Home > मॅक्स रिपोर्ट > टीव्ही 'प्राईम टाईम' रिपोर्ट

टीव्ही 'प्राईम टाईम' रिपोर्ट

टीव्ही प्राईम टाईम रिपोर्ट
X

झी 24 तास (रोखठोक)

झी 24 तासच्या रोखठोकमध्ये अंकुश कुणाचा कुणावर? या विषयावर राजकीय चर्चा झाली. मुंबईत शिवसेनेचे 84, तर भाजपचे 82 नगरसेवक निवडून आले. शिवसेनेपेक्षा आम्ही कमी आहोत, ही वस्तुस्थिती आम्ही मान्य केली. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन भाजपला महापौर निवडून आणायचा नव्हता. त्यामुळं पराभव होण्यापेक्षा आम्ही शिवसेनेला प्रांजळपणं पाठिंबा दिला. यात तलवार म्यान करण्याचा काहीच प्रश्न नाही, असं भाजप प्रवक्ते मधू चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केलं. तेव्हा ये पब्लिक है, सब जानती है, असा मिश्किल टोला काँग्रेसच्या भाई जगतापांनी लगावला. निकालानंतर ही वस्तुस्थिती भाजपला समजली नाही का? 82 नगरसेवक निवडून आल्यानंतरही महापौर भाजपचाच होणार, हा माझा शब्द आहे, असं मुख्यमंत्री का म्हणाले होते? त्यामुळं आता भाजपवाले जे तर्क देतायत, ती पश्चातबुद्धी आहे, असा टोला भाई जगताप यांनी लगावला. भाजप आणि शिवसेनेत पडद्याआड निश्चितच वाटाघाटी झाल्यात. आता खिशात राजीनामे नसल्यानं भाजपला मिठी मारणं शिवसेनेच्या मंत्र्यांना सोप्पं जातंय. स्वकीय चहापानाला हजर असल्यानं भाजप मंत्र्यांनाही चहा गोड लागला, असे चिमटे शैलेंद्र परांजपेंनी काढले. जिल्हा परिषदेत शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्याच्या बदल्यात भाजपनं मुंबईची देवाणघेवाण केलेली नाही. इथं कुठलाही सौदा झालेला नाही. जनतेच्या हितासाठी आमचं व्यवहार्य मनोमिलन झालंय, असं मधू चव्हाण म्हणाले. तेव्हा हाच निकष मुंबईत का लावला नाही. मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांची फसवणूक केली, असं भाई जगताप म्हणाले.

साम (आवाज महाराष्ट्राचा)

साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात स्त्री सक्षमीकरणाचा गर्भपात या विषयावर चर्चा झाली. म्हैसाळमधील स्त्रीभ्रूणहत्येच्या, गर्भपाताच्या रॅकेटच्या बातमीने महाराष्ट्र हादरलेला आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आलेल्या या बातमीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. डॉ नीलम गो-हे, नीला लिमये, ॲड अमित शिंदे, लक्ष्मीकांत देशमुख, शेखर जोशी, डॉ आशा मिरगे असे नामवंत या चर्चेत सहभागी झाले होते. हे अपयश यंत्रणेचे आहे आणि जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, तसेच आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे, असा सूर या चर्चेचा होता. २०१७ मधील या सनातनी सामाजिक मानसिकतेचं काय करायचं, हा प्रश्नही यावेळी विचारला गेला.

टीव्ही 9 मराठी

tv9 मराठीच्या महाराष्ट्राला उत्तर हवंय या टॉक शोमध्ये, कर्जमाफीचं राजकारण, या विषयावर चर्चा झाली. असोसिएट एडिटर निखिला म्हात्रे यांनी या शोचं सूत्रसंचलन केलं. भाजपचे आमदार उन्मेश पाटील, शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई, काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदेव गायकवाड, आणि शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील सहभागी झाले होते.आमचं सरकार कर्जमाफी देणारच. यात कोणीही शंका बाळगण्याचं कारण नाही. आणि या विषयात कोणतंही राजकारण नाही असं भजपचे आमदार उन्मेश पाटील यावेळी म्हणाले तर कर्जमाफीसाठी शिवसेना पहिल्या दिवसापासून आग्रही आहे. कर्जमाफी होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं. कर्जमाफी द्यायला सरकार काय मुहूर्त काढत आहे का ? अशी टीका यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केली. कर्जमाफीचं गाजर नको. लवकर कर्जमाफी द्या. शेतमालालाही चांगला भाव द्या असं जयदेव गायकवाड म्हणाले. हे राज्य सरकार आश्वासन पूर्ण करणार तरी कधी ? शेतमालाला भाव देणार तरी कधी ? असा सवाल यावेळी रघुनाथदादा पाटील यांनी विचारला.

Updated : 6 March 2017 5:51 PM GMT
Next Story
Share it
Top