Home > मॅक्स रिपोर्ट > तिकडे रामरहिमची अंधभक्ती, इकडे सनातनची अंधश्रद्धा

तिकडे रामरहिमची अंधभक्ती, इकडे सनातनची अंधश्रद्धा

तिकडे रामरहिमची अंधभक्ती, इकडे सनातनची अंधश्रद्धा
X

बाबा रामरहिमच्या पाठिराख्यांनी एकीकडे अंधभक्तीतून थैमान घातलेलं असताना दुसरीकडे इकडे महाराष्ट्रात सनातन प्रभात या दैनिकातून उघडपणे अंधश्रद्धेला खतपाणी घालणे सुरु आहे. दैनिक सनातन प्रभात अंगावर घेतल्यानं आरोग्याची व्याधी दूर झाल्याचा अजब दावा दैनिक सनातन प्रभात मधून करण्यात आला आहे. सनातनच्या आश्रमातील सोनाली गायकवाड या तरुणीचा याबाबतचा अनुभव सनान प्रभातमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये सोनालीने दावा केला आहे की, 'काही दिवसांपूर्वी मला अध्यात्मिक त्रास होत होता. मला माझा तोंडवळा, डोके आणि कान यावर पुष्कळ आवरण आले आहे. दैनिक सनातन प्रभातची गोल गुंडाळी करुन मध्ये पोकळी ठेवून त्याची बाजू डोळ्यांवर धरल्यावर माझ्या डोळ्यांवरील आवरण न्यून झाले. नाक, कान, आज्ञाचक्र आणि अनाहतचक्र यावरही अशाप्रकारे सनातन प्रभात धरून उपा. केल्यावर मला हलके वाटले'

या बातमीत पुढे असेही म्हटले आहे की, 'दैनिक सनातन प्रभातची घडी करून तोंडवळा, डोके आणि छाती यावर अर्धा मिनिट ठेवल्याने तेथील आवरण शून्य होत असल्याचे मला जाणवले'

दैनिक सनातन प्रभातच्या चमत्काराचा दावा इथेच थांबत नाही. पुढे असा दावा करण्यात आला आहे की, 'दैनिक सनातन प्रभातची गुंडाळी करून त्याची पोकळी किंवा घडी नाकाजवळ पकडून श्वास घेणे आणि श्वास बाहेर सोडताना दैनिक सनातन प्रभात बाजूला घेणे यामुळे आवरण पुष्कळ शून्य होते.'

महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असताना या अशा अंधश्रद्धा पसरवल्याबद्दलन सनातन प्रभातवर कारवाई कधी होणार हा खरा प्रश्न आहे. या कायद्यानुसार, वैद्यकीय उपचारांसाठी चमत्काराचा दावा करणे याला अंधश्रद्धा मानन्यात आले आहे. सनातनमध्ये छापलेला हा अनुभव अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे थेट उल्लंघन आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे अनुभव सनातन प्रभातमधून सातत्याने छापले जात आहेत. कारवाई होत नसल्यानेच या भाकडकथा छापल्या जात आहेत. आता तरी पोलिसांनी या प्रकाराची दखल घेत कारवाई करण्याची गरज आहे.

Updated : 26 Aug 2017 12:07 PM GMT
Next Story
Share it
Top