Home > मॅक्स रिपोर्ट > टीव्ही 'प्राईम टाईम' रिपोर्ट

टीव्ही 'प्राईम टाईम' रिपोर्ट

टीव्ही प्राईम टाईम रिपोर्ट
X

झी २४ तास ( रोखठोक )

झी २४ तासच्या रणसंग्राम या कार्यक्रमात बुधवारी पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांची मुलाखत घेण्यात आली. गुंडांना पक्षात घेऊन भाजपनं त्यांना पवित्र केल्याची टीका होतेय. मात्र गिरीश बापट यांनी त्याचा इन्कार केलाय. तुमच्या पक्षात होते तेव्हा सज्जन आणि आमच्या पक्षात आले तेव्हा गुंड? अजित पवार आणि नारायण राणेंनी गुंडांबद्दल बोलावं, हे जरा करमणुकीचंच आहे, असा टोलाही बापटांनी लगावला. महापालिका निवडणुकीनंतर पुण्यात भाजप-शिवसेना युती होऊ शकते, असे संकेतही पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले.

टीव्ही नाईन मराठी ( खासबात )

टीव्ही नाईन मराठीच्या खासबात या कार्यक्रमात निकालाच्या हिंदोळ्यावर या विषयावर मंगळवारी चर्चा झाली. यावेळी भाजप प्रवक्त्या कांता नलावडे यांनी त्यांचं सरकार स्थिर असल्याचं स्पष्ट केलंय. तसंच 23 तारखेनंतर परिस्थिती स्पष्ट होईलच असंही त्यांनी म्हंटलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अशोक धात्रक यांनी सेना-भाजपवर टीका केलीय. भाजपमध्ये गुंडांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश सुरू आहे. सत्तेसाठी शिवसेना कधी विरोध करते, तर कधी समेट करते असा आरोप त्यांनी केला. भाजप सरकारनं विश्वासार्हता गमावलीय असा आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी या कार्यक्रमात केला. तर प्रचारातली भाषा आणि राजकारणाचा स्तर खालावल्याची खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात सहभागी झालेले ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी शरद पवारांच्या वक्तव्यांचं विश्लेषण केलं. तसंच मुख्यमंत्री पातळी सोडून भाषण करत असल्याचा मुद्दा सुद्धा त्यांनी अधोरेखित केला.

साम टीव्ही (आवाज महाराष्ट्राचा)

प्रादेशिक पक्षांनी आघाडी करुन भाजपपुढे पर्याय उभा करावा, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी 'साम' टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत मांडली आहे. त्यावर बुधवारी सामटीव्हीच्या आवाज महाराष्ट्र या शोमध्ये चर्चा झाली. प्रादेशिक पक्ष हा राष्ट्रीय पर्याय होऊ शकतो का? भाजपचे प्रवक्ते सुहास फरांदे म्हणाले की, प्रादेशिक नेतृत्वाला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रश्न समजू शकत नाहीत. मात्र, त्यावर अतुल लोंढेंनी 'त्यामुळेच मोदींना हे विषय समजत नसावेत', अशी कोपरखळी मारली. शेकाप, स्वाभिमानी, संभाजी ब्रिगेड या पक्षांचे प्रवक्ते म्हणाले की मोठ्या पक्षांमुळे छोट्या पक्षांकडे दुर्लक्ष होऊ नये. शेवटी अतुल लोंढे म्हणाले, उद्धव यांचा प्रादेशिक आघाडीचा मुद्दा हे भाजपला धमकावणे आहे. त्याचवेळी मोदींचे विरोधक संपवणे, प्रादेशिक पक्ष, मित्रपक्ष संपवणे घातक आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. प्रादेशिक पक्ष महत्त्वाचे आहेत. कारण आपण फेडरल आहोत. मात्र, केंद्रीय नेतृत्व हे प्रादेशिक हितसंबंधांच्या पलिकडचे असावे, असा एकंदर सूर या चर्चेचा होता.

महाराष्ट्र वन

महाराष्ट्र वनमध्ये बुधवारी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी शिवसेनेनं पाठिंबा देण्याआधी मुख्यमंत्र्यांनी कोणाच्या पाठींब्यानं शपथ घेतली होती याबद्दल मुख्यमंत्री पारदर्शकपणे सांगतील का? असा सावाल त्यांनी पारदर्शकतेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना यावेळी विचारला. यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे तयार असल्याचं उद्धव यांनी स्पष्ट केलं. तसंच जे भाकितं करतात त्यांचा अंधश्रद्धेवर विश्वास असावा असा टोला त्यांनी शरद पवारांना हाणला. देवेंद्र फडणवीसांनी मुंबईची अवहेलना केलीय म्हणून मी त्यांच्यावर चिडलोय असंही उद्धव ठाकरेंनी म्हंटलंय. त्याचवेळी फडणवीसांशी व्यक्तिगत भांडण नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

Updated : 15 Feb 2017 6:41 PM GMT
Next Story
Share it
Top