Home > मॅक्स ब्लॉग्ज > देईल का कुणी हृदयाचे दान?

देईल का कुणी हृदयाचे दान?

देईल का कुणी हृदयाचे दान?
X

ही स्पर्धा आहे वेळेसोबत...

हे युद्ध आहे जगण्यासाठी...

कहाणी दमलेल्या बापाची...

हुंदका आवरणा-या मातेची...

कहाणी आहे माझी..

मी आराध्या...

मला हृदय हवयं! कोणी करेल का मला मदत? कोणी देईल का मला हृदय? साडेतीन वर्षाच्या आराध्यानं 125 कोटी भारतीयांना घातलेली ही हाक. या चिमुकल्या हृदयाच्या पोरीची एकच मागणी...मला हृदय हवंय..

मी आराध्या मुळे...सामान्य घरातला माझा जन्म...माझे आई-वडील झटतायत, दिवस-रात्र एक करतायत. माझा जगण्यासाठीचा संघर्ष बाबांनी त्यांचा बनवलाय. तर, आईने मला वाचवायचंच हे एकच ध्येय तिच्या उराशी बाळगलयं. पण, बाबा आता दमलेत, आई चेह-यावरून खंबीर दिसते, पण मनातून तुटलीये. कारण, सहा महिन्यांपासून मला हार्ट मिळत नाहीये.

अगदी, गेल्यावर्षीपर्यंत मी खेळायचे, प्ले-ग्रूपमध्ये जायचे. मला खूप मित्र-मैत्रीणी होते. मला, त्यांच्यासोबत मस्ती करायला खूप आवडायचं. पण, एक दिवस अचानक मला उलट्या होवू लागल्या, डॉक्टरांकडे नेलं, आणि डॉक्टरांनी मला एंड-स्टेड हार्ट डिसीज असल्याचं सांगितलं. हार्ट ट्रान्सप्लांट शिवाय मी जगू शकत नाही असं डॉक्टर म्हणाले, आणि आई-बाबांच्या काळजाचा ठोकाच चूकला.

आता, मी काहीच करू शकत नाही. खेळणं नाही, बाहेर जाणं नाही, मित्रांसोबत मस्ती नाही...आराध्या हे नको, ते नको करू...माझ्या वयाच्या मुलांचा शत्रू असलेला हा'नको' शब्द माझा मित्र झालाय. माझं हे वय, चॉकलेट खाण्याचं, पण मी औषधांच्या कडू गोळ्या चॉकलेट मानून खाते.

माझं, हार्ट फक्त 10 टक्के चालतं. त्यामुळे दर 15 दिवसातून दोन दिवस मी फोर्टीस हॉस्पिटलमध्ये दाखल होते. दोन दिवस औषधं घेतलं तर पुढचे 15 दिवस माझं हृदय मला साथ देतं. त्यामुळे फोर्टीस हॉस्पिटल माझं दुसरं घरच आहे.

गेले सहा महिने, आई-बाबांनी दिवस रात्र एक केलीये. डॉक्टरांनी देखील प्रयत्न सुरू ठेवलेत. पण, मला हार्ट मिळत नाही. 3 ते 10 वर्ष वयोगटातल्या ब्रेन-डेड मुला-मुलीचं हृदय मला ट्रान्सप्लांटसाठी चालू शकेल.

गेले, 9 महिने माझा जगण्याचा संघर्ष सुरू आहे, पण, माझे बाब दमलेत. मुंबईचा प्रत्येक काना-कोपरा त्यांनी पालथा घातलाय.

'सेव्ह आराध्या' कँम्पेनमध्ये सहभाही झालेले औरंगाबादच्या एमजीएम कँम्पसमधले विद्यार्थी

@MyMedicalmantra च्या टीमने लोकांपर्यंत माझा मेसेज पोहोचवण्यासाठी, अवयव दानाबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी #savearadhya असा हॅशटॅग ट्विटर आणि फेसबूकवर सुरू केलाय. सोशल मिडीयाच्या माध्यमातून कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचण्याचा @MyMedicalmantraच्या टीमचा प्रयत्न आहे. प्रत्येकजण मला हृदय मिळावं यासाठी आपापल्या पद्धतीनं हातभार लावतोय.

पण, माझी, तुमच्याकडे एकच मागणी आहे, मला हृदय हवंय. माझी सर्वांना एकच विनंती आहे, मी तुमच्या मुला-मुलीचं हृदय तुम्ही माझ्या माध्यमातून जिवंत ठेवू शकता.

Updated : 15 Feb 2017 6:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top