Home > मॅक्स रिपोर्ट > साल्याकडून ७ हजार हुंडा घेतला तरी साल्याच्या नावाने 'रडतात दानवे'

साल्याकडून ७ हजार हुंडा घेतला तरी साल्याच्या नावाने 'रडतात दानवे'

साल्याकडून ७ हजार हुंडा घेतला तरी साल्याच्या नावाने रडतात दानवे
X

रावसाहेब दानवेंनी शेतकऱ्यांबाबत बेताल वक्तव्यानंतर आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे यांनी थेट दानवेंच्या साल्याच गाव गाठलं आणि त्यांची काय स्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून पुढे आलेलं हे धक्कादायक वास्तव

हे आहेत कैलास अहीर. शेतकऱ्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचे सख्खे मेव्हणे, म्हणजेच साले. म्हणजे निर्मलाताई रावसाहेब दानवे यांचे धाकटे बंधू. पण, यांच्याकडे बघून हे रावसाहेब दानवे यांचे साले असावेत असं अजिबात वाटणार नाही. अठरा विश्व दारिद्र्यात दिवस काढलेले कैलास अहिर हे आजही त्यांच्या गावात चौघा भावांची शेती पाहतात. त्यांना जेंव्हा रावसाहेब दानवेंच्या “साले” या वक्तव्याबद्दल विचारलं तेंव्हा त्यांनी याचं लंगडं समर्थन केलं खरं, पण दाजींनी हे टाळायला पाहिजे होतं असं सुद्धा कबूल केलंय.

कैलास अहीर, रावसाहेब दानवे यांचे सख्खे धाकटे साले

रावसाहेब दानवे यांची सासुरवाडी असलेलं कैलास अहीर यांचं निल्लोड हे गाव औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात आहे. आमचे प्रतिनिधी जेंव्हा या गावात पोचलो तेंव्हा कैलास अहीर कडक उन्हात गुरांना पाणी पाजण्यासाठी शेतात आले होते. शेती म्हणजे यांच्या चौघा भावात फक्त आठ एकर जमीन. अर्थात कैलास अहीर यांना एकट्याच्या वाट्याला फक्त दोनच एकर जमीन येते. जमीन सोडलं तर उत्पन्नाचं दुसरं कुठलंच साधन त्यांच्याकडे नाही. या दोन एकर शेतीवरच ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात. केंद्रीय मंत्री राहिलेल्या रावसाहेब दानवे यांच्या सल्याची ही अवस्था...तर मग आता त्यांनी शेतकऱ्यांनाच साले म्हटलंय तर शेतकऱ्यांचे काय हाल होतील?

निल्लोड गावात दलितांसाठी बांधण्यात आलेली पाण्याची टाकी, पण इथे दलितांची वस्तीच नाही

कैलास अहीर हे तसे अल्पशिक्षित आहेत. चार पैकी एका भावाचं अकाली निधन झालंय. तर कैलास यांचे मोठे बंधू विलास अहीर हे निल्लोड गावचे सरपंच आहेत. तर दुसरे एक धाकटे बंधू राबसाहेब दानवेंच्याच एक शाळेवर क्लर्क म्हणून नोकरीला आहेत. सरपंच असलेल्या विलास अहीरांना आमचे प्रतिनिधी गावात आल्याची खबर मिळाली. त्यांच्याकडून ते पुण्यात असल्याचं सांगण्यात आलं. पण कैलासबापूंनी रावसाहेब दानवेंबरोबर असलेल्या औपचारिक नात्यांबद्दल सांगितलं तेंव्हा या नात्याची किव यायला लागली. रावसाहेब दानवे हे त्यांच्या साल्यांशी कधीही बोलत नाहीत. त्यांच्या घरी तर कधीच जात नाहीत. कैलास अहीर यांना सुद्धा दानवेंनशी बोलून आज किमान चार वर्षे झाली आहेत असं ते सांगत होते. सासुरवाडीची माणसं दानवेंच्या घरी कुणी गेलं तर त्यांच्या समोरही जायला जमत नाही... "आम्ही सगळे घाबरतो साहेबांना. त्यांच्या समोरही जात नाही" असं कैलास अहीर सांगत होते. ते कधी बोलले तर फक्त कधी आलात इतकंच त्यापुढे एक शब्दही नाही.

दुपारच्या वेळेत चौरस खेळणारे गावकरी

पुढे कैलास अहीर रावसाहेब आणि निर्मलाताईंच्या लग्नाची गोष्टही सांगत होते. साधारण 1970 साली त्यांच्या नात्यातल्या व्यक्तीने हे स्थळ आणलेलं. पूर्वीपासून दानवे घराणं श्रीमंत होतं. इतकं मोठं स्थळ झेपेल का? असा कैलासबापूंच्या वडीलांना प्रश्न पडला. पण हे लग्न जमलं. आणि 1970 च्या सालातही म्हणजे आजपासून तब्बल 47 वर्षांपूर्वी रावसाहेब दानवेंनी तब्बल सात हजार रुपये हुंडा घेतला होता. याच निल्लोड गावात त्यांचं लग्न लागलं होतं. सात हजार हुंडा देण्याइतकी अहीर यांची परिस्थिती नव्हती पण कैलास अहीर यांचे वडील डेंटल कॉलेजमध्ये शिपाई होते. तिथल्या शिक्षकांनी मदत केल्यानंतर हे पैसे जमवणे शक्य झालं होतं. पण, आज दानवे या साल्यांच्या दारात यायलाही तयार नाहीत.

रावसाहेब दानवेंची सासरवाडी असलेल्या या गावत त्यांचेच मोठे साले सरपंच आहेत. पण या गावाची अवस्था अत्यंत बकाल होती. भर उन्हात बायाबापड्या पाण्यासाठी धावपळ करत होत्या. खड्डे पडलेले रस्ते गतीला खीळ घालत होते. शाळेची अवस्था अत्यंत वाईट होती. आजही या गावातली शाळा पत्र्याची आहे. मोडकळीस आलेली ग्रामपंचायत नेहमीप्रमाणे बंदच होती. सरपंचाच घर विचारत घरापाशी आलो तर तिथे दलितांसाठी असलेली पाण्याची टाकी दिसली. गावात चौकशी केल्यानंतर समजलं की, जिथे टाकी बांधलीय तिथे दलित वस्तीच नाहीय. पण, आता खासदारांचे साले आहेत तर विरोध कोण करणार. गावात सरकारी जमिनीवर मुबलक प्रमाणात अतिक्रमणही झालंय, दोन वर्षांपूर्वी गावात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्याही झाल्यात. इथली शेती आजही अतबट्ट्याची आहे. दुपारच्या वेळी गावातले लोक चौरस अर्थात सरीपटाचा खेळ खेळत बसतात. तरुणांचे घोळके चहाच्या हॉटेलात दिवस ढकलत बसलेले दिसतात. एकूण काय तर स्वप्नांचे रस्ते संपलेल्या या गावात कुणाकडेच काही उत्तर नव्हतं. विशेष म्हणजे हे गाव रावसाहेब दानवे यांच्या मतदार संघात येतं.

दत्ता कानवटे, औरंगाबाद

Updated : 12 May 2017 7:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top