge आणि S7 Edge या मॉडेलच्या डिस्प्लेसंबंधीत अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत. S7 Edge च्या डिस्प्लेच्या मधोमध एक गुलाबी रंगाची रेष येत आहे, त्यामुळे फोनची स्क्रीन दोन भागांमध्ये विभागली जात आहे. शिवाय टचपॅड खराब होत असल्यानं फोन नीट वापरताही येत नाहीय.

गेल्यावर्षी मार्चमध्ये हे फोन भारतीय बाजारात दाखल झाले होते. S6 Edge या फोनची बाजारपेठेतली किंमत साधारण 38,000 तर S7 Edge ची किंमत 50,000 आहे. या दोन्ही फोनच्या डिस्प्लेच्या मधोमध एक गुलाबी रंगाची रेष येत आहे, त्यामुळे फोन वापरतांना अडचण येत असल्याचं ग्राहकांचं म्हणणं आहे. अनेक प्रतिष्ठीतांनी याबाबत सॅमसंगला ट्विट केलं. पण, सॅमसंग प्रशासन मात्र ढिम्मच आहे.

मी जुलै 2016 मध्ये फोन घेतलेला. त्यानंनतर एवढ्या दिवसांत फोन ना कुठे पडला ना त्याला काही डॅमेज झालं. तरी गेल्या दिड महिन्यापासून डिस्प्लेवर पिंक लाईन येत आहे. सॅमसंगच्या हेल्पलाईनला तक्रारी देऊनही काही फायदा होत नाहीय - चैतन्य जोशी, उद्योजक, मुंबई

मॅक्स महाराष्ट्रचे प्रमुख आणि पत्रकार रवींद्र आंबेकर यांनी देखील याबाबत सॅमसंगच्या सीईओना ट्विट केलं. त्यावर आम्ही तुमची तक्रार ऐकून घेण्यास सक्षम नाही असं उत्तर त्यांच्याकडून देण्यात आलं आहे.

https://twitter.com/RavindraAmbekar/status/844170739393708033

https://twitter.com/RavindraAmbekar/status/844410061787160577

विश्वासार्ह ब्रँड म्हणून सॅमसंगचा फोन घेतला. पण फोन घेतल्याच्या काही दिवसातच पिंक लाईनचा त्रास सुरू झाला. यासंबंधीच्या तक्रारीही सॅमसंगच्या हेल्पलाईनवर केल्या असता काहीच प्रतिसाद नाही - संदीप देशपांडे, नेते, मनसे

दक्षीण कोरीयाची कंपनी असलेल्या सॅमसंगने भारतात 2016 मध्ये सर्वात जास्त स्मार्टफोन विकले आहेत. त्यांचा भारतीय स्मार्टफोन बाजारातील वाटा तब्बल 28.50 टक्के आहे. सोशल मीडियावर सध्या ग्राहक सॅमसंगची लक्तरं काढत आहेत. पण कंपनीच्या प्रशासनाला त्याची काही एक पडलेली नाही.

Updated : 22 March 2017 11:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top