Home > मॅक्स रिपोर्ट > सीएमच्या सभांना पारदर्शक गर्दीचा उच्चांक !

सीएमच्या सभांना पारदर्शक गर्दीचा उच्चांक !

सीएमच्या सभांना पारदर्शक गर्दीचा उच्चांक !
X

गेल्या २ दिवसांमध्ये यूट्यूब उघडा, फेसबुक उघडा किंवा आणि कुठली वेबसाईट (पेपर कुणी आजकाल फार वाचत नाही) ...शीएम साहेब येतात आणि सुरू होतात...तुम्ही पुण्यात असाल तर पीएमसी साठी आमची सत्ता किती महत्त्वाची आहे....मुंबईत असाल तर मग सरकारच्या कामांचा भडीमारच सुरू होता... (न केलेल्या कामांचीसुद्धा यादी दिली जाते)....शीएम साहेब अगदी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत आहेत की भाजपला मत द्या...छत्रपतींचा आशिर्वाद खरा ठरवा...

गेल्या दोन दिवसात शीएम साहेबांचे किमान डझनभर वेगवेगळे व्हिडीओ आणि प्लेट ऍड (स्पॉन्सर्ड कंटेंट) पाहायला मिळत आहेत. प्रत्येक ऍडमध्ये वेगळा कंटेट आणि क्रिएटीव्हीटी...दादच दिली पाहिजे...मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी केवढ्या सगळ्या त्या भाषा...( दाक्षिणात्य भाषेत अजून मुंबईत ऍड दिसली नाही नशिब) बिच्चारे शीएम केवढीची धडपड आणि दगदग...

ऐन निवडणुकांच्या काळात एवढं मोठ्ठ ऍड शूट, नंतर मुंबई-पुण्यासह इतर भागात प्रचाराच्या सभा, पक्षाच्या बैठका आणि त्यातून वेळ मिळालाच तर नंबर एकच्या राज्याच्या प्रशासनाचा कारभार (गुंडांना प्रवेश देण्यासाठी राखून ठेवलेला वेळ वेगळाच)...यासगळ्यात पुरते दमून जातात बघा ते...एवढं करत असतांना थोडं तरी मिश कम्युनिकेशन तर होणारच ना....

नेमक व्हायचं तेच झालं पाहा... ज्या पुणे महापालिकेत भाजपती सत्ता येईल असं भाजपचे सगळे नेते ओरडून ओरडून सांगत आहेत (तसा गुप्तचर यंत्रणांचा अहवाल असल्याच हे नेते खासगीत सांगतात) त्याच पुण्यात नेमका घात झालाय... नेमकं काय मिशकम्युनिकेशन झालं माहीत नाही...पण पुण्यात शनिवारी दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्यासभेला १०० माणसं सुद्धा आली नाहीत. शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजे न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानावर ही सभा आयोजित करण्यात आली होती. स्थानिक भाजपानं त्याची जोरदार जाहिरात सुद्धा केली. पेपरमध्ये ऍड दिल्या, होर्डींग्ज लावले, पत्रकारांना आमंत्रण गेली, व्हॉट्स ऍप मेसेजेस फिरले, सोशल मीडियावर सभेची चर्चा झाली. पण, पुणेकरांनी शनिवारची दुपार झोप घेणंच पसंत केलं.

आता ऐन सभेच्या ठिकाणी आल्यावर फज्जा उडाला आहे हे लक्षात येताच शीम साहेबांनी तात्काळ ट्विट केलं. काहीतरी मिस कम्युनिकेशन झाल्याचा दावा केला.

आता अशी फजिती झाल्यानंतर त्यावर जोक्स व्हायरल करणार नाही तो सोशल मीडिया तरी कसला?

अब की बार

कुणाचेही सरकार

इथे दुपारी झोपतो मतदार.

नवीन पुणेरी पाटी ????????????

मुख्यमंत्री म्हणतात – सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या ????????????

मुख्यमंत्र्यांच्या सभेला ‘पारदर्शक’ गर्दी

पुण्यात, तेही सदाशिव पेठेत, दुपारी 1 ते 4 मध्ये सभा? कल्पनाच करवत नाही.

याला म्हणतात ‘हात दाखवून अवलक्षण’. एक तर ते पुणं, त्यात सदाशिव पेठ टिळक रोड आणि वर दुपारी तीन वाजता! ही मुभा तर पेशव्यांनाही नाही!!

मुख्यमंत्र्यांची दुपारी एकची सभा रद्द… कोणीही जमलं नाही सभेला…अरे… 1 ते 4 पुणे बंद असत…मग तिकडे मुख्यमंत्रीही असो….. पुणेेरी बाणा शेवटी तो… याला म्हणतात नियम तो नियम…

तरी बरं मुख्यमंत्री सभाच घ्यायला गेले… चितळेंकडे बाकरवडी घ्यायला गेले नाहीत

नाशिकच्या सभेला झालेली गर्दी?

खरंय एवढा पॉवर पॅक अजेंडा असल्यावर काहीतरी मिश कम्युनिकेशन होणारच...गेल्या महिन्यात पुण्यात मोदींच्या सभेकडे सुद्धा लोकांनी अशीच पाठ पिरवली होती. मीडियानं त्याची फारशी दखल घेणं उचित समजलं नाही ही बाब वेगळी...

तर मुद्दा हा की गृहखातं हातात असतांना आणि प्रशासनावर कडक पकड असतांना रोज सकाळचं ब्रिफींग चुकीचं मिळतंय का?( शनिवारी सकाळी ब्रिफींग मिळलं नव्हतं का?) की कुणीतरी जाणून बुजून तुम्हाला मिसगाईड करतंय? की तुमचे नेते खासगीत सांगत असलेले गुप्तचर यंत्रणांचे अहवाल खोटे आहेत? की गृह खात्यातच कुणी घरभेदी आहे? जरा इथल्या मिस कम्युनिकेशनवर सुद्धा लक्ष द्या की....एवढं मात्र नक्की आहे की या फसलेल्या सभेनं आतापर्यंतच्या सर्व मेहनतीवर पाणी फिरवलं आहे.

ता. क. – पिंपरीतल्या सभेला चांगली गर्दी झाली हे यावरचं उत्तर असू शकत नाही. पुण्यात अजित पवारांच्या सभेला मात्र गर्दी जमते.

Updated : 18 Feb 2017 12:17 PM GMT
Next Story
Share it
Top