Home > मॅक्स रिपोर्ट > टीव्ही प्राईम टाईम रिपोर्ट

टीव्ही प्राईम टाईम रिपोर्ट

टीव्ही प्राईम टाईम रिपोर्ट
X

शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2017 रोजी मराठी न्यूज चॅनेल्सच्या प्राईम टाईम डिबेट शोमध्ये झालेल्या चर्चांचा सार

झी २४ तास (रोखठोक)

झी 24 तासच्या रोखठोक या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी शिवसेनेनं पाठिंबा काढला तरी फडणवीस सरकार पडणार नाही. तसंच भाजप अल्पमतातलं सरकार चालवेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. तसंच शिवसेनेनं आता मात्र सत्तेतून बाहेर पडावं असं मत चव्हाण यांनी व्यक्त केलंय. पण, त्याचवेळी राज्य पतळीवर शिवसेनेसोबत जाण्याची शक्यता मात्र त्यांनी फेटाळून लावली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर टीका केलीय. भाजपबाबत राष्ट्रवादीनं ठाम भूमिका ठेवावी असं ते म्हणाले आहेत. दरम्यान उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होऊ शकतात हे सुद्धा त्यांनी सांगितलं.

टीव्ही नाईन मराठी (बोल महाराष्ट्र)

टीव्ही नाईनच्या बोल महाराष्ट्र या कार्यक्रमात ‘पार्टी विथ गुंड’ या विषयावर चर्चा झाली. त्यावेळी पक्षाचा बचाव करण्यासाठी भाजपचे प्रवक्ते निरंजन शेट्टी यांना शिवसेनेकडे बोट दाखवण्याची वेळ आली. शिवसेनेला खरी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. हाण्या-नाऱ्या कोणाच्या पक्षात होते. त्यातला एक काँग्रेसमध्ये आहे. कोणी कम्युनिस्टांचे मुडदे पाडले हे लोकांनी पाहिलं आहे. असा युक्तीवाद शेट्टींनी केला. तेव्हा शिवसेना प्रवक्ते आशिष जैस्वाल यांच्याबरोबर त्यांची चांगलीच जुंपली. त्यात उडी घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी भाजपची विचारधाराच धार्मिक असहिष्णुतेची आहे. गुजरातमध्ये दंगल कोणी घडवली, कोण सांस्कृतिक दहशतवाद करतंय? असे सवाल करून चर्चा आणखी तापवली. तर काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी २२ मंत्र्यांवर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा मुद्दा काढून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

महाराष्ट्र वन ( आजचा सवाल )

महाराष्ट्र वनच्या आजचा सवाल या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सेना-भाजप राजकारण करतंय का? या विषयावर चर्चा झाली. यावेळी उत्तर प्रदेशात भाजप कर्जमाफीचं आश्वासन देतं पण महाराष्ट्रात सत्ता असताना कर्जमाफी का देत नाही असा सवाल शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांनी उपस्थित केला. त्यावर भाजप प्रवक्ते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेची भूमिका दुहेरी असल्याचा आरोप केला. इतर राज्यातल्या कर्जमाफीविषयी भाजपने भूमिका घेतली असेल तर त्याचं स्वागत का करत नाही? असा सवाल त्यांनी रावते यांना विचारला. यावेळी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सेना-भाजपनं विरोधी पक्षात असताना कर्जमाफी देऊ असं सांगितलं होतं त्याचं काय झालं? शिवसेनेनं अडीच वर्षात बोटचेपी भूमिका का घेतली? असे सवाल केले. त्यावर रावते यांच्यावर शिवसेना स्टंटबाजी करत नसल्याचं स्पष्टीकरण देण्याची वेळ आली. तर दुष्काळात आकारण्यात आलेल्या कराचा हिशेब विचारून सचिन सावंत यांनी सेना-भाजपच्या प्रवक्त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. या चर्चेत सहभागी झालेले ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार यांनी शिवसेना कर्जमाफीच्या मुद्द्यावर सभागृहात आक्रमक का होत नाही असा सवाल केला. तर ज्येष्ठ शेतकरी नेते शरद निंबाळकर यांनी मात्र सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नाही असं मत मांडलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर इतकं असंवेदनशील सरकार कधीही झालं नव्हतं. कर्जमाफी निवडणुकांपूर्वीच करा नुसतं आश्वासन नको, अशी मागणी प्रमोद चुंचूवार यांनी केलीय.

Updated : 10 Feb 2017 5:20 PM GMT
Next Story
Share it
Top